बैठकी


           मी बैठकित राहणारा. कॉलेजमध्ये कुणी विचारले कुठे राहतो? तर हॉस्टेलमध्ये असे सांगायचो. त्यावर मीत्र बॅचलर्स का? असे विचारायचे. मुळात बायकामुले गावी ठेवुन आलेल्या इथल्या मंडळींना बॅचलर्स कसे म्हणणार? शिवाय हॉस्टेल हा प्रकार ही त्यांच्यासाठी नवा होता! मला शेवटपर्यंत बैठकी शब्दाचा अर्थ मिळाला नाही. कदाचित बैठकी म्हणजे केवळ बसण्यापुरती खोली; असे असावे ! १८० चौरस फुटाच्या  खोलीत बाथरूम टॉयलेटचीही सोय! खोलीच्या मधोमध लाकडी बाकडे होते. एक बॅग ठेवायला जागा, एक खिळा कपडे अडकवायला आणि ३ बाय ७ चा बिछाणा असा साचेबद्ध आवाका खोलीतील २० लोकांच्या वाटयाला होता. 
              महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातुन आलेले लोग इथे राहत होते. प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद इथे जन्माला येत. बळी तो काण पिळी असा इथला न्याय होता. रांगेणे टॅायलेटला जाणे, रांगेणे अंघोळ करणे, शेवटी उठेल त्याने झाडु मारणे आणि शेवटी अंघोळ करील त्याने लादी साफ करणे अशी नियमावली काटेकोर होती. हा लादी आणि झाडु मारण्याचा नंबर माझा फिक्स होता! पार्टनरशिपमध्ये खोलीचे मालकी हक्क असल्याने एक मालक दारूसाठी पैसे जबरदस्ती भाडेकरूंकडुन घेवुन जायचा आणि नाही दिले तर शिव्या घालायचा. 
          इथल्या गटांमध्ये नविन मुलांचा माझाही गट होता ' नियम जर नियम जाचक
असतील तर ते बदलायला हवेत' असा आमचा पवित्रा होता. अशा अनेक गाववाल्यांच्या खोल्या या
भागात आहेत पण् त्यामध्ये त्यांच्या गावाबाहेरील लोकांना आश्रय देत नाहीत. २६ जानेवारीला प्रत्येक मंडळ भागातील इतर मंडळींना सत्यनारायनाच्या पुजेनिमित्त बोलवुन मानसन्मान करते. हि गोष्ट जितकी धार्मिक आणि सामाजिक तितकिच ती आज राजकीय ठरतेय. खोल्या सुधारण्यासाठी मदत करूण गठ्ठा मतदान विकत घेण्याचे प्रकारही घडतात. 
            डिलाईल रोड हे कोल्हापुर करांचे हक्काचे ठिकाण. बरीच मंडळी इथे
मला भेटली त्यांच्यामुळे आपण मुंबईत म्हणजे परक्या शहरात आहोत असे कधी वाटलेच नाही! मानवी स्वभावानुसार कोल्हापुरचे युवक गोळा करून युवा महाराष्ट्र हि टिम मी जमवली त्यात अवि लोंढे, रणजित हातकर, सुनिल खवरे, सुनिल बोरणाक, सुनिल मेंगाणे हि जीवलग मंडळी! मग पुढे मिळुन एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे त्यात पुस्तके भेटी देणे, नवनविन ठिकानांना भेटी देणे, नवनविन हॉटेलात जेवणे, चित्रपट, नाटक पाहणे आले. मित्रांमुळेच जीवणाला अर्थ येतो याची प्रचिती हया आठवणी आठवल्या कि होते. अवि योगा टिचर आहे, तिन्ही सुनिल कवी आहेत आणि रणजीत वकील आहे. 
            मी १७०० रूपय पगारावर ऑफिस बॉयची नोकरी करत होतो. त्यावेळी कॉम्प्युटर क्लासची फि १००० रू. महिणा आणि खानावळ १००० रू. तर खोलीभाडे २०० म्हणजे ६ महिण्यांचा कोर्सपुर्ण होईपर्यंत ३००० कर्ज! या सहा महिण्यात मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामध्ये आंतर विद्यापिठ युवक महोत्सवात वकतृत्व, कथाकथन, वादविवाद मध्ये प्रथम क्रमांकाचे मेडल जिकले. माझ्यातील  तथाकथित स्वाभिमानाने अहंकाराची जागा घेऊन मी त्यावेळी हातातील नोकरी सोडली आणि ४ महिणे घरी बसलो कारण हा कोर्स काही काम मिळवुन देणारा नव्हताच ! 
