योगगुरू अविनाश लोंढे लिखित स्वप्नपुर्ती !

*स्वप्नपूर्ती*.....

२००७ ची गोष्ट आहे त्यावेळी मी गडहिंग्लज ला कॉलेजला होतो.तेंव्हा मोबाईल येण्याची नुसतीच सुरुवात झाली होती. कॉलेजला जाण्यासाठी एसटी चा प्रवास. कॉलेज मध्ये चुकून एखाद्याकडं नोकिया चा ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल असायचा. त्यावेळी मोबाईलचं भरपूर अप्रूप वाटायचं .त्या ठराविक टोन पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटायच्या. नोकियाचा मोबाईल सुरू केल्यानंतर ते दोन्ही हात एकमेकांजवळ येताना असं वाटायचं दोन मनच एकमेकांजवळ येतात.
          मलाही नेहमी वाटायचं असा मोबाईल आपणही घ्यावा, आपल्याकडेही असा मोबाईल असावा पण पैसा आणायचा कोठून हा मोठा यक्षप्रश्न होता. त्यावेळी आमच्या गल्लीतल्या विजय बोरणाक ,आनंद जाधव आणि मला शेण खताच्या ट्रॉल्या भरायची आयडिया सुचली. एका ट्रॉली मागे ६० रुपये मिळायचे. सुरवातीला सर्जेराव बोटे, अशोक पन्हाळे सामील झाले. पण थोड्याच दिवसांत ते दोघे बंद झाले. नंतर जोतिबा पाटील, तुकाराम मेंगाणे ही पोरं आमच्यात सामील झाली. माझं कॉलेज पाच ला सुटायचे. घरी येईपर्यंत साडे सहा पावणे सात व्हायचे. सात वाजता म्हशीची धार काढायची. साडे आठ नऊ पर्यंत जेवणं व्हायची. आणि नंतर आमचं काम सुरु व्हायचं.
सूरज खवरेचा ट्रॅक्टर होता. गारी शेजारी तो ट्रॅक्टर लावायचा. ट्रॅक्टरच्याच लाईट मध्ये खतं भरायचो. दोनजण खत भरून घ्यायचे आणि दोन जण बुट्ट्या उचलून ट्रॉलीत टाकायचे. साधारण एक तास लागायचा. असे आम्ही एका रात्रीत दोन ते तीन ट्रॉल्या भरायचोच भरायचो आणि मिळालेले पैसे वाटून घ्यायचो.
         माझ्या डोक्यात तो नोकियाचा मोबाईल घिरट्या घालत होता. म्हणून मी ते पैसे वेगळेच ठेवायचो. साधारण दोन महिने हा आमचा उपद्व्याप चालू होता. माझी उंची असल्यामुळे माझ्याकडे बुट्ट्या उचलून टाकायचं काम होतं. त्यामुळे ट्रॉली किती भरली.... किती अजून बाकी आहे... याचा मला अंदाज यायचा.
     एके दिवशी जोतिबा म्हणाला... अवि किती बाकी आहे सांग...?
मी मजेतच म्हणालो "८० टक्के झालंय २० टक्के बाकी आहे" त्यापासून हिच पद्धत सुरू झाली. पोरं हसूनच वरचेवर विचारायची
"अवि किती टक्के बाकी आहे बघ".
          कधी कधी आम्हाला रात्रीचे एक दोन वाजायचे. मग इतक्या रात्री घरी जाऊन घरच्यांना उठवणे योग्य नाही म्हणून आम्ही सुरजच्या गिरणीतच झोपायचो. सकाळी लवकर उठून घरी जायचो आणि तयार होऊन कॉलेजला जायचो. कांही लोकं आम्हाला नावं पण ठेवायची.
"पोरं खताच्या ट्रॉल्या भरत्यात,ह्यासनी कुठं पैसं कमी पडाल्यात."
पण आम्ही कुणाचं मनावर घेतलं नाही. आमच्यात सगळ्यांचीच परिस्थिती बऱ्यापैकी होती. पण एक जिद्द होती. स्वतःच्या हिमतीवर हौस करायची. त्या दोन महिन्यांत मी जवळपास १७०० रुपये कमविले. आणि आता मला एक छोटं स्वप्न पूर्ण होताना दिसू लागलं.
मी नोकिया २३०० हा मोबाईल सेकंड हँडच विकत घेतला. पण माझं स्वप्न जसं ब्रँड न्यू होतं तसा तो मोबाईल पण मला ब्रँड न्यूच वाटू लागला. त्या पैशात एकाने चांगलं बूट घेतलं. एकाने अजून काय घेतले. मला आठवतंय त्यावेळी १ रुपये प्रतिमिनिट आऊट गोईंग कॉल होता. मी माझ्या रेशनकार्ड वर गडहिंग्लज मध्ये एअरटेलचं कार्ड घेतलं. कॉलेजला जाताना एसटी उत्तुरचा घाट चढून गेल्यावर मोबाईलला रेंज यायची. मोबाईलला रेंज येईल तेंव्हा येईल मी मात्र फुल्ल रेंज मध्ये होतो. कारण मी माझे एक छोटंसं स्वप्न पूर्ण केलं होतं.
             जसं म्हणतात ना पाहिलं प्रेम आणि पहिली नोकरी जशी विसरता येत नाही तसंच पहिला मोबाईल पण विसरता येणार नाही. त्यामागची मेहनत पण. आजच्या व्हाट्सएप,फेसबुक, इंस्टा, आणि व्हिडीओच्या जमान्यात त्या ब्लॅक अँड व्हाईट ची ओढ न्यारीच होती. आताच्या PUBG आणि लुडो पेक्षा त्यातल्या सापाची गेमच भारी होती.....
आजही ग्रामीण भागात जुनी माणसं असा फोन वापरत आहेत. त्याच मोबाईल वरून पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या मुला नातवंडांची खुशाली घेत आहेत. दूर असलेल्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपलं कौटुंबिक नातं टिकवून ठेवत आहेत...!

