आणि मी माळकरी झालो!

         नको त्या आठवणी असे मनाला कितीतरी म्हटले तरी कुणीतरी न चुकता तुम्ही माळ कधी घातली ? असे विचारतेच. मग आठवणी उगळवण्याशिवाय मला पर्याय नसतो म्हणुन लेखनी धरली आहे. आमच्या गावच्या साने गुरुजी वाचनालयात बसलो होतो. बरेच बालमित्र जमल्याने मजा मस्ती जोरात सुरू होती. प्रत्येक पाच मिनिटांनी पुन्हा शांतता पसरे कारण वाचणालयातील गोंगाटाची तक्रार अध्यक्षांपर्यत गेली होती व जात असे. त्यात माझा परममित्र आणि वकतृत्व स्पर्धेतला प्रतिस्पर्धी पंकज तोडकर वाचनालयात आला कि एखादया विषयावर आमचा वादविवाद
चांगलाच रंगत असे. 
           त्यावेळी गावात सप्ताह सुरू होता. आठ वाजले आणि मला महाराज लोकांना फराळ
मिळणार याची आठवण झाली. आजचा अल्पोपहार सुताराच्या घरात या निश्‍चयाने मी मारूतीच्या
देवळाजवळ पोहचलो. देवळासमोर प्रचंड गर्दि पाहुन  उत्सुकतेणे मी आत डोकावुन पाहिले. देवळामध्ये माळ घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. बाहेर माळकरी चर्चा करित होते, ''कुणाला माळ घालायची असेल तर घाला कारण आजच्या सारखा मुहुर्त कधीही येणार नाही. शिवाय सार्वेडकर महाराज म्हणजे किती चांगले व्यक्तीमत्व!' वगैरे..  मी क्षणभर हवेतच होतो. पुर्वी गावभर भजणी मंडळीसोबत फिरलेला मी. आई आमची एकादशी दिवशीच वारली त्यावेळी ज्ञानेश्‍वर सप्ताहानिमित्त गावात  आलेल्या किर्तणकारणी गावातील मयताची बातमी समजताच भाग्यवान व्यक्ती म्हणुन आजच्या दिवशी मरण आले असे संबोधल्याचे मला आठवले.
              क्षणाचाही विलंब न करता, कसलाही विचार न करता मी बेळवेकर मामांना म्हणालो,' मी घालणार माळ!' त्यांनिही माझ्या हाताला धरून लोकांना बाजुला सारत याला माळ घाला म्हणुन महाराजांच्या समोर न्हेऊन  बसविलं. मंदिरा बाहेरून माझे मित्र व भाऊबंद ज्यात काही माळकरी सुद्धा होते. ते सर्व बघत होते. मला बघुन महाराज म्हणाले,' अशी तरूण पिढी पुढे आली पाहिजे!' मला काही सुचत नव्हते, मागचे पुढचे काहिच उरले नसल्यासारखे वाटत होते. महाराजांनी तुळशी माळ भराभरा मंत्र  जपासहित मोजली आणि गळयात
घालत सांगितलं,' वाईट मुलांचा नाद करायचा न्हाई आणि 'राम कृष्ण हरी' हा मंत्र म्हणायचा! 'मी होकारार्थी मान डोलावली; 'आता त्यात काय एवढं! कोण उगाच वाईट स्विकारील?आणि राम कृष्ण हरी म्हणायला माझं काय बिघडलं!'असा  मनात विचार आला.  
           कांही मिनिटातच बाबुने माळ घातली हि बातमी गावभर झाली. पाच मिनिटावर मामांचे घर होते.दारात पोहचल्यावर शेजारी जणू  दारात वाट बघतच बसले होते. माझा मित्र प्रदिप पोटे पुढे आला व दोन्ही खांदयांना हालवत म्हणाला,' बाबु काय केलस तु!' त्याच्या बोलण्यातुन दु:ख जाणवत होतं, काहीतरी भयंकर घडल्याची पुर्वसुचना देणारं वातावरण मी जागवलं. पट्कन घरात गेलो. मामा मामी जेवत होते व म्हातारी आई चुलिजवळ बसली होती. मामा, मामी; मी माळ घातली! बातमी अधिच घरात पोहचली होती. मामी म्हणाली, 'बघुरे दाखव?'