          ११,००० पहिल्याच वर्षी कर्ज डोक्यावर असताना सहयाद्री एकस्प्रेसच्या जनरल डब्यातुन गाव गाठले तर जीन्सच्या मागच्या खिशातील पाकिट मारले गेल्याने उसणवारीचे ८०० रू. ही गेले.  कोल्हापुर ते गाव पुन्हा उसणवारीचा धंदा सुरू! ज्याचे कुणी नाही त्याची मुंबई या भावणेने पुन्हा मुंबईचा प्रवास सुरू झाला. हाऊस किपिंग, सिक्युरीटी, हॉटेल अशा कामांचे सल्ले येत होते आणि माझ्या नकाराला शिव्या बसत होत्या. गुणवत्ता महत्वाची वाटत असल्याने अभ्यासावर माझा भर राहिला. परिस्थितीमुळे कपडे आणि इतर वस्तुंकडे माझे दुर्लक्ष राहिल्याने कॉलेजमध्ये मी एकही मुलगी पटवु शकलो नाही. हया मुली पटतात कश्या? हा नेहमीच माझ्या अभ्यासाचा विषय राहिलाय. कॉलेजवर मायमराठी म्हणुन आमचा मित्रांचा ग्रुप होता. जेव्हा मंडळी ग्रॅन्टरोडच्या शेट्टी हॉटेलात चहा घ्यायला जायचे तेव्हा २० रूपये चहा असल्याने मला घाम फुटायचा.नेपिअन्सी रोडला मी लिफ्टमॅन म्हणुन त्या काळात २५०० रूपयांसाठी काम करत होतो आणि ३००० वर्षाची बि.ए ची फी होती. दर सहा महिण्यांनी नवी नोकरी असा माझा प्रवास सुरू होता आणि
मुलाखतींच्या सपाटाही जोरदार होता. मला त्यावेळी जो पगार जास्त वाटायचा ती नोकरी होती ४००० रू. ची पॅन्ट्री बॉयची.सहा महिण्यानंतर माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या मित्राचा जॉब रहावा म्हणुन मी त्याही  नोकरीचे बलिदान दिले आणि पुन्हा २ महिणे घरी बसलो. त्यानंतर क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन च्या मार्केटिंग एजन्सींनी २ महिण्यांचा पगार दिलाच नाही. असे अनुभव विकत घेत मी पदविधर झालो.
              खिशात पैशे नव्हते आणि मला एक दिवस भरपुर ताप भरला. तो इतका भयंकर होता  कि मी त्याचा सामना  करू शकत नव्हतो.  कोणितरी आपले
शेजारी हावे पण् माझे कुणीच नव्हते. दादा कामावरून येणे शक्य नव्हते. चक्कर येवुन मी टॉयलेट मध्ये पडलो. डोळे अंधारले उघडया डोळयांना समोरचे काहीच दिसेना डोळयांची उघडझाप करून ही अंधारच पाहिल्याने  आपन  मेलोय असे वाटले मात्र थोडया वेळाणे हळुहळु दिसु लागले तेव्हा मी देवाचे खुप आभार माणले. आता दवाखाना स्व:ता गाठणे योग्य होते पण् खिशात पैसे नव्हते. करीरोडच्या सरकारी दवाखाण्यात जायला १० रूपये हवे होते त्यासाठी मी शिवकृपामध्ये राहत असणा-या शांताराम पावले या गाववाल्यांच्या घरी पोहोचलो. त्यांची पत्नी घरी होती त्यांचा माझा जास्त परिचय ही नव्हता तरीही धाडसाने मी दहा रूपये मागितले त्यावेळी माझे डोळे पाणावले होते त्यांनीही त्यावेळी २० रूपये देवु केले पण् हि बातमी गावी पाहोचली. दादाला हि गोष्ट अपमानास्परद वाटली आणि त्याच्याकडुन दुस-यादिवशी खुप शिव्या भेटल्या हि गोष्ट मला आठवली कि दहा रूपयांची किम्मत मला कळते. 
