ना. रामदास आठवले यांनी जागवल्या पँथरच्या आठवणी

ना. रामदास आठवले यांनी जागवल्या पँथरच्या आठवणी 
ऐक्यासाठी मंत्रिपदसुद्धा सोडेन
पनवेलचा महापौर रिपाईचाच 
गोल्डन टेंम्पलप्रमाणे चवदार तळ्याचा विकास करणार !
महाड :- बाबुराव खेडेकर 
            भाजप हि बहुजनांची पार्टी आहे.भाजप मुस्लिमविरोधीसुद्धा नाही. मंत्रिपदासाठी मी कुठेही जात नाही तर मी जेथे जातो त्यांचा विजय होतो. त्यामुळे त्यांना सत्ता मिळते मग आम्हाला का नको अशी भूमिका रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या ९० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना स्पष्ट केली. देशाला बलवान करायचे असेल तर बाबासाहेबांच्या अनुयायांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे एकत्र या अशी हाकही त्यांनी यावेळी समाजबांधवांना दिली.महाड नगरपरिषदेने चवदार तळ्याच्या विकासासाठी २० कोटींची मागणी केली असून गोल्डन टेंम्पलच्या धर्तीवर चवदार तळे विकसित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.   
           क्रांतिभूमी महाड येथे  चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त भीमअनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले,भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,आ. जोगेंद्र कवाडे,रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड,महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 
          यावेळी ना. रामदास आठवले यांनी आपल्या विनोदी चारोळ्यांनी आणि कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणाची सुरवातच त्यांनी अशी केली, 
   ''पावन केले होते माझ्या भीमाने महाडचे चवदार तळे ,
म्हणूनच आम्हाला खायला मिळाली आरक्षणाची फळे ! 
मी कापणार नाही कुणाचे गळे,
कारण मला फुलवायचे आहेत ,
बाबासाहेब आणि शिवरायांच्या विचारांचे मळे !
ज्याचे जाळे त्यालाच कळे....  
माझ्या भीमाने खुले केले आहे, तुमच्यासाठी गावागावातील तळे ! ''
             डॉ बाबासाहेबांच्या चवदार तळे आंदोलनाचा इतिहास ना. आठवले यांनी आपल्या भाषणात सांगत असताना डॉ बाबासाहेब हे हिंदू धर्मात फूट पाडू इच्छित न्हवते तर हिंदू धर्मातील विषमता त्यांना नष्ट करायची होती. बाबासाहेब संघर्षशील मनाचे मात्र शांत वृत्तीचे होते. त्यांना शांतीसाठी क्रांती हवी होती असेही ना. आठवले यावेळी म्हणाले.आज चळवळीत लाखो उच्चशिक्षित आहेत,सर्व समाजातील लोकांना रिपाईचे पक्षात घेतले आहे हे सांगतानाच त्यांनी एक चारोळी सांगितली,'' बाबासाहेबांनंतर..  
बघा हा मंत्री झालाय पँथर ;
ते हि बऱ्याच वर्षांनंतर... '' 
           भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसते तर चहा विकणारे पंतप्रधान झाले नसते असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हा त्यांच्या बंगल्यासमोर बुद्धाची मूर्ती त्यांनी बसविली. गांधीनगर येथेही बुद्धाची मूर्ती आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदु असले तरी बुद्धावर प्रेम करणारे आहेत  असेही ना. आठवले यांनी सांगितले. भाजपशी युती केल्यामुळे आपल्यावर टीका होते याचा उल्लेख करीत ना. आठवले यांनी आपली वैचारिक युती नसली तरी राजकीय युती असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा भगवा हा बुद्ध धर्माचाच आहे. ''माझ्या हातात राहणार कायम  झेंडा निळा, 
म्हणूनच विरोधकांच्या पोटात उठतोय गोळा !''  असेही ते यावेळी म्हणाले. पनवेलचे  महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे तेथे भाजप युतीचा आणि रिपाईचाच महापौर बसणार असं सांगत त्यांनी जगदीशभाई गायकवाड यांनाही राजयोग असल्याचे सूचित केले. गोल्डमॅन जगदीशभाई गायकवाड यांचे सोने दिसले नसल्याबाबत त्यांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले. त्यावेळीही हास्याची कारंजी उडाली. कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक जिंकण्यासाठी मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतानाही त्यांनी एक चारोळी सांगितली ,
''मला सगळीकडे फिरवले,
आणि शिर्डित न्हेऊन हरवले !
      एकंदरीतच  चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त रिपाईने आपली दिशा ठरवलेली जाहीर केली असून सर्व समाजबांधवांना या चळवळीत शामिल होण्याचे आवाहन खुद्द ना. आठवले यांनी केले आहे. भाजप सोबतच्या युतीमध्ये रिपाई पुरता रुळाला असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income