किल्ला अभ्यास

*🚩★ चाकण किल्ला / संग्रामदुर्ग ★🚩*

*{ पुणे जिल्हा }...*

*किल्ल्याचा प्रकार: भुईकोट*
*चढाई श्रेणी: सोपी*
*जिल्हा: पुणे*
*तालुका: खेड*

पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकणचा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे.
याबाबत शासनाने योग्य उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक व येथील नागरिक करीत आहेत.

*इतिहास*
शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा; स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा नेक, विश्वासू सहकारी हि पदवी, किल्लेदारीची वस्त्रे आणि प्रेमानी उचंबळुन भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, सजवला आणि अतिशय मेहेनतीने राखला.
मुघल बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता. संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग; पण खांद्काने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खडकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते.
हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला; तोफा – बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती, तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग निकामी करता आले असते. ३००-३५० मावळ्यांनिशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.
अखेर १४ ऑगस्ट १६६० या दिवशी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेकडील कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे मराठेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले.
चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही, संग्रामदुर्ग किल्लाही खाना कडे पाहून तेंव्हा खदाखदा हसला असेल, पण आता मात्र शासनाच्या अनास्थेने ढसाढसा रडत असेल.

पुढे सन १६७०च्या सुमारास मराठय़ांनी चाकणचा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने चाकणचा किल्ला जिंकून घेऊन त्याचे पुन्हा इस्लामगड असे नामकरण केले. पुढे १ नोव्हेंबर १७०४ रोजी औरंगजेबाने चाकण ऊर्फ इस्लामाबाद हे नाव बदलून मोमिनाबाद असे नाव ठेवलं. सन १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांचा दक्षिणेतला सुभेदार निजाम याच्या ताब्यात चाकणचा किल्ला होता. २९ नोव्हेंबर १७५५ रोजी चाकण मराठय़ांच्या ताब्यात आला. इंग्रज अधिकारी व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने सन १८१८ मधे इंग्रजांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला त्याचे वर्णन केले आहे. ले.क.डिकन २१-२२ फेब्रुवारीपर्यंत शिरुरला होता. तिथुन तो २५ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रज सैन्य व आपल्या तोफदलासह चाकणला आला व पुण्याहून आलेली आणखी एक तुकडी त्याला मिळाली. निजामाचे सैन्यदेखील इंग्रजांच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून चाकणवर तोफांचा भडीमार केला. बारा पौंडी तोफगोळे किल्ल्यावर आदळू लागले. किल्ल्याच्या दक्षिणेला सतरावी मद्रास तुकडी व आणखी एक गट नेमला होता. उत्तरेकडे निजामाचे सैन्य व त्याबरोबर इंग्रज कॅप्टन डेव्हिस हा होता. सकाळी किल्ल्यातुन थोडाफार प्रतिकार झाला. किल्ल्यातील सैन्य तोफांच्या भडीमाराने पोळून निघाले व शेवटी संध्याकाळी मराठय़ांनी शरण येऊन किल्ला इंग्रज अधिकारी कर्नल डिकन याच्या हवाली केला पण त्याआधी चार पाच इंग्रज अधिकारी त्यांनी यमसदनी धाडले. या किल्ल्याने इतिहासात आपले नाव कमावले ते त्याच्यातील ३५० माणसांनी दाखविलेल्या अतुल पराक्रमामुळे. फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने शाहिस्तेखानच्या प्रचंड मुघल सेनेला ५६ दिवस रोखून धरले. एक छोटी गढी मिळवण्यासाठी मुघल सेनेला इतके झुलविणे म्हणजे फार मोठा पराक्रमच म्हणावा लागेल.

*माहिती*
२०१२ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात यास एक वर्षाचा कालावधी लोटूनही किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामास सुरुवात झालेली नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income