              अजुन दोन गोष्टी न चुकता मला आठवतात. माझी आई घर सारवण्यासाठी जायची (गावातील मोठी घरे सारण्यासाठी माणसे घेण्याची पद्धत आहे) तिला भिंत सारवताना एकदा आईला भिंतीवर  २ रू. भेटले ते तीने  पदराला बांधुन ठेवले होते आणि मला दुस-या दिवशी दिले होते. ते पैसे त्यावेळी जास्त होते पण् घेताना मनाचा फार गोंधळ उडाला होता. आई आशिक्षित असल्याने २५ पैशाचे आंतरदेशी पत्र तिला ५० पैशात मी कितीतरी वेळा आणुन दिले होते. आपल्या घरातील साखर आईला न समजता खाणे म्हणजे चोरी का? असा प्रश्‍न मला लहानपणी पडायचा. दुसरी २ रू. ची गोष्ट आहे.  आमच्या गावातील लोक घरातील कचरा, जुण्या वस्तु वगैरे गावाबाहेरील वेशीवर टाकत. ते गावचे डंपिंग ग्राऊंड होते, गावातील माझे मित्र आणि मी इथे कचरा विस्कटुन काय कामाचे मिळते का ते बघत असु. बरेच काही मिळत असे एकदा मला २ रूपये भेटले ते मी घरात एका पिशवीत ठेवले होते. ती पिशवी काही दिवसांनी मी पप्पांसमोर एकदा तपासत होतो त्यात ते न भेटल्याने इतका नाराज होतो कि आजवर तितका नाराज काही झालो हे आठवत
नाही. ते पाहुन पप्पा आईला म्हणाले होते 'हा बघ २ रूपय चा माणुस! ' त्यांना काय म्हणायचे होते ते आजही मी शोधतोय! 
            माझे वडिल मिल मध्ये युनिअनलिडर होते. म्हणुन त्यांनी ७-८ मिल मध्ये लिडरशिप केली;काम केले नाही मग रेकॉर्ड कुठला?  त्यांच्या काळातील काही हुशार लोकांनी खोल्या घेतल्या त्यांना सॅल्युट करावा लागतो कारण आताची युवा पिढी  कितीही हुशार असली ती आजच्या परिस्थीतीला त्यांच्या हातात गाजरेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार
नाही! मला वर्षातील चार ऋतुमानानुसार हवापालट करायला गावी जायला लागते तसे माझे पप्पाही गावी जात. गावी जाणार तेंव्हा आईने आपल्या शेतात किंवा दुस-याच्या शेतात काम करायला जायाचे नाही असा दंडक.  दररोज घरात चहाला कमित कमी १०-१५ लोक आणि दिवसातील  तीन पैकी एका जेवणाला दररोज एखादी नविन व्यक्ती असणारच. शिवाय  हे जेवण दारू मटणाचेच असणार! पप्पांच्या आग्रहा  बद्धलची एक गोष्ट नमुद कराविशी वाटते. आपण पहा, कितीही पोटभर जेवलो तरी एखादे आइस्क्रीम खाणारच, शिवाय थोडया वेळाने आणखी काहितरी खावु शकतो! पप्पा ,मला स्वतः उशिरा जेवताना  जेवणासाठी आग्रह करत, माझ्या सोबत हि अर्धी भाकरी खा म्हटल्यावर मी ती भाकरी खायचो आणि मग पप्पा मुलगा उपाशी होता म्हणुन आईला दम मारायचे. थोडी दारू चढली कि मग रात्रीच्या जेवणावरून पप्पा आईला मारायला उठत आणि आई गल्लीतच असणा-या तिच्या माहेराच्या घरात म्हणजे जाधवाच्या घरी जात. कांही दिवसांनी म्हातारी आई रात्री आमच्या घरी झोपायला येऊ लागली.पप्पांनी मला कधिच मारले नाही कारण नुसत्या आवाजाणेच मी चड्डीत मुतायचो. माणसाच्याही उपस्थितीत आणि नजरेत वाघासारख्या प्राण्याचे अस्तित्व मी लहाणपणापासुन अनुभवलेय! समोरच्या घरातल्या माझ्या
लंगोटी मित्राला म्हणजे अविनाश धुमाळला मी दम मारला म्हणुन खुंटीला उलटा टागणारे पप्पा,शिवाय वारंवार त्यांच्या जवळिल तलवारी तोंडासमोरून नाचवनारे पप्पा, त्यांच्या शब्दाला घरात आणि गावात मिळणारा मानसन्मान  असा त्यांचा  दरारा   आजही माझ्या  मनात घर करून आहे.  शिमग्याला लागणारे व्हळीदेवाच्या समोर  भल्या  मोठे दगडाच्या गुंडया उचलुन टाकण्यात आणि त्याकाळात २५ रू. डाव अचुक नेमबाजीणे मारण्यापर्यंत तसेच भागुबाईच्या म्हणजे
ग्रामदेवत भावेश्‍वरीच्या दिवटया नाचवण्यापासुन गावातील मारामारीत त्यांनी हिरहिरीणे सहभाग घेतला. पण त्यांचा घरात मला प्रेमळ/आपलेपणाचा असा सहभाग कधिच दिसला नाही.  मग मला तो आवडला नाही तरी आज मान्य करावा लागतो.
