पनवेल महापालिकेची तिजोरी भरणार !


पनवेल महापालिकेचा शिलकीचा अर्थसंकल्प  
आरंभीची शिल्लक ९८ कोटी ४२ लाख ९३ हजार ४७६
सण २०१७-१८ मधील अपेक्षित जमा :- १२१२ कोटी ८२ लाख ८३ हजार ४७६
अपेक्षित खर्च : - १०३५ कोटी ७७ लाख ६१ हजार 
अखेरची शिल्लक :- १७७ कोटी ५ लाख २२ हजार ४७६


पनवेल :- बाबुराव खेडेकर 
            पनवेल महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी (दिनांक ३१ मार्च) आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मांडला.  नागरी सुविधांवर आणि महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या भूभागाच्या  नियोजनावर भर देणारा हा शिलकीचा असा हा अर्थसंकल्प आहे.आयुक्तांच्या अधिकारात नियोजन केलेल्या या अर्थसंकल्पात  मालमत्ताकराबाबत तसेच पाणीपट्टीबाबत दरनिश्चितीचे  कोणतेही खात्रीशीर  धोरण जाहीर केलेले नसून हा ढोबळ अर्थसंकल्प  महापालिकेच्या पहिल्या महासभेसमोर सादर करून मंजुरी घेण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.   
          रायगड जिल्ह्यतील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला.पत्रकारांसमोर अर्थसंकल्पाबाबत चर्चा करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे घटकनिहाय बारकावे न पाहता तरतुदीसाठी प्राधान्यक्रम देताना ढोबळमानाने रक्कम अंदाजित करण्यात आल्याचे आयुक्तांनी प्रांजळपणे कबूल केले. आयुक्तांनी घटकनिहाय तरतुदीचे कोट्यवधी निधींचे आकडे वाचून दाखविल्यानंतर पत्रकारांनी प्रश्नाची सरबत्ती सुरु केली. त्यामध्ये प्रामुख्याने सिडको हद्दीतील सदनिकाधारकांना मालमत्ताकर आणि पाणीपट्टी किती लागणार याची दरनिश्चिती,ग्रामीण विकासाचे धोरण,निवडणूक तसेच कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध याबाबत चर्चा करण्यात आली. घटकनिहाय तरतुदीच्या कार्यान्वयनासाठी त्या त्या क्षेत्रातील तत्ज्ञांचे मत जाणून घ्यावे लागेल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. 
           साधारणतः आकर्षक असा हा अर्थसंकल्प असून अपेक्षेप्रमाणे हजार कोटींपेक्षा जास्तीचा अर्थसंकल्प पनवेल महापालिकेने जाहीर केला आहे. यामध्ये ठोस कार्यक्रम महापालिकेने  जाहीर केला नसला तरी कांही महत्वाच्या  तरतुदी प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या आहेत. यामध्ये मालमत्ता करापोटी २०० करोड तर पाणीपट्टीपोटी १०० करोड पालिकेला मिळणार आहेत. त्याशिवाय विकास करापोटी ९० कोटी,स्थानिक उपकारापोटी ७० कोटी,जाहिरात करापोटी ६० कोटी,मुद्रांक करापोटी ५० कोटी तसेच सहायक करापोटी ४० कोटी , वाढीव एफएसआय शुल्क २० कोटी,मलनिःसारण करापोटी १० कोटी,इमारत परवाना शुल्कापोटी ५ कोटी,वृक्षकर २ कोटी  असा हा अर्थसंकल्प आहे.जीएसटीच्या अंमलबजावणी मध्ये महापालिकेला न्याय्य हिस्सा मिळविण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त केल्याचे यावरून दिसून येते. पनवेल नगरपरिषदेने उभारलेल्या अद्याप महापालिकेचा फलक तेथे न लागलेल्या एकमेव अशा आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके  नाट्यगृहाच्या भाडेपट्यापोटी १० कोटीचे उत्पन्न महापालिकेला मिळणार असल्याचे अर्थसंकल्पात तरतूद आहे. 
         सदर अर्थसंकल्पात शासकीय योजना आणि निधी यांचासुद्धा मोठा वाटा असणार आहे. यामध्ये एमएमआरडीए ६० कोटी,१४ वा वित्तआयोग ५३ कोटी,अमृत योजना ५२ कोटी,आवास योजना ५० कोटी,स्वच्छ भारत अभियान १० कोटी,नागरी दलितवस्ती सुधार १० कोटी,नगरविकास योजना १० कोटी,नगरोत्थान ५ कोटी शाळादुरुस्ती २५ कोटी असे बोलके आकडे दिसत आहेत. शासनाच्या मदतीने पनवेल महापालिकेची घोडदौड जोरात राहणार आहे. 
      विशेष म्हणजे  या अर्थसंकल्पात  ५० कोटींचा  आयुक्तनिधी राखीव ठेवण्यात आला आहे ज्यायोगे आयुक्त त्यांना योग्य वाटेल त्या  कांही महत्वाच्या बाबींवर खर्च करू शकतील.आस्थापना खर्च ४३ कोटी दाखविण्यात आला आहे.पाणीपुरवठ्यापोटी ४३७ कोटींचा खर्च महापालिकेला अपेक्षित आहे.त्याचबरोबर बांधकाम १९२ कोटी,आरोग्य १०१ कोटी,विद्युत सेवा ६० कोटी,उद्यानांसाठी ६० कोटी,भुयारी गटार ५२ कोटी,बाजरविकासासाठी ३० कोटी,परिवहन सेवेसाठी ३० कोटी सर्वांसाठी घरे पुरवण्यासाठी १० कोटी,दिव्यांग पुनर्वसनबाबत २ कोटी,आस्थापना खर्च ४३ कोटी असा एकूण १०३५ कोटी खर्च या अर्थसंकल्पात अंदाजित केला आहे.
      याशिवाय तलाव शुशोभीकरण ५० कोटी,शौचालय दुरुस्ती १५ कोटी, क्रीडा धोरण १० कोटी,सांस्कृतिक विभागासाठी ११ कोटी,स्मशानभूमी साठी ७ कोटी,फेरीवाला धोरण २ कोटी,घनकचरा व्यवस्थापन २२ कोटी,डम्पिंग प्रश्नासाठी १० कोटी अशाही तरतुदी आहेत. सदर अर्थसंकल्पाला मूर्तरूप येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल असेही यावेळी जाहीर करण्यात आले.   


प्रशासनाचा अर्थसंकल्प मांडताना हलगर्जीपणा 
पनवेल महापालिकेचा प्रथम अर्थसंकल्प कसा असेल याबाबत औत्युक्याने पत्रकार मंडळींनी आयुक्तांनी बोलावल्याप्रमाणे बरोबर ५ वाजता पालिकेत हजर राहिले होते. मात्र आयुक्तांनी यायला एक तास उशीर लावला. अर्थसंकल्पांची कोटींची उड्डाणे सादर झाली मात्र हि चर्चा केवळ चाय पे चर्चा राहिल्याने येत्या काळात काटकसर केल्याशिवाय पर्याय नाही अशीच चर्चा यानिमित्ताने होती. विशेष म्हणजे अर्थसंकल्प मांडताना प्रसिद्धीपत्रकसुद्धा यावेळी प्रशासनाने दिले नाही.  

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income