मामा , 'आता बघायची काय? घातली म्हटल्यावर!'  म्हातारी आईने पोटतिडकिने बडबडायचा सपाटा लावला तसा मी गप्प भिंतीला तक्या देऊन उभा होतो. बघता बघता घर भरलं आणि चर्चा रंगली. तीन तास उलटले तरी मी तसाच उभा होतो. मला आता समजले होते हे प्रकरण किती मोठं आणि गंभिर आहे ते. म्हातारी आई काही केल्या शांत होत नव्हती,' हयेला कशाला हवं नको ते; आता खायप्यायचं वय,अजुन लग्न व-हाड न्हाई; हयेची सेवा करायला काय आई बाप हाय काय? माळ घालणा-यांनी तरी काय म्हणुन घातली असल आणि आता काय नकावडा हाय हा! त्यात तिला खेडेकरची म्हातारी आई येवुन मिळाली,' कुठ हाय त्यो,पहिला त्येंची त्येंची काढुन देवुन ये माळ कुणी खुळ सुचवलं तुला हे ?' 
          माझ्या या निर्णयाचे  मजा घेणारे मजा घेत होते दु:ख व्यक्त करणारे दु:खी होते. माझ्या तोंडातुन शब्द बाहेर निघत नव्हता! मामा उशिराने सामंजस्याने म्हणाले,' आता राहु देत; बघुया कसं काय जमते ते नाहितर चंद्रभागेत जावुन सोडुन ईल!' आता मी पुर्णपणे जमिनीवर आदळलो होतो. डोळयासमोर त्याच दिवशी चार पाच वाजता स्टँडवर कदमांच्या हॉटेलात उधार आम्लेटपाव खालेल्याची आठवण येत होती. पुर्वीचा आपला मांसाहार व आपल्याकडुन पाळणुक होणार नसल्याची चिन्हे दिसत होती. झोपायला मित्रांसोबत जाधवांच्या नविन घरात
जात असे. जेवुन दुकानात पोहचलो तिथेही मित्र वाटच बघत होते. इथे मात्र थट्टेचाच विषय होता.
आणि मी बिचारा पप्पु झालेलो. सकाळी उठुन घरी येतोय तर म्हातारी आईनं पाणी तापवुन ठेवलेलं होतं.सकाळी हि सक्तीची अंघोळ व वर शिव्या शापांचा सपाटा त्यामुळे जणु मी शेवटचीच अंघोळ करतोय अशी माझी अवस्था झाली होती. 
           गळयात धागाही न बांधणारा मी भलीमोठी माळ घालुन वावरत होतो. घरातले लोग बुक्का लाव, हरिपाठकर अशी बंधणावर बंधने घालत होती. प्रयोगशाळेत जावुन उंदिर फाडुन मेंदु तपासणारा मी! माझ्यात माळ घालायचा अल्लडपना आला तो परिस्थितीमुळेच, कुणाचाही अंकुश माझ्यावर नसल्याने मी सैरभैर झालो होतो. गावभर माझे लाड, दादांकडुन शाळेला पैसे यायचे आणि मामा, मामी बोलण्यापलिकडे काही करू शकत नव्हते. भरकटलेल्या माझ्यासारख्या अनाथाला देवानेच काम, क्रोध, मोह,लोभ, माया, मत्सर अशा शड्रीपुंवर विजय मिळवुन निस्वार्थ भावणेने कर्मयोग करून पुरषार्थ करण्याचा भागवत  मार्ग दाखविला असे आज म्हणायला हरकत नाही.
क्रमशः... 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income