मुंबईत आगमन

                ८ जुन २००६ ला मी दादासोबत मुंबईला महालक्ष्मी एकस्प्रेसच्या जनरल डब्यातुन पोहचलो. पत्ता पाठच होता. खोली नंबर ९९ शाहु सदन, करी रोड, मुंबई ४०००१३.  पप्पांना या पत्यावर शंभरभर पत्रे पाठविली असतील . काही काळ दादालाही पत्र पाठविली ती सुद्धा  याच पत्यावर. आमच्या घरात दोनच सुशिक्षित माणसे एक पत्रे लिहिणारा मी आणि ती वाचनारे पप्पा! जोपर्यंत पप्पा होते तोपर्यंत दादा पडदयामागच्या कलाकारासारखे होते. मला आठवतेय आमच्या घरात पत्रासाठी एक तार अडकविलेली होती. त्यात पंचविस तीस पत्रे नेहमी अडकलेली असायची. महत्वाची बिले व पत्रे ठेवायला ही हक्कांची जागा ! घर सारवायला काढले कि प्रथम या तारेची सोय सुरक्षित ठिकाणी केली जायची. जशी पत्रे बंद झाली तशी तिर्थरूप, तिर्थस्वरूप आणि साष्टांग नमस्कार विनंती विशेष त्याचबरोबर पत्र लिहिण्यास कारण की अशी भाषाही बंद झालेली दिसतेय. एक विशेष पत्र मला आठवतय दादाने आईला पाठवलेले; त्यामध्ये  वडिलांविषयी नाराज होवुन आपल्यावर अन्याय झालाय वगैरे...  अशा आशयाचे ते पत्र होते. वास्तविक ब-याच मुलांना असेच वाटते कि आपल्याला पालकांनी कमी दिले वगैरे सदर पत्रात दादाने मला स्व:ताचे जिवन सुधारून घ्या असा सल्लाही दिला होता. त्या पत्रामुळे आईला खूप दुःख झाले ती  दोन दिवस उपाशी राहिली होती. तिला लिहिता येत असते तरी तिनेही यावेळी एखादे पुस्तक तिच्या  आयुष्यावर लिहिले असते. शेवटी मला पत्र लिहायला सांगितले आणि पत्रात तिने आपले
संपुर्ण मन मोकळे  केले. त्यानंतर दादाचे माफी मागणारे पत्रही आले. मुद्दा हा कि माझ्या आठवणीतल्या या पत्यावर सकाळी ७ वाजता आम्ही पोहोचलो. 
              जवळ जवळ १५ लोक एका खोलित राहताना  दिसले. जीवाची मुंबई कशी असेल याचा प्रत्यय यावा जणू. सर्वजन चड्डीवर होते.कारण  ती वेळ होती लाईन लावुन शौचालयास जावुन अंघोळ कारायची.  इथे माझा मधला भाऊ विक्रमही होता. मला पाहुन तो आनंदी झाला कि दु:खी झाला हे मी ओळखु शकलो नाही !दादानं अंघोळ करायला सांगितल्यावर मी सुद्धा कपडे काढुन रांगेत बाकडयावर बसलो.लोकांची कुजबुज सुरू झाली. माळकरी हाय वाटंतं! विजय, धाकटा भाऊ काय? दादा त्यांना उत्तरे देत होता. मला एका वृदध गृहस्थानी विचारले, 'काय नाव?'
बाबुराव!
बारावीला नापास काय?
नाहि फस्ट क्लास!
मग, काम करत शिकायचं आता ! ते म्हणाले 
      इतक्यात एकजण म्हणाला,' कोल्हापुरचा गडी वाटत नाही तब्येती वरून!'
मला आठवतय त्या पहिल्या दिवशी दादानं मला खास डिलाईल रोडची पदयात्रा करत माहिती दिली
होती. न चुकता एका बोर्डावरील श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोकडे बोट दाखवत सांगितले होते,
'मुंबईतील मराठी माणसाचे आधारस्तंभ! ' 
           पहिल्याच दिवशी मामेभावाला भेटायला बोरीवलीला जाताना भयाणक रेल्वे अपघात पाहिल्याने मी चांगलाच हादरलो होतो. माझ्यापेक्षाही कमी वय असताना मुंबईत
दाखल झालेले पेरनोलीचे दादाचे मित्र श्री.रमेश वांद्रे यांचीही ओळख झाली. सध्याचे प्रतिथयश उदयोजक असणा-या त्यांनि आपली संघर्षयात्रा सांगितल्याने मलाही थोडा त्यावेळी जोम चढला होता. 
          कसल्याही कामाचा अनुभव नसल्याने मला पहिले काम आले ते ऑफिसबॉय म्हणुन. तेही ज्यांच्याघरी खाणावळ लावली होती. त्यांनि ते आनले होते. १७०० रू. महिना या पगारावर मी लोअरपरेलच्या ए. टु झेड इंडस्ट्रीमध्ये ऑफिस बॉयची नोकरी सुरू केली. कंपनिमध्ये थोडयाच दिवसात सर्वांचा लाडका, मेहणती आणि होतकरू म्हणुन नावारूपास आल्यानंतर आता चिंता होती पुढच्या शिक्षणाची. काम करत विज्ञान शाखा हे जमणारे नव्हते.
             मुंबईतील प्रसिद्ध एम. डी. कॉलेज, किर्ती कॉलेज, रूपारेल आणि रूईया कॉलेज येथील कला शाखेसाठी ८५% चे मेरीट पाहुन मी नाउमेद झालो होतो. कलाशाखेसाठी वर्षाला ५००० खर्च येणार होता हा दुसरा धक्काही समोर होता. हताश होवुन मी रूपारेलच्या दुस-या माळयावर बसलो असता समोर एक बोर्ड दिसला,'निराश झालात! धिर सोडु नका बारावी पास - नापास सर्वचजण पार्ट टाईम उच्च शिक्षण पुर्ण करू शकतात!'  तो बोर्ड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्दापिठाचा बोर्ड होता. तडक मी त्यांचे ग्रॅनरोडचे मुंबई विभागीय केंद्र गाठले आणि प्रवेश मिळविला. सरळ प्रवेश आणि वर्षाची फि मात्र २००० होती.
              सिद्धार्थ ग्राफिकस येथे ऑफिसबॉय म्हणुन काम करताना माझ्यावर प्रिंटिंग प्लेट मुंबईतील नामांकित प्रेसना देण्याची जबाबदारी होती. पत्ते विचारत अर्धि मुंबई मी यावेळी समजुन घेतली. बसचे पैसे वाचवुन चालत जाई व त्या पैशातुन वडा पाव खाई! बुसा इंडस्ट्री शोधताना लोअरपरेलच्या हणुमान गल्लीची (रेड लाईट एरियाची) ओळख झाली तर अशीच ओळख ड्रिमलॅड सिनेमा परिसराचीही झाली. मुंबईतील प्रत्येक विभागाची वेगवेगळी ओळख व वेगळेपण मी अनुभवले. विले पार्ले आवडीचा तर कुर्ला, अंधेरी नावडीचा
अशी मनाची अवस्था यावेळी बनली होती.
   क्रमशः .... 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income