Daily RamPrahar @  19 jully 2017


            प्रबोधनकार ठाकरे यांची जीवनगाथा आणि  गाथा पनवेलची हि दोन पुस्तके पानवेल अर्थात पनवेलची जुनी ओळख सांगतात.पनवेलकरांनी एकदातरी  वाचलीच पाहिजेत अशी हि पुस्तके आहेत.  मर्यादित लोकसंख्येचे गाव,श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचे द्वंद्व,पायाभूत सुविधांचा अभाव हि पनवेलची जुनी ओळख असली तरी खास संस्कृती,व्यापारी केंद्र आणि भाताचे कोठार,तलावांचे शहर अशी ओळखही पनवेलची होती. त्याच्या खुणा आजही जिवंत आहेत. धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचे येथील लोक आपले वेगळेपण जपत विकासाचा रस्ता धरून चालत राहिले आणि स्वतःची संस्कृती टिकवून  राहिले आहेत. कोकणाचे प्रवेशद्वार आणि पुणे मुंबईच्या मध्ये असलेल्या पनवेल शहरामध्ये राहण्यास आलेल्या नागरिकांनी पनवेलला पुन्हा सोडण्याचा विचारच केला नाही. त्यामुळे मूळचे पनवेलकर हा कांही दिवसांनी शोधाचा विषय बनेल यात शंकाच नाही. टपालनाका हि घाऊक  व्यापारपेठ कात टाकत नवा अवतार घेताना आढळत आहे. 'जुने जाऊद्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका' असाच कांहीसा परिवर्तनवाद येथे अनुभवायला मिळत आहे. बालाजी मंदिर येथील जगतगुरु तुकाराम महाराज यांचे स्मारक,पनवेल बंदरचे अस्तित्व सांगणारा दगडी खांब अशी अनेक ठिकाणे पनवेलच्या जागतिक व्यापाराची ग्वाही देतात. 
            पनवेलच्या भौगोलिक विस्थाराला मुंबई सारख्या मर्यादा नसल्यामुळे सिडको,नयना,एमएमआरडीए,एमआयडीसी,जिल्हा परिषद अशी सर्वच प्राधिकरणे पनवेल तालुक्यात काम करीत राहिली आहेत. केंद्रबिंदू असलेल्या पनवेल नगरपरिषदेच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सेवासुविधा देण्यासाठी आणि सुनियोजित गतिमान विकासासाठी पनवेलचे अभ्यासू आमदार प्रशांत ठाकूर  यांनी पनवेल महानगरपालिकेची स्थापन राज्यशासनाकडून करून घेतली आहे. खरेतर कोकणातील चाकरमानी मुंबई वा इतरत्र नोकरी व्यवसायासाठी जाताना आढळतो त्यामुळे दक्षिण कोकणातील गावे ओस पडत आहेत अशी तक्रार पाहायला मिळते. पनवेलचे भूमिपुत्र मात्र कोठेही फारसे जाताना दिसत नाहीत. उलट इतर ठिकाणचे लोक पनवेलला प्रथम पसंती देताना दिसत आहेत. ''येवा पनवेल आपलेच असा'' अशी भूमिका येथील प्रकल्पग्रस्तांची असल्यामुळेच लाखो लोकवस्तीच्या वसाहती पनवेलमध्ये वसल्या आहेत.  इतिहासात रमून राहण्यापेक्षा भविष्याचा विचार करण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन पनवेलकरांनी आणि येथील राजकीय नेत्यांनी ठेवल्यामुळेच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याअनुषंगाने येणारे नयना प्राधिकरण तसेच एशियातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल्स पनवेलमध्ये साकारत आहे. 
            मुंबईला पर्याय म्हणून नवीमुंबईची स्थापना करण्यात आली. त्या नवीमुंबईमध्ये पनवेल तालुक्याचा कांही भाग आहेच जो आता पनवेल महानगरपालिकेत आहे. मुंबईला पर्याय म्हणून न्हवे तर तिसऱ्या मुंबईचे केंद्रबिंदू म्हणून पनवेल विकसित होत आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. मात्र पनवेल महानगरपालिकेतील शिक्षण व्यवस्थेचा व्याप पाहिला तर पनवेल हे ''एजुकेशन हब'' आहे हे निर्विवाद सत्य समोर येईल. मुंबईला राजीव गांधी नॅशनल पार्क,राणीचा बाग आहे तर पनवेलला सुद्धा जगप्रसिद्ध कर्नाळा पक्षी  अभयारण्य,सेंट्रल पार्क आहे. पांडवकडा,देहरंग धरण यासारखी पर्यटनस्थळे आणि विरुपाक्ष मंदिर,गुळसुंदे येथील शिवमंदिर, यासारखी धार्मिक स्थळे पनवेलमध्ये आहेत. खारघर मधील इस्कॉनचे हरे राम हरे कृष्ण मंदिर तसेच संत निरंकारी संत समागम हे आध्यत्मिक उंची वाढवणारी ठिकाणे आहेत. रायगड जिल्ह्यात खोलवर रुजलेला '' श्री संप्रदाय'' सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपली आध्यत्मिक साधना आणि समाजसेवा यामध्ये अग्रेसर आहे.   
             श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,तालुका क्रीडा संकुल,कर्नाळा क्रीडा अकॅडमी,गोल्फ कोर्स हि क्रीडा संकुले पनवेलच्या क्रीडा संस्कृतीत भर घालण्याