कल्याण लोकसभेचा राजकीय, सामाजिक प्रवास


*वास्तव* :-  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या कल्याण लोकसभा क्षेत्रात झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर सारख्या महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद  यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. स्मार्ट शहराचं समस्यांचे शहर अशी ओळख निर्माण झालेली आहे. डोंबिवली आणि अंबरनाथ  या दोन्ही एमआयडीसी नागरी वस्तीत निर्माण झाल्या का ? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारती, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यांनी नागरिकांची पाठ सोडलेली नाही. अनधिकृत बांधकामे हे कल्याण डोंबिवली महापालिकेसमोरील सर्वात मोठे संकट आहे. कल्याण मध्ये मेट्रो येऊ घातली असली तरी कल्याण आरटीओ मीटरवर रिक्षा चालवायला असमर्थ ठरत आहे असेच म्हणावे लागेल. अमृत योजनेकडे येथील नागरिक डोळे लावून बसले असून पाणी टंचाई हाही येथील कळीचा मुद्दा आहे. वाढीव घरपट्टी हा प्रत्येक महानगरपालिकेत सध्या वादाचा विषय बनत चालला आहे तो इथेही आहे. दिवा,कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ  डम्पिंग ग्राउंडवर ठोस उत्तर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांना सापडलेले नाही. रेल्वे पटरीला समांतर रस्ता आणि जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या ठाण्याला जलदगतीने पोहोचण्याचे स्वप्न येथील नागरिकांच्या मनात आहे. उत्तम आरोग्य व्यवस्था, उच्च शिक्षणाची सोय आणि रोजगार निर्मिती या काही प्रमुख मागण्या येथील नागरिकांच्या आहेत. पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हि माफक अपेक्षा नागरिकांना करावी लागते इथेच खरी मेख आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. 

*इतिहास* :- कल्याण म्हटले कि  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्रकन समोर येतो. कल्याण लोकसभेत येत नसला तरी कल्याणची ओळख असलेला दुर्गाडी किल्ला येथेच महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली. त्यामुळे कडोंमपा आरमाराची प्रतिकृती येथे उभी करणार होती मात्र तो प्रस्ताव सध्या लालफितीत अडकला आहे. शिवकाळात कल्याण हे खाडीकिनारावरील कोकणातील महत्वाचे ठाणे होते. डोंबिवलीतील खिडकाळेश्वर आणि अंबरनाथ मधील शिवमंदिर हि पुरातन मंदिरे लाखो भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. श्री मलंगगड हे नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थानही भाविकांना खुणावत आहे. याच मलंगगडाच्या भक्कम तटबंदीचा सहारा घेता येईल म्हणून इंग्रजांनी दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी नेवाळी येथे सैनिकी विमानतळासाठी जागा निश्चित केली होती. कल्याण मधील मिलिटरी कॅम्प असलेल्या उल्हासनगर शहराची वाढ इतकी झाली कि १३ चौरसकिलोमीटर अंतर्गत एक महानगरपालिका वसलेली आहे. 

