निरोप


बारावीचा निकाल लागला. मला ५१%मिळाली.  विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणुन डी.एड्.ला प्रवेश मिळाला
असता ! कारण तीच वाट मला माहित होती. पण दादानंआणि गावातील इतर लोकांनी डी.एड्.ची सुद्धा आशा सोडली होती. म्हणुन मी ही हातपाय गाळुन बसलो होतो. आता मला समजले होते, की मी विज्ञानशाखेसाठी योग्य नसुन मला कला शाखेत प्रवेश घ्यायला हवा होता. आमच्या दहावीच्या बॅचचा निकाल आणि आताचा बारावीचा
निकाल यात जमीन आसमानचा फरक दिसत होता. फारच उलथा-पालथ झाली होती. मी साने गुरूजी
वाचनालयाचा दत्तकपुत्र म्हणजे माझ्या या निकालावर सर्व गावचा रोश! तो त्यांचा अधिकारच होता म्हणा ! शिवाय
मला चांगले वाईट म्हणणारे दुसरे होते तरी कोण? मी करीत असलेले अमर मेडिकलमधील काम सोडले ; तशी गावात राहुन बी. एस.सी वगैरे करण्याची आशाही सोडली. एकदा उत्तुरला जाताना मनात कविता रेंगाळत होती. आणि त्याचवेळी मी रस्ता ओलांडत होतो. त्या दिवशी अपघातात मरता-मरता वाचलो होतो. हा प्रकार
नामुमामाला कळाला होता. दादाला त्यांनी माझ्यासमोर सांगितले., 'हे बघ, याला पण घेऊन जा मुंबईला.
इथं ते येडयागत कराय लागलयं!  असं म्हणत त्यांनी मलाही सल्ला दिला 'जायाचं आता मुंबईला, गावात
काय हाय? 
           माझ्याआधी गावातील बरीच माझ्या वयाची मुलं जिकडं-तिकडं फांगा-फांग झाली होती. माझा
मामेभाऊ सागर पुण्याला गेला होता. त्यामुळे मामीकडे मी राहणे मलाही उचित वाटत नव्हते.
जिकडुन-तिकडुन 'स्वत:च्या पायावर उभे रहा, गाव सोडा! असा सल्ला येत होता. मुंबईबद्दल माझ्या
मनात खुप गोंधळ होता. पुस्तकातुन आपण शिकलोय शहराची लोकसंख्या वाढल्याने प्रदुषण, रोगराई
, पाणिटंचाई ,वाहतूक कोंडी या समस्या निर्माण होतात. दुसरीकडे वडीलांनी जीवाची मुंबई केली होती. दादा मुंबईत दहा वर्षे राहतोय. तिकडील चकाचक कपडे, खानंपिनं, भाषा आणि इमारती या बद्दल मनात फार मोठं कुतुहलही होतंच. मुंबई आपली राजधानी म्हणजे एखादया स्वप्नासारखीच वाटत होती. मुंबईतला गणेशोत्सव तिथली
मोठी हॉस्पिटले,मुंबई उच्च न्यायालय, यासर्वांमुळे महाराष्ट्राची तिच्याशी घट्ट नाळ जोडल्यासारखे वाटत
होते. पण मनात असेही वाटायचे कि, आपल्या कोल्हापुरात आपल्याला स्थान का मिळु नये? गावात
रोजगार का मिळु नये?उद्योगधंदे शहरातच का? कोल्हापुरात आपला वशीला नाही; कोल्हापुर शहराचा
गावाशी संपर्कच नाही आणि सरकारवर आशा ठेवुन उपयोग नाही. अशा वेळी ज्याचे कोणी नाही त्याची
मुंबई, हे दादाचे वाक्य योग्य वाटे! 
             शेवटी जायची तारीख ठरली. मी गावभर दवंडी पिटवली कि, मी मुंबईला चाललो म्हणुन, भाराभर सल्ले मला मिळाले होते. माझ्या बालपणींच्या आठवणी मी जपुन ठेवलेल्या,
गोटया, माझी डायरी, मी न चुकता बॅगेत भरली. जायच्या दिवशी सकाळी दहा वाजता माझा जिवलग मित्र
अवी आणि मी आमच्या नेहमीच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे गावच्या गणपतीच्या देवळात गेलो. तो बडबड करत
होता. कदाचित त्याला ही मला निरोप दयावासा वाटत नसावे.  नेहमी बडबड करणारा मी, पण आज माझी
बोबडी वळाली होती. माझाच प्रदेश माझच गाव मला खायला उठवल्यासारखे अनोळखी वाटायला लागले
होते. जणु पक्षांना पंख यावेत आणि सर्वांनीच त्याला हवेत सोडावे तशी माझी गत झाली होती. मुंबईला
निघतेवेळी माझ्यासाठी पहिल्यांदा मी मामीला रडलेले पाहिले. तीन वर्षे मामीकडे मी काढली ब-याच चुका
केल्या, सुधारल्या, काळ ढकलत राहिलो. माझा सोबती सागर इथे आता नव्हताच. वैशाली ताईचं पण लग्न
झालेलं होतं म्हणजे घरातील सर्वच पाखरे निघुन जात होती. मामा, मी, दादा सर्व स्टॅन्डवर आलो. नको
म्हणतानाही म्हातारी आई स्टॅन्डपर्यंत लावुन दयायला आली होती. म्हातारी आई माझ्या जन्मापाासुनचा
आधार होती. 
           गावात दोनदा लाल डब्बा म्हणजे एस्. टी. यायची ती ही आलीतर आली. वडापसाठी
तास दोन तास थांबण्यापेक्षा चालत गेलेले बरे. म्हणुन आम्ही चालत पिंपळगावाकडे निघालो. मी न
रहावल्याने मागे म्हातारी आई कडे पाहिले आणि म्हणालो, 'आई जा तु माघारी,माझी काळजी करू नको!
तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर अश्रुंचे थेंब ओघळणारे पाहुन माझ्या मनात कालवा कालव झाली. न
पहिल्या सारखे करून मी पुढे निघालो. आणि थोडया वेळाने पुन्हा मागे पाहिले म्हातारी आई तिथेच उभी
होती. मला पाहुन तिने वर हात केला. एखादया नविन नवरीला नव-याघरी पाठवण्याचा प्रसंग मी अनुभवत
होतो. मी हात उंचावत पाठ फिरविली आणि आवंडा घोटत निघालो.मनात एकच विचार होता. म्हातारी
आईची एकच अपेक्षा असणार मी अजुन फक्त एकदाच मागे वळावे, मला ही वाटे मागे जावुन पुन्हा आईची
एक भेट घ्यावी. आणि तिला घट्ट बिलगावं पण तिचा तो रडवेला चेहरा मला पहावणार नव्हता.
'हाचि नेम आता न फिरे माघारी' असा निश्‍चय करून मी चाललो ...... क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income