            मुंबईत मी ज्या खोलीत रहायला होतो त्याच खोलीत खोलीत पुर्वी माझे वडिल राहत. मला येथे त्यांच्या वयाची बरीच मांणसे भेटली. त्यांच्याकडुन मिळालेल्या माहितीमुळेच माझा पप्पांच्यावरचा द्वेश कमी झाला. त्यांचा नवाकाळ आणि लोकसत्ताशी होणारा
पत्रव्यवहार, १९९३ ची हिंदु, मुस्लीम दंगल असो किंवा युनिअन लिडर म्हणुन कामगार आघाडीचा लढा पप्पांचा सहभाग मोलाचा राहिला हे मला इथे समजले. त्यामुळे माझ्या ऐकेका् प्रश्‍नांची म्हणजे मुंबईवरून येणा-या त्यांच्या भेटीमधील खादयपदार्थांसोबत पाठविलेल्या इतर वस्तु यांची उत्तरे मिळाली. मराठी माणुस म्हटले कि बाई, वाटली आणि दुनियादारी ही त्रिसुत्री ब-याचवेळा जुळुन येते असे म्हणतात. पप्पांविषय अशा संदर्भातील  सुद्धा बरीच माहिती इथे मिळाली पण सोबत न चुकता एक वाक्य भेटले,'' मेहनती होता, आज असता तर पोरांना काही करायची गरज न्हवती, राजा माणुस!''
             मंडळाच्या खोलित(बैठकित) मी स्वावलंबण शिकलो. कधी ही तंबाखु विकत न घेणारी
माणसे, कोणितरी चहा पाजेल या आशेवर राहणारी माणसे, आवळा देऊन कोवळा काढणारी माणसे अशा विविध व्यक्तीरेखा मला इथे भेटल्या. लाजेखातर शरीरावरील गाठ न दाखविणारा पिंटया गावी जावुन मेला. कुणाची हि कपडे,चप्पल बिनधास्त न सांगता घालणारा मंगेशने कंटाळुन मुंबई सोडली तो परत भेटलाच नाही!कुठे कामाला हाईस? हा प्रश्‍न आहे कि टिंगल हे समजायला मला एक वर्ष लागले; तसेच मग पगार किती? या प्रश्‍नाला किती फाटे असतात हे कळायला चांगली तीन वर्ष लागली!देवाला हार आणला तरी तो वर्गणिचा असायचा आणि दररोज कुणाचा तरी साबण कुणीतरी वापरला म्हणुन अर्वाच्च भाषेत सिनेमा चालायचा. 
            सर्वांत लहान असल्याने रविवारी काही मंडळी मला भारतमाताला मराठी चित्रपटाचे तिकीट काढायला लावत त्यात माझा फ्रि पास निघत असे. इथे असताना व्यायाम
करण्यासाठी मी बाजुच्यां व्यायामशाळेत जायचो.  पण् तिथे इतरांनी माझी शरीरयष्टी पाहून तुला काहि व्यायाम करायची गरज नाही असे समजविल्यावर बंद केले. हिवाळयात व्यायाम केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करतानाची मजा मी खुप लुटलीय. मनसेने छेडलेल्या आंदोलनाचा प्रभाव माझ्यावर फार होता त्यावेळी हाही प्रश्‍न पडायचा कि मुंबईची मर्यादा संपल्यानंतर इथलेच भुमिपुत्र आम्हा महाराष्ट्रीय माणसालाही नाकारातील! असो, मराठीचा आणि
मराठा'चा नवोन्मेश नसानसांत भिणल्याने फलकावर मराठी, चित्रपटात, शाळेत सर्वत्र मराठीच असा आग्रही मतप्रवाह माझ्यात संचारला होता.त्यात मित्र, शिक्षक यांचा  विरोध असतानाही मी मराठीतुन (स्पेशल) पदवीधर झाल्याने आणि वक्ता, मिमिक्रिकार आणि लेखक म्हणुन एरियात ओळखीचा झाल्याने जोर धरला
होता आणि त्या उर्मीत मी खालील महाराष्ट्रनामा लिहिला.
हाक युवकांची,
आपल्या अस्तीत्वाची,
स्वाभिमानाने जगण्याची,
महाराष्ट्र नवनिर्माणाची!
शुरविरांचा, संतांचा हा महाराष्ट्र,
खेळाडुंचा, कलाकारांचा हा महाराष्ट्र,
कामगारांचा, शेतक-यांचा हा महाराष्ट्र,
खरच, महानतेचा वारसा आहे महाराष्ट्र!
महाराष्ट्राकडे वाईट नजरेणे जो बघणार,
त्याला शिवबाची तलवारच उत्तर देणार,
याच मतावर आम्ही तटस्थ;
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
क्रमश:

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income