लक्षवेधी स्पर्धा

 स्पर्धा 
स्पर्धा एक पण; आपली संपुर्ण साधना व शक्ती त्या एका पणाला लावण्याचा क्षण. मला स्पर्धेची
नेहमीच आपुलकी वाटते. आपण श्रेष्ठ आहोत हे सिध्द करण्याची संधी स्पर्धा देते. आता तुमचा अनुभव
मोठा असेल तर तुमचे मन आतरराष्ट्रीय स्पर्धा,राष्ट्रकुल स्पर्धा वगैरे त्यांचे नियोजन आणि घोटाळे इकडे पळत असेल पण मी गल्लीबोळातील, शाळा-कॉलेजमधील आणि फार फार तर तालुका-जिल्हा स्तरीय स्पर्धांपुरता माझा प्रवास आहे.कारण माझ्या मराठी मिश्रीत हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय युवा महोत्सवात मी २००६ साली सपशेल हार खाल्लीय , शिवाय इंग्रजी आमच्या बा ला पण जमली नाही. आज फक्त कारण मिळाले की पुरे ; स्पर्धेवर स्पर्धा आणि बक्षिसांचा पाऊस! आता तर लोक असे म्हणायला लागलेत की, दोनशे ते पाचशे रूपयांचे बक्षिस मिळेल दुसरे काय ? 
           आमच्या गावी तर लोक म्हणायचे, 'तुमच्या मंडळाच्या स्पर्धेमुळे मुलांच्या शैक्षिणीक अभ्यासावर परीणाम होतोय!'  मुंबईत गणेशोत्सवात एका स्पर्धेठिकाणी केवळ स्पर्धकच उपस्थित होते; प्रेक्षक कोणीच नाही! शिवाय, कोणीही वाद-विवाद स्पर्धेसाठी नाव न दिल्याने तिन्ही गटातील ही स्पर्धा रद्द करण्यात आली. ही इतकी निराशा का आली? असो, ज्या स्पर्धांनी माझे विश्‍व बनवले त्यांचा विचार करताना प्रश्‍न पडतो की, त्या स्पर्धांच्या वेळची आपली मानसिकता तशी का होते? त्या आठवणी आठवताना एकएक क्षण तसाच डोळयांसमोर उभा राहतो. आजही एखादया शाळेत किंवा एखादया कार्यक्रमासाठी गेल्यावर तिथल्या कमी आवाजातल्या लाऊड स्पिकरवर लहानपणीच्या स्पर्धेच्या वेळीचे गाणे ऐकले की मी माझ्या बालपणात विरून जातो. 
             त्यावेळी बहुतेक स्पर्धेची बक्षिसाची मानाची ढाल फिरती असे जर ती एखादयाने सलग तीन वर्षे जिंकली तर ती त्याची व्हायची.  मात्र किमान एक वर्षे ही मानाची ढाल मिळविण्यासाठी प्रत्येक जण यथाशक्ती प्रयत्न करे. आयोजनाचा हेतु, निर्माण होणारा विचार आणि स्पर्धा महत्वाची ना की बक्षिस! सर्वांचे एकच ध्येय;निकालावर डोळा, चर्चा, प्रती चर्चा, अंदाज, आवडी-निवडी, कोण भाव खाऊन गेला कोण आपटला? असा सगळा हा प्रसंग असतो. सर्वांना त्यावेळी मिळालेली फुकटची चहा किती गोड लागतेच माहितेय! त्या चहाने काय पोट भरणारेय?म्हणुन मग,स्वखर्चाने स्पर्धेच्या ठिकाणाच्या कॅन्टिन किंवा हॉटेल मधील खालेली गरमागरम भज्जी, वडे, भडंग कधी विसरता येईल का? माझ्यासारख्या खवय्याला तर नाहीच नाही! सांगण्याचा हेतु हाच की, आपण जिंकणार की हरणार? जिंकलो तर काय? हरलो तर काय? या विचारानं भारावलेल्या मनाची अवस्था नमुद करण्यासारखी असते. तेव्हा पाठीवर हात ठेवुन धीर देणारा आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपल्या जीवनाची दिशा ठरवित असते. त्यासाठी ऐकणाराही विद्यार्थी असावा लागतो! आपल्याला हवे तसे वातावरण तयार असते. ज्येष्ठांनी सर्व काही अनुभवले असते मात्र ते जसे काही सर्व नवीनच आहेया अर्विभावातच वावरतात. आपल्या हालचालींवर कुणाचे तरी लक्ष असेल अशी पुसटशी कल्पनाही आपल्याला करवत नाही. आपण जिंकलो तर जोशात आणि हारलो तर आपल्या मनस्थिती,परिस्थितीनुसारकाहीतरी बोलुन जातो; आपले हेच व्यक्त होणे काही काळ गेल्यानंतर आठवले की, मग तो प्रसंगआठवतो. काही अगणित, अतार्किक घटना घडतात त्याचे कारण किंवा उत्तर आपणास आजही सापडत
नसते. अशाच एका वकृत्व स्पर्धेविषयी......
