उपवास


          माळकरी म्हटल्यावर एकादशीचा उपवास धरणे आलेच.इथे  मला हे कबुल करावे लागेल कि हे उपवासाचे व्रत अखंडपणे न चालता खंडित स्वरूपात मी चालवतोय. कामाच्या व्यापात हे उपवास कधी येवुन जातात कळत नाही तर कधी सवयीप्रमाणे काहितरी उपवासाला न चालणारी वस्तु खावुन पश्‍च्यातापात उपवास मध्येच सुटतो. आहारात बदल किंवा भक्तीभावाने देवाजवळ असणे वगैरे ठिक आहे पण् हे उपवास माझ्यासाठी अग्नी दिव्यच आहे! मुंबईत खानावळिला या उपवासादिवशी डब्बा नको सांगणे म्हणजे उपाशी राहणे होते.  कारण खिशात पैसेच नसायचे ना! अन्नाविना उपाशी राहणारे किती पुण्यवान? हा स्वामिंचा खोचक प्रश्‍न मला यावेळी उपवासाविषयी आठवायचा.  तशाही  ब-याच रात्री मी उपाशी झोपलोय. पुढे जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा याच एकादशीला मी 'एकादशी आणि दुप्पट खाशी! 'असे वर्तण केल्याचेही आठवते. 
       उपपवासाच्या दिवशी ब-याच विचारांचे काहोर माझ्या मनात माजलेले असते. भुतकाळातील सनावारांना माझ्या घराशी कांही संबध नसायचा हे आवर्जुन आठवायचे. दिवाळीच्या पणत्या दुस-याच्या दारातुन उचलुन मी माझ्या दारात आणुन ठेवायचो. कित्येक दसरे गोड शि-यावर आई भागवायची. संक्रातीला तिळगुळ घेण्यासाठी आईकडे पैसे मागायचे धाडस माझ्यात नसायचे.गणपतीत मुंबईत जो डि.जे लावुन धागडधिंगा चालतो आणि फटाके वाजवुन प्रदुषण केले जाते त्याला जो माझा नेहमीचा विरोध असतो त्यामागेही एक घटना आहे! फटाके कधी विकत घेतल्याचे मला आठवत नाही. लहानपणी याच उत्सवात एकदा पंढरी अन्नाच्या दुकानासमोर बरीच मुले फटाके वाजवत होती. कारण पंढरी अन्ना सर्वाना कसल्यातरी आनंदाने फुकट फटाके वाटत होता. हि संधी माझ्यासाठी हौस फेडुन घेण्यासाठी पर्वणीच होती. बराच वेळ विविध त-हेने विविध फटाके वाजवले. हातात पाऊस घेवुन उडवण्याचा पराक्रम करण्याची अवदसा मला त्यावेळी  सुचली. दुर्देवाने पाऊस हातातच फिरल्याने माझे आवडते नविन टेरिफॉटचे शर्ट कडले व मलाही  भरपूर भाजले गेले. धावत घरी गेलो तर  नवा शर्ट खराब झाला म्हणुन घरात आईकडुनही बेदम मार मिळाला होता.
             आमच्या शेतातील म्हसोबाला मांसाहार लागतो. दरवर्षी सर्व शेतकरी मिळुन बकरे कापतात व वाटे करून मटण खातात. त्यावेळचा रक्तीभात फार चविष्ठ असतो. एकदा या मंडळिंनी ३०० रूपयांचा एक
वाटा असा निर्णय घेतला.  तो महागडा वाटा घेणे आम्हाला त्यावेळी   परवडणारे नसल्याणे नंतर केव्हातरी कोंबडी देण्याचे सांगत आईने हा प्रस्ताव नाकारला.  हा अंथरून पाहुन पाय पसरण्याचा बंडाचा झेंडा या प्रकरणावरून मी अभ्यासत होतो. सध्या मलातरी मांसाहार कितीही महाग झाला तरी कांही फरक पडत नाही कारण मी शाकाहारी बनलो आहे.
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income