आठवणीतील नागपंचमी :- संदीप मेंगाने

प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथाकार मा. संदीप मेंगाणे यांच्या आयुष्याच्या आठवणींच्या सरोवरातील  एका
अमृतमयी आठवणींचा सारांश...

 *आठवणीतील नागपंचमी**

               आषाढ संपला की श्रावणातल्या चैतन्यमयी उत्साहाने निसर्ग अगदी फुलून जातो.शिवार हिरवाईनं खुलून जातं. आणि असंख्य सोहळ्यांची पर्वणी घेऊनच जणू श्रावणाची सुरुवात होते. आणि मग एकापाठोपाठ एक अशा उत्सवाची जणू रांगच लागते. त्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. हा सण खास करून महिलांना खुप आवडतो.आमच्या घरी नागपंचमी च्या अगोदर पासूनच माहेरवाशीण पोरींची सोबत जुन्या जाणत्या महिलांची फेर धरून टाळ्यांच्या ठेक्यात नागोबाची, आणि येणाऱ्या पुढील सणांची गाणी रोज मध्यरात्री पर्यंत चालायची. माझ्या घरी मातीपासून बनवलेल्या पंचमुखी नागाची पूजा केली जाते. येणाऱ्या नागाची तयारी माहेरवासिनी आधीच महिनाभरापासून करायच्या. आमच्या घरात तर संपूर्ण गावच खेळायला असायचा. हा सण म्हणजे आमच्यासाठी जणू दिवाळीदसराच. प्रत्येक घरात नागाची मूर्तीपूजा केली जाते .पण माझ्या घरी मातीपासून अडीच - तीन फुटी उंच मूर्ती बनवली जाते. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती ही गावापासून दूर डोंगरातून आणावी लागते. पहाटे अंधारातून वारुळाची माती शोधून आणताना आणि डोक्यावर ओल्या मातीची पाटी घेऊन निसरडीची वाट चालताना खुप कसरत करावी लागायची. जीव मेटाकुटीला यायचा पण आजोबा , बापू आणि  बाबांच्या बरोबर माती आणताना नागाच्या गोष्टी ऐकत निसरडीची वाट कधी सरली हे कळायचं नाही. आणलेल्या मातीच्या लगद्याला हुबेहूब नागाचं रूप देणारा वाकबगार अवलिया श्री महादेव  कुंभार हे करत असत आणि आजही करताहेत. कुंभारमामा आजही न चुकता घरी येऊन मूर्ती बनवून जातात. त्यांनी बनवलेली मूर्ती पाहताच जणू समोर जिवंत नागच आहे की काय असं बघणाऱ्याला वाटते. पंचमुखी नागदेवतेची डौलदार मूर्ती पाहताच मन मोहून जाते. आजच्या या शुभ दिनी आम्हाला प्रकर्षाने आठवण होते ती  आजोबा , आई  आणि  बाबांची कारण या तिघांनीही त्यांच्या हयातीत नागपंचमी हा सण खूप मनोभावे आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला.माझे आजोबा खुप कडक शिस्तीचे होते. आजच्या दिवशी आजोबा खुप पथ्यांची पाळणूक करत कडक उपवास धरायचे. संध्याकाळी नागराजाची पूजा करून, लाह्यांचा नैवेद्य दाखवून रातभर अखंड जळती ज्योत लावली जायची. रातभर जागरण केली जायची त्यासाठी  भजन, सोंगीभजन तर कधी शाहीर गाणे असायचे. भजन, सोंगीभजन आणि शाहीर गाण्याच्या जुगलबंदीत रात्र कधी संपली ते कळायचं नाही.
                   बाबा शाहीर असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील शाहीर मंडळी न बोलावता या उत्सवाला हजर राहायचे. आजच्या दिवशी माझ्या घरात जणू साऱ्या देवी देवतांचेच आगमन झाल्यासारखे वाटायचे. काय वर्णन करू त्या सोहळ्याचे.....
काय तो गावातील आप्तस्वकीयांचा गोतावळा, काय ती पैपाहुण्यांची ओढ, काय त्या माहेरवासिनींच्या टाळ्यांच्या गजरातील गाण्यांचा जोश, काय तो रातभर चाललेल्या शाहीर - भजनी मंडळींचा चैतन्यमयी आनंद सोहळा आणि....  हे सारं मंत्रमुग्ध होऊन ऐकणारे श्रोते. नागपंचमी म्हणजे जणू साक्षात जन्म - मरणाचा विसर पाडणारा  हा अद्भुत सण. ही रात्र कधी संपूच नये असं वाटायचं.
               
              मनात नसतानाही डोळ्यातून न हटणारी ही मनमोहक मूर्ती आम्हाला सूर्योदय होण्या अगोदर  विसर्जित करावी लागते.मूर्ती विसर्जनानंतर जणू घरातून स्वर्गातला देव पुन्हा स्वर्गात गेल्याची जाणीव होते. त्या पाठोपाठ आलेले सर्व पै - पाहुणे, शाहीर मंडळी,साऱ्या माहेरवाशिणी देखील डबडबल्या डोळ्यांनी जेंव्हा निघून जातात तेंव्हा अखंड वैकुंठच रितं झाल्याची खंत मनाला स्पर्शून जाते. या गोष्टीचा खुप त्रास होतो. पण पुढच्या वर्षीच्या नागपंचमीच्या सणाची तयारी करण्याची उमेद मनात पुन्हा नवचैतन्य निर्माण करते.आज या नागपंचमीच्या सणाला आम्हाला पाहिल्याइतकी रंगत जरी आणता येत नसली तरी आम्ही त्याच श्रद्धेने, भक्तिभावाने, उत्सहाने आणि मनोभावे आजही नागराजाची यथासांग पूजा करतोय. आणि नागराजाकडे एकच मागणे मागतोय की त्याची निःस्वार्थ सेवा आमच्या हातून अशीच अखंड घडत जाओ.

                 आजोबांनी आपल्या नागदेवाच्या भक्तीचा आणि त्या निर्मळ श्रद्धेचा दिलेला परंपरागत वारसा आम्ही अखंडपणे पुढे चालवण्यासाठी नागोबा आम्हाला आशीर्वाद दिल यात शंकाच नाही.
                आजवरची नागराजाची निःस्वार्थ सेवा ही अखंड गुरुप्रसाद आहे. जो आम्हां भाग्यवंतांना मिळालाय........ !!!
     
 *मूर्ती करोनि करू तुझी पूजा ।भक्तीने आळवू तुला नागराजा ।।*

संदीप मेंगाणे.
7021463427.

*नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income