लक्ष्यवेधी
             आजही शाळेला मला उशीर झाला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे नियमानुसार शाळेभोवतीचा कचरा न उचलणा-यांच्या यादीमध्ये माझं नाव पहिल्यांदा असणार अशा एका मागुन एक शंका मनात येवु लागल्या.प्रार्थनेनंतर कालच्या दिवसाच्या अनेक उचापती, उलाढाली बाहेर काढल्या जात. त्यात माझी किती प्रकरणं ?  हया विचाराने शाळेकडे माझी पावलं मंद पडत होती. आणि मनात वेगाने विचार येऊ लागला.शाळेभोवतीच्या शेतातील चो-या, कुणीतरी पाटील गुरूजींची माराची लाकडी पट्टी जाळल्याने दाट शंका असणा-या विद्यार्थ्यांची यादी, पाटील गुरूजींच्या स्कुटरची हवा काढलीच पण् सिटवरसुध्दा ब्लेड फिरवल्यामुळे वातावरण प्रार्थनेनंतर किती तापणार? परिक्षेची फी अजुनही न मारणा-यांची यादी! याचा विचार मनाला पेलणारा वाटत नव्हता. असो, कितीही मन बोजड झालं आणि शाळेला कितीही उशीर झाला तरी न विसरता दुपारच्या सुट्टीत खेळण्यासाठी गोटया, चिन्नी (विटी दांडु)एका खिशात आणि एका खिशात भाजलेले चिंचोके आणि शेंगदाणे घेऊन मी निघालो.
प्रार्थना झाली होती आणि सर्वजन समुहगीतासाठी उभे राहिले होते. तेवढयात मी शाळेभोवतीच्या
कट्टयाच्या आडानं शाळेमागुन जाऊन व्हरांडयावर अगदी चलाखीने उभा राहिलो. माझा प्रवेश पाहुन
दुस-या वर्गातील मुले गडबड करत होती आणि माझ्या वर्गातील मुले त्यांची समजुत काढत होती. सागर
चव्हाण आणि श्रीकांत पावले हे माझे मित्र प्रार्थने आधी शौचास म्हणुन नदीवर गेले होते ते आजुन कांही
आलेले नव्हते. प्रार्थना संपली सर्वजण खाली बसले. क्षणभर शांतता पसरली. ती काही मनापासुनची
नव्हती, ती भितीची होती. 
              अशावेळी मानेगुरूजी अगदी मनापासुन एखादी नवीन गोष्ट, एखादी नवीन घटना
सांगायचे त्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटायचे, माने गुरूजींनी पाटील गुरूजींना काहीसे खुणावले. तसे
पाटील गुरूजी डाव्या हातानं उजवा कान चोळत म्हणाले, 'हे पहा, पावले गुरूजींनी, आपल्या मातोश्रींच्या
स्मरणार्थ पिंपळगाव विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. तेव्हा कुणाला नावे दयायची त्यांनी ताबडतोब दया. विजेत्यांना बक्षिस मिळणार आहे.'माझ्या मनातुन बक्षिसाचा विचार काही केल्या जाईना. वही, पेन, पेन्सिल डोळ्यांसमोर  येऊ लागल्या. नाहीतरी आईकडुन हया आठवडयात वही मागितली की,पुढच्या आठवडयात मिळायची. शिवाय टाकाऊ पेनापासुन टिकाऊ पेन बनविणारा म्हणुन वर्गात माझं नाव होत. आणि हया स्पर्धेच्या निमित्ताने मला गावाबाहेरही जायला सुद्धा  मिळणार म्हणुन मी ताडकन उभा राहिलो. पण मनात विचार आला आपण करणारा काय? हे वक्तृत्व म्हणजे काय? आता उभा राहिलेलो मी बसु पण शकत नाही. आता एकच गलबलाट झाला, 'ये बाब्या बस! हा काय स्पर्धेला जाणार! बाई ओरडल्या, 'शांत रहा रे!' तशी मुले शांत झाली. माझ्याबरोबर पंकज आणि त्याच्या वर्गातील एक मुलगी उभी होती. माझ्या वर्गातील मुलांच्या चेह-यावर तेव्हा मी बरंच काही पाहिलं,कुणाच्या चेह-यावर शंका, कुणाच्या आशा, कुणाच्या राग, कुणाच्या तिरस्कार पवार गरूजी म्हणाले 'बाकीच्या सुचनांसाठी आताच माझ्याबरोबर या'.  तशी आम्ही तिघे-चौघे