*कल्याण लोकसभा क्षेत्राचा राजकीय प्रवास*
सध्याचा शासकीय ठाणे जिल्हा पूर्वी एक लोकसभा मतदारसंघ होता. स्वतंत्र भारतात पूर्वी काँग्रेसचाच वरचष्मा दिसतो. मात्र काँग्रेसेतर विचारधारा झपाट्याने रुजलेल्या काही मतदार संघापैकी ठाणे हा मतदारसंघ आहे. जनता पार्टीच्या स्थापनेनंतरच्या १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेतून रामभाऊ म्हाळगी निवडून गेले. त्यांच्या मृत्यूपश्चात १९८२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत अंबरनाथचे तत्कालीन भाजप आमदार जगन्नाथ पाटील लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरच्या १९८९ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी कल्याण मध्ये १९७८ पासून आमदार असलेल्या रामभाऊ कापसे यांना भाजपकडून संधी देण्यात आली. रामभाऊंनी सदर निवडणूक जिकली आणि मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी तोडगा काढला. रेल्वे तिकीट घर, पादचारी पूल, पोस्ट ऑफिस हि त्यातीलच काही कामे.  त्यानंतरच्या १९९१च्या निवडणुकीतही ठाण्यातून रामभाऊ कापसे निवडून गेले. दरम्यान १९८९ मध्ये शिवसेना भाजप युती झाली. सन १९९५ मध्ये युतीला राज्यात मोठे यश मिळाले मनोहर जोशी यांचे सरकार स्थापन झाले. या सरकारात कल्याणचे भाजप आमदार जगन्नाथ पाटील यांना उत्पादन शुल्क आणि पर्यटन मंत्रिपद तर अंबरनाथचे सेनेचे आमदार शाबीर शेख यांना  कामगार व अवकाप मंत्रिपद देण्यात आले. 
               कल्याण लोकसभेचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या जोरावर येथे उमेदवार राजकारण करत होते. रामभाऊ म्हाळगी मूळचे पुण्याचे पण निवडून आले ठाण्यातून. सेनेने युती केल्यानंतर १९९६ साली हि लोकसभा लढवली आणि आनंद परांजपे येथे निवडून आले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्रकाश परांजपे यांनी हा गड राखला. विठ्ठलवाडीचा आणि काटेमानिवलीचा पूल हा त्यांच्याच काळात झाला.  सन २००८ साली झालेल्या मतदारसंघ विभाजनात ठाणे जिल्ह्यातील दोन लोकसभेचे सहा लोकसभा क्षेत्रात विभाजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांना शिवसेना भाजप युतीच्या आनंद परांजपे यांनी हरवले. परांजपे यांनी यानंतर राष्ट्रवादीची वाट धरल्याने त्यांचा वारू रोखण्यासाठी २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे या तरुण उमेदवाराला युतीतर्फे संधी देण्यात आली. मोदी लाटेत आणि भाजप सेना युतीच्या कसदार मतदारसंघात श्रीकांत शिंदे विजयी झाले आणि त्यांचे नेतृत्व फुलत राहिले. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार  आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अशा वातावरणात कल्याण लोकसभा क्षेत्रात अनेक विकासकांना मूर्तरूप शिंदे यांना देता आले. कल्याणचा पत्री पूल, अमृत योजना याची मुहूर्तमेढ याच काळात रोवली गेली. 
            भाजप सेना युतीत २०१९ ची लोकसभा लढवली गेली त्यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या मतदानात विक्रमी वाढ झाल्याचे दिसले. त्यानंतर विधानसभाही युतीत लढवली गेली मात्र बंडखोरी निवडणुकीदरम्यान शिगेला गेली होती. निवडणुकीनंतरही युतीला मतदान केलेल्या मतदारांचा घात करत सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. मात्र हि अनैसर्गिक आघाडी फुटली आणि त्यामध्ये मोलाचा वाटा राहिला तो कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे  वडील एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांच्या तथाकथित उठावानंतर पुन्हा युतीचे सरकार राज्यात विराजमान झाले असून भाजपने मात्र आता कल्याण लोकसभा क्षेत्रात पक्ष मजबुतीकरणावर भर दिला आहे. भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नाना सूर्यवंशी यांच्यामते आनंद परांजपे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर तेंव्हाच भाजपने दावा करायला हवा होता मात्र ती संधी भाजपने घालवली. केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे लाभार्थी कल्याण लोकसभेत जास्त असून त्यांच्याशी भाजप कार्यकर्ते संवाद साधत आहेत. सध्या कल्याण लोकसभा क्षेत्रातील सहा पैकी तीन आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे या लोकसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढलेली आहे. 
*--बाबुराव खेडेकर*
मुक्त पत्रकार 
राजकीय सल्लागार 
९७०२४४२०२४

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income