     - *अविनाश लोंढे*
       ९८२१८९६८२५
      मु.पो. बामणे, ता- भुदरगड
      जि - कोल्हापूर

Comments

  1. वा ! अवि तुझी पहिली कमाई सुद्धा छान होती आणि हि स्वतःच्या मेहनतीने हौस करण्यासाठी केलेली हि दुसरी कमाई सुद्धा कमालच आहे ! अवि आपल्या पार्वती शंकर ज्युनियर शाळेत फोन अलाऊड न्हवता. बारावी नंतर मुंबईत आल्यावर मि सुद्धा पहिला फोन घेतला. गावाकडे मजुरांना शेती व्यवसायाशी निगडित ठरावीक कामे हमखास भेटतात त्यातील हे एक काम तु केलेस आम्ही पण केले. याशिवाय आमच्याकडे गवंड्यांकडे घरावर कामाला जाने हा एक पर्याय जोरात होता त्यावेळी. विशेष म्हणजे अवि तु हे काम बालवयात केलेस हे नमुद करावेसे वाटते .... ग्रामीण भागात बारावी नंतर मुले काम शोधतात तर शहरात आजही पदवी झाली तरी शिक्षणातच डोके घालून बसलेले विध्यार्थी दिसतात ! असो, खुप सुंदर ! आपला इतिहास आपल्याला जीवन जगण्याची उमेद देतो. कोरोना सारख्या संकटातुन बाहेर पडून परिस्थितीवर मात करण्यासाठी हाच आपला संघर्षमय इतिहास नवी उर्जा देइल यात शंका नाही !

    ReplyDelete
  2. धन्यवाद बाबूराव

    ReplyDelete
  3. Khup Chan ahe lekh....Chan lihitos.....

    ReplyDelete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income