राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर


नवी दिल्ली 3 : वर्ष 2021 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी  रात्री जाहीर झाले. या पुरस्कारांचे वितरण 13 नोव्हेंबर 2021 रोजी एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.

 

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी 12 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार तर 35 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासह  द्रोणाचार्य श्रेणीतील जीवनगौरव पुरस्कार आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार असे एकूण 10  खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर झालेले आहेत. याशिवाय ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देशातील 5 खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. 2 संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला  मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी ची घोषणा करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. अंकिता रैना यांचा जन्म गुजरातचा असून वर्ष 2007 पासून त्या पुणे येथे टेनिसचे प्रशिक्षण घेत आहेत.  बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्या खेळाडूंची कामगिरी सलग चारवर्ष कौतुकास्पद अशा खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते. 

खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो.  खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी  या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी  आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली जाते.

खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉरपोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना  राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरिवण्यात येते.  आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income