कोल्ही कोपर गावचा शेवटचा एक गाव एक गणपती



पनवेल:-  बाबुराव खेडेकर 
              पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गाव येथील स्वयंभू गणपतीमुळे नावारूपास आलेले आहे .या गावात घराघरात गणपती बसत नसून गावाचे ग्रामदैवत असलेल्या चिंतामणीची सेवा हाच उत्सव येथे जल्लोषात साजरा केला जातो. गावातील एकोपा व परोपकारी वृत्ती वाढीसाठी गणेशोत्सव महत्वाची भूमिका पार पाडत आहे. हे गाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत असून कोल्ही कोपर गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे भाविक सांगत आहेत. असे असले तरी जेथे जाऊ तेथे चिंतामणीची सेवा करू असा निर्धारही गावातील कांही बुजुर्ग नागरिकांनी व्यक्त केला आहे. 
          कोकण आणि गणेशोत्सव हे नाते अतूट आहे. घरातील गणेशमूर्ती सामाजिक एकोप्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सव बनवून पूजन सुरु केले. त्यातूनच गणेश मंडळांचे पेव फुटले.मंडळांमध्ये स्पर्धा वाढली त्यामुळे गावात गटातटात कटुता निर्माण व्हायला लागली. त्यामुळेच सुजाण नागरिकांनी एक गाव एक गणपती हि संकल्पना राबविण्याचे ठरवले. त्यानुसार एका गावातील अनेक मंडळांना गावचा एकमेव गणपती बसविण्याची जबाबदारी देण्यात येऊ लागली. 
          पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गावाची गोष्ट कांही निराळीच आहे. या गावामध्ये स्वयंभू गणेश असल्यामुळे हजारो वर्षांची या एकमेव  गणपती पूजनाची परंपरा आजही कायम आहे. गावात घराघरात गणपती नसून गावकऱ्यांच्या मनामनात स्वयंभू गणेश विराजमान आहेत. त्यामुळे सार्वजनिकरित्या नामसंकीर्तन; आरत्या,गौरीपूजन,महाप्रसाद सर्व कार्यक्रम गावकरी या स्वयंभू गणेश मंदिरात करीत असतात. 
           कोल्ही कोपर गावात ३५० ते ४०० कुटुंबे राहतात. हे गाव नियोजित नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत आहे. त्यामुळे  कोल्ही कोपर गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे येथील भाविक सांगत आहेत. पुढीलवर्षी कोल्ही कोपर गावातच चिंतामणीची आपल्या हातून सेवा होईलच अशी खात्री नसल्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवाचा नूर कांही औरच आहे. 
         या उत्सवी परंपरेला  २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. येथील स्वयंभू गणेशाबाबतची माहिती  सांगताना  १९५० च्या दशकात मूर्तीबाबत नागरिकांना माहिती मिळाली तेंव्हा मूर्तीवर एक फूट सेंदूरचा थर होता. सेंदूर बाजूला केल्यानंतर मूर्ती प्रकटली त्यानंतर ग्रामस्थांनी येथे मंदिर उभारले. त्यांनतर दोनदा मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली.  


पनवेलमधील धाकटा खांदा येथेही स्वयंभू गणेशमूर्ती असल्यामुळे येथेही एक गाव एक गणपती हि परंपरा जोपासली जात आहे. गावातील एक गणपती आणि तोही विसर्जित न होणारा त्यामुळे हा इको फ्रेंडली गणेशोत्सव आहे असेही येथील तरुण सांगत आहेत.


Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income