व्हरांडयाच्यामध्ये पवार गुरूजींच्या जवळ आलो. एरवी मागे असणारा मी सर्वांच्या मध्ये उभा राहिल्याने माझे पाय हवेत असल्याचा मला भास झाला. मुले दुपारच्या सुट्टीत खेळताना मला घेत नसत पण मी पहायचो की, व्हंरांडयात उभे राहून बाई आणि गुरूजी मुलांचे खेळणे पाहुन कौतुक करत तेव्हा मी उगीच मैदानभर पळायचो आणि गुरूजींचं लक्ष माझ्याकडे येतंय का? हे वळुन पहायचो. उगाच एखादया मित्राला हाक मारून अडवायचो आणि काहीतरी सुचना करायचो! 
             स्पर्धेनिमित्त वर्गशिक्षकांच्या अगदी समोर उभे राहिल्यानंतर मला सर्व आता  आठवु लागलं कि, इथपर्यंत यायला मला लाज वाटायची कारण माझ्या अंगावरची कापडं कुणीतरी वापरून दिलेली आणि मी धुऊन शिवुन आणलेली. माझ्या दात, केस आणि नखांचा नकारार्थी पतिसाद पण तरीही मी वर्गात मात्र तिसरा क्रमांक मिळवायचो. गुरूजी आम्हा तिघाचौघांना वर्गात घेऊन गेले तसे प्रार्थनेनंतर होणा-या खरडपट्टीतुन माझी सुटका झाल्याच्या कल्पनेने शेवटची घंटा वाजल्यानंतर जो मनाला आनंद मिळतो तशी माझी अवस्था झाली. पवार गरूजी म्हणाले, 'माझी आई विषय आहे. पाच मिनिटे वेळ आहे. हया हया तारखेला स्पर्धा आहे.बरीच मुले येणार आहेत.' एकच्या सुट्टीत माझ्या मित्रांनी सुचवलं, 'हे बघ,पकुदा (पंकज तोडकर) हया स्पर्धेला मागल्या वर्षी पण गेला व्हता,त्येच्याकडं जा मार्गदर्शन घे, सराव कर' दुस-या दिवशी मी सातवीच्या वर्गात वाकुन पाहिले, पका सराव करत होता. जोर जोरात बोलणे सुरू होते. मला पहाताच त्याच्या मित्रांनी दार लावलं. बरोबर मी प्रतिस्पर्धा त्यांचा! 
               अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. मला आजही माहित नव्हतं हे वक्तृत्व म्हणजे काय? म्हणजे नेमका अर्थ, त्याची फोड काय? कुणीतरी सांगितलं होतं की एखादया विषयावर जाऊन भाषण देणं म्हणजे बोलणं. जो चांगलं बोलेल त्याचा नंबर पण नेमकं काय आणि कसं बोलायचं आदि अंत मला काहीच कल्पना नव्हती. माझ्या मनात फक्त एकच विचार कधी नाही ते आईनं मला माझ्या डब्यात भज्जी आणि भाकरी दिली आहे; कारण पोरगं स्पर्धेला चाललंय! असं वाटायचं दुपार अत्ताच व्हावी. आम्ही तीन चार मुले स्पधेसाठी पायी पिंपळगावाकडे निघालो. नदीकाठची शेती पाहुन मनात विचार आला. 'च्याआयला आमच्या डोंगरावरल्या खोरीत असं पाणी असतं तर आम्हीपण डब्बल टिब्बल पिकं काढली असती.' आम्ही पिंपळगाव विद्यालयात पोहोचलो. तिथल्या सर्वांच्या चेह-यावर आनंद पाहुन माझ्या मनात कलकलाट सुरू झाला. त्यात शाळेवरचं वाजणारं स्पिकर अधिकच गोंगाट करू लागलं आणि माझा आत्मविश्‍वास ढासळु लागला. मी नाही होय करत नाव नोंदवलं बघता बघता हॉल भरला मान्यवर आले. 
