ध्वजोत्सव !

ध्वजोत्सव !
लिया हाथमे ध्वज कभी ना झुकेगा । कदम बढ रहा है कभी ना रुकेगा । 
                विजय रणांगणातील असो वा अन्य क्षेत्रातील; ध्वज हा पाहिजेच ! विजयाचे व विजयाकांक्षेचे प्रतिक असलेले ध्वज संघर्षमय मानवी जीवनात मान्यता पावलेले आहेत. विजयी, स्वतंत्र व ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रांना त्यांचा ध्वज वैभवशाली जीवनांचे रक्षण करण्यास व विकसनशील राष्ट्रांना ध्वज मागील पिढ्यांच्या रोमहर्षक पराक्रमांची व अतुलनीय स्वार्थत्यागाची आठवण करून देत असतो. अनेक राष्ट्रांच्या ध्वजाचा इतिहास रोमहर्षक आहे. ऑसट्रेलीयाच्या ध्वजाचा उदय युद्धातच झाला आहे. पुरातन ध्वज हे बहुतेक शुद्ध धार्मिकच होते असे अमेरिकेच्या ज्ञानकोशात निसंधीग्ध शब्दात सांगितले आहे. युद्धक्षेत्रात उतरण्यापूर्वी परमेश्वरी दैवी शक्तीचा वरदहस्त घेण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक ओढा असतो. अर्जुनाने आपल्या रथावरील मारुतीचे चिन्ह ध्यान करून आणून लावले असे वर्णन आढळते. इंग्लंडच्या पहिल्या एडवर्ड राजाने तर सेंट जॉनचे चित्र असलेला मंदिरावरील ध्वज एका मोहिमेत सैन्यासोबत आदरपूर्वक न्हेला होता. आणि त्यावेळी ध्वज घेवून आलेल्या पाद्र्याला दिवसाला साडे आठ पेन्सप्रमाणे वेतन दिल्याची नोंद जुन्या कागद पत्रात सापडते. यानुसार धर्म आणि ध्वज  यांचे नाते स्पष्ट होते. भारताचा तिरंगा मान्यता पावत असताना भगवा हा हिंदूंचा ध्वज केशरी रंगात शौर्याचे आणि त्यागाचे प्रतिक म्हणून घेण्यात आला. हिरवा मुस्लिमांना प्रिय म्हणून आणि पांढऱ्या रंगात इतरधर्मीय अशी रचना केल्याचे उल्लेख आढळतात. ध्वजातील रंग या प्रकाशलहरी मानवी भावभावनांवर प्रभाव पाडत असतात.दि वल्ड बुक एन्सायक्लोपिडीयात रंगांच्या आशयाचे विवेचन करताना अलीकडील लोक हे पूर्वीच्या लोकांपेक्षा कमी धर्मभोळे असल्याने रंगांचे प्रतीकात्मक महत्व कमी झाले आहे असा निर्वाळा दिलेला आढळतो. पण याहीपेक्षा रंग व प्रतिक यात स्थापित केलेल्या आशयाचा,ज्यावेळी ते प्रतीक वंद्य मानणारया लोकांच्याच जीवनात अभाव दिसू लागतो त्यावेळी तो रंग व प्रतीक अधिक निष्प्रभ व अर्थहीन बनतात. प्रतीकांचा आशयाच्या  केवळ शाब्दिक उच्चाराने समाजाचा स्तर उंचावत नाही तर तो प्रतीकातील आशय स्वतःच्या जीवनातून व्यक्तविण्याचा  बुद्धीपुरस्कार हव्यास धरावा लागतो. कोणीही आपल्या प्रतीकांचा कांहीही आशय सांगितला तरी जोपर्यंत त्याचा प्रत्यय येत नाही तोवर आशय टिकाव धरू शकत नाही. आर्यांचे स्वस्तिक हिटलरच्या जर्मनीने अंगिकारले होते. त्याच आर्यतत्वाच्या प्रतीकाखाली महायुद्धात निरनिराळ्या देशांना स्वस्तिकाच्या दर्शनाने अंगावर शहारे येत असे अनुभव आले. त्यामुळे युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो दक्षिण भारतातील एका मंदिरात स्वस्तिक कोरलेले पाहून,'' अरे हिटलरचे स्वस्तिक इथे कुठे !" असे उद्गार काढले.
