शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक संपन्न

राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष .अशोक चव्हाण यांच्यासोबत आ. विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाची आज दि ७ सप्टेंबर २०२१ रोजी वर्षा निवासस्थानी मराठा समाजाच्या विविध विषयांवर बैठक झाली. मराठा समाजाच्या अनेक मागण्या, विषय प्रलंबित आहेत त्यावर चर्चा होऊन खालील प्रमाणे निर्णय झाले.
१) मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगा मार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मराठा समाजाचा सर्वे करून अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे हे सिद्ध करून मराठा समाज मागास असल्याचे शासनाने जाहीर करण्यसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरु करावी;
निर्णय :- मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्याचा पाठपुरावा करून त्यावर लवकरात लवकर निर्णय  लागावा यासाठी प्रयत्न करणे, मराठा समाजाला मागास ठरवणे गरजेचे असल्याने सदरचा विषय राज्य मागास आयोगाकडे सोपवून त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गणपती विसर्जनानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावणे, विविध संघटनांच्या कायदेविषयक जाणकार व्यक्ती व प्रमुख नेते यांची बैठक बोलावून त्या संदर्भात निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
२) राज्य मागासवर्गीय आयोग हा न्यायिक आयोग असताना त्यावरील सदस्य हे जातीवादी किंवा जातीयवादी संघटनेचे प्रतिनिधी नसावेत, तसेच ते कोणत्याही जातीवादी व पक्षीय असता कामा नयेत. परंतु आत्ताचे सदस्य हे बहुतांशी जातीयवादी संघटनेशी संबंधित असून ते सतत मराठा समाजाच्या विरोधातील वेगवेगळ्या व्यासपिठांवर हजर असतात. म्हणून असा जातीयवादी सदस्य असणारा आयोग बरखास्त करून नवीन सर्वांना समान न्याय देणारे व जातीयवादी नसणारे सदस्य असलेला आयोग नेमावा;
निर्णय :- राज्य मागासवर्गीय आयोग सर्वसमावेशक करण्याचे मान्य करण्यात आले.
३) मराठा समाजाला ओबीसी समाजा प्रमाणे सर्व सोयी-सवलती आर्थिक तरतूद करुन  देण्याचा निर्णय घ्यावा.
निर्णय :- सर्व विभागांना मा. मुख्य सचिवांमार्फत पत्र पाठवून आठ दिवसात माहिती गोळा करून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सर्व सोयीसुविधा, सवलती देण्यासाठी, फी प्रतिपूर्ती व तत्संबंधी विषयासंदर्भात गणपती विसर्जनानंतर सर्व सचिवांसोबत बैठक घेणे ठरविण्यात आले.
४) मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी (ESBC) २०१४ व (SEBC) २०१८-१९ आणि इतर विभागाच्या पदभरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, त्या सर्वांना (सुमारे ५-६ हजार विध्यार्थी) न्यायालयाच्या निर्णयाचा बाऊ न करता, त्याचे कारण न सांगता त्वरित मंत्रिमंडळाने एकत्रितपणे निर्णय घेऊन नियुक्त्या द्याव्यात;
निर्णय :- या संदर्भातल्या सर्व कायदेशीर अडचणी दूर करण्याकरता शासन एमपीएससी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कायदा विभाग यांच्या समवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
५)     छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रामधील स्मारकाचे काम लवकर सुरू होण्यासाठी, त्यात बाधा येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करुन काम लवकर सुरु करावे;
निर्णय :- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी त्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करणे व त्या संदर्भात आढावा घेणे यासाठी स्वतंत्र बैठक लावण्याचे मान्य करण्यात आले.
६) सारथी संस्था पूर्ण ताकदीने कार्यान्वित करुन कायमस्वरूपी नियमावली बनविण्यात यावी  तसेच सारथी संस्थेचे सर्व विभागामध्ये कार्यालये ताबडतोब सुरु करावेत;
निर्णय :- सारथीतील भ्रष्टाचारावर निंबाळकर समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालात  निर्देश केलेल्या दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सारथी मध्ये विविध उपक्रम सुरू करताना त्यात सुसूत्रता आणणे व सर्व विभागात कार्यालय सुरू करताना त्यासाठी आवश्यक असलेली जागा, कर्मचारी, अधिकारी, त्याचा आराखडा या सर्वांचे नियोजन आर्थिक तरतुदीसह करण्याचा निर्णय घेण्यात आला.

७) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास किमान ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा;
निर्णय :- महामंडळास थेट कर्ज देण्याचे अधिकार देण्याचे मान्य करण्यात आले.
दिल्ली येथे प्रशासन सेवेत जाण्याकरिता तयारी करणाऱ्या सुमारे दोनशे ते तीनशे मुला मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचे मान्य केले.
मराठा समाजाच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या नावांमधून आर्थिक मागास शब्द काढून टाकण्यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचे मान्य करण्यात आले.
  


८) शासनाने प्रत्येक जिल्हात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या धर्तीवर छत्रपती    शिवाजी महाराज भवन किंवा मराठा भवन निर्माण करावीत;    

निर्णय :- यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे मान्य केले.

९) मराठा समाजाच्या ज्या मुला - मुलींना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना शासनाने भागभांडवल  द्यावे;
निर्णय :- यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे मान्य केले.

१०) मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व नोकरी द्यावी;

निर्णय :- यासंदर्भात ज्यांच्याबाबत अंमलबजावणी झाली नाही अशांची अधिक माहिती घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

११) पंजाबराव देशमुख वसतिगृह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करावीत;
निर्णय :- स्वीकारण्यात आले.

१२) कोपर्डी व तांबडीच्या नराधमांना फाशीची शिक्षा लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करावेत;
१३) तांबडी, ता. रोहा, जि. रायगड यांना मा. मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिल्यानुसार त्या कुटुंबास आर्थिक मदत व एकास नोकरी देण्यात यावी.
निर्णय :- कोपर्डी व तांबडी च्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे तांबडी येथील पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याचे शासनाचे आश्वासन पाळण्याचे व त्यावर विनाविलंब कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

१४) मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत;
निर्णय :- याबाबत आंदोलकांकडे असलेली माहिती तपासून त्याआधारे आंदोलनाबाबत, त्यांच्यावरील गुन्ह्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणे, यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री यांनी कबूल केले.

१५) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे सरकारने जागा भरण्याची विनंती केल्यानंतर MPSC ने जाहिरात देण्यापासून ते नियुक्ती पर्यंत चे वेळापत्रक बाबत निश्चित धोरण आखावे. मनमानी केल्याप्रमाणे कारभार नसावेत व त्यात विलंब करता कामा नये;
निर्णय :- मान्य करण्यात आले.

१६) EWS आरक्षणाचे लाभार्थी समाजास प्रमाणपत्र, अर्ज केल्यापासून कमाल ८ दिवसात देण्यात यावे व तसा आदेश काढावा.
निर्णय :- या संदर्भातील सूचना मा. मुख्य सचिव यांच्या सहीने सर्व प्रशासकीय विभागांना कळवण्यात येईल असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

सदरच्या बैठकीला मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण,  मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, विधी व न्याय प्रधान सचिव, हे शासना तर्फे आणि शिष्टमंडळातर्फे आ. विनायकराव मेटे, आ. डॉ. भारतीताई लव्हेकर, संदीप पाटील, राजन घाग, प्रफुल्ल पवार, श्रीकांत आंब्रे, अँड. अमोल करांडे,रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, . प्रियांका येरोळकर,. संदीप भूताळे हे उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income