             प्रथम फेरी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी एकुण साठ स्पर्धेक होते. एका मागुन एक ऊठुन जाऊ लागला भाषण ठोकु लागला. तेव्हा मला कळलं इथं आपलं काय ढिगाळ टेकत नाही. च्यामारी हे आणि असं असतयं भाषण! साने गुरूजींचा श्याम, कुणीतरी गॉर्की, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी॥ काय-काय! आणि काय-काय लक्षात ठेवणार अगदी पहिल्यांदाच विचारांचा महापुर माझ्या अंगावर पडल्यागत वाटलं आणि तो मी झेलु शकत नव्हतो. अगदी अंग अंग शहारून निघालं मन त्या हॉलबाहेर जाईचना. क्षणभर सर्वांचा विसर पडला. हॉलमधील प्रत्येक वस्तु प्रत्येक क्षण मला बरंच काही शिकवित होता. मेंदु जड झाला होता. हॉलमधील महात्मा गांधी , शिवाजी महाराजांचे फोटो मला इतिहासात खेचत होते,तर जवळच्याच काचेच्या तिजोरीतील विज्ञानाचे साहित्य मला गुरूत्वाकर्षणाप्रमाणे खेचत होते. तसे मला कळुन चुकले की,असेही गुरूत्वाकर्षण असते जे जमिनीकडेच न खेचता आभाळाकडेही खेचते! बघता बघता माझ नाव पुकारलं विद्यामंदिर झुलपेवाडीचे बाबुराव खेडेकर, पुढं जाणं भाग होतं.
भाषणाच्या लाकडी बाकाएवढी माझी उंची नसल्याने मला बाजुला माईक दिला गेला. जेवढं मी आतापर्यंत इतरांचं ऐकलं होतं आणि जेवढं आठवत होतं ते पाच मिनिटांत संपणार नसल्याने मी कुत्र पाठीमागे लागल्याप्रमाणे खडया आवाजात फडाफड सुरू केलं. आठवतात ते फक्त पहिले शब्द - अध्यक्ष
महाशय,पुज्य गुरूजी आणि माझ्या बालमित्रांनो पुढचं सर्व काय बोललो ते आजही आठवत नाही. ताठ उ
भा राहून समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत मी जे काही बोललो, जे हात वारे केले आणि माझ्या बोलण्याचा जो चढ उतार झाला. तो नक्कीच वेगळा आणि विशेष असल्याचं मला भाषणानंतरच्या टाळयामुळे समजले. मला झोपेतुन अचानक जागं झाल्यासारखं वाटलं. मलाच विश्‍वास बसत नव्हता की, मी काहीतरी केलयं. एका मोठया संकटांतुन सुटका झाल्यासारखं वाटलं आणि आता मनात हळु हळु विचार येऊ लागला. माझी शाळा, ही शाळा, माझ गाव, हे गाव आमच शेत त्यात मामाच्या शेतातली पेरू आणि आंब्याची झाडं.मामाच्या जनावरांचा गोतावळा मनावरची सर्व जळमटे निघाल्याने नविन सारवलेले घर स्वागतासाठी उभे आहे असे वाटले. मन अगदी हलकं होतं त्यात विचारांची भर पडत होती.
               अखेर निकालाची वेळ प्रार्थनेच्यावेळी ज्या बक्षिसाच्या आशेनं मी उभा होतो. ती आता इथल्या शिकवणीमुळे पार नष्ट झाली होती आणि चटकन मला आणि पकाला दुसरा क्रमांक विभागुन दिल्याचं पुकारलं गेलं. विश्‍वास तर बसत नव्हताच पण आगळा वेगळा असा अनुभव मी पहिल्यांदाच अनुभवला माझ्यापेक्षा जास्त आनंद आमच्या गावच्या पिंपळगाव विद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांना झाला होता. अखेर बक्षिसाची वही हातात पडली. ही माझी पहिली कमाई होती. हे माझं पहिलं भाषण होतं. हा माझा पहिलाच जाणकार अनुभव होता. आणि हाच तो ग्रामीण गरीबीत जगणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिसाच्या लक्षानं अनुभवलेला आयुष्यातला पहिलाच 'लक्ष्यवेधी' प्रसंग होता!
क्रमशः ... 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income