          आज आपल्याला जे प्रजेचे राज्य प्रस्थापित करता आले आणि विजयाचा ध्वज हातात मिळाला आहे. तो सहजासहजी मिळालेला नसून त्यामागे संघर्षाची करूनकहाणी आहे. त्यामुळे एका दिवसापुरते खिशाला ध्वज प्रतीकृती लावून आणि हातात प्लास्टिकचे ध्वज घेवून देशप्रेम दाखवायचे आणि दुसऱ्या दिवशी स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावरील आपले ध्वज गोळा करून दाखवायचे या प्रकारबाबत गांभीर्याने विचारमंथन करून ध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. आपल्या देशात ध्वजप्रेम रुजवावे लागत नाही हे एक बरे आहे.अमेरिका या खंडप्राय देशात तीन संस्था ध्वजप्रेम नागरिकांत रुजविण्यात व्यस्त असलेल्या आढळतील.सिंधमध्ये दाहर राजांचा पराभव झाल्यापासून ते मोघल सम्राट औरंगजेबाचा दीन व पराजित अवस्थेत मृत्यू होण्यापर्यंत साऱ्या घटनांचा संकलित इतिहास हा एका विलक्षण प्रेरणेने भारलेल्या  आपल्या समाजाचे, राष्ट्राचे अस्तित्व कुठल्याही किमतीवर टिकविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या समाजाच्या विजयाचा इतिहास आहे. इंग्रजांशी या समाजाने केलेला संघर्ष हेही असेच रोमहर्षक प्रकरण आहे. सशस्त्र क्रांती,अहिंसात्मक चळवळ,सैनिकी क्रांती व अखेर सत्तांतराची तडजोड हे या संघर्षाचे प्रमुख घटक आहेत. इतकेच न्हवे तर त्या काळातील समाज सुधारणेची चळवळ, विविध समाजांच्या स्थापनेचा प्रयोग,वैज्ञानिक शोधांमुळे बदललेली स्थिती, पाश्चात्य शिक्षणाचे प्रयोग हे सर्वच या संघर्षाचे घटक मानले पाहिजेत. 
         मात्र आज आपली मने दिवसेंदिवस राष्ट्रभावनेसंदर्भात दुबळी आणि मरू घातलेली वाटत आहेत. भगिनी निवेदितांनी उल्लेखिलेल्या त्यागाच्या जागी वैषयिक भोग आले असून मोक्षाच्या जागी सय्यमहीन व विकारवश वर्तनातून सदचाराचाच कपाळमोक्ष होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शब्दाचा सुकाळ आणि कृतीचा दुष्काळ नाही असे एकही क्षेत्र नाही ! वैयक्तिक स्वार्थापलीकडे परमार्थ उरला नसून कर्मयोगाला दूर सारून व चारी पुरुषार्थ साधण्याचा हव्यास सोडून केवळ हरी-हरी म्हणण्यात परम अनर्थ आहे; याची जाणीव कोठे आढळत नाही असे एकूण कोरडे जीवन झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा ध्वजोत्सव करत असताना "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,अंतर्भाह्य जग आणि मन." या संत तुकारामांच्या विचाराने वाटचाल करावी लागेल. भारतीयांचे भौतिक जीवन आनंदमय करण्यासाठी देशाचे स्वातंत्र आबाधित राखायचे व ऐश्वर्यसंपन्न जीवन निर्माण करण्याच्या आड कोण आल्यास स्वाभिमानाने व सुसंघटीतपने येणाऱ्यांचा बिमोड करावयाचा ही संघर्षाची पहिली आघाडी उघडायला हवी. दुसरी आघाडी प्रत्येकाने आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या विकारांशी उघडून आपले मन विवेक व सय्यमाच्या सिंहासनावर आरूढ करायला हवे 
बाबुराव खेडेकर- पनवेल प्रतिनिधी 
(९७०२४४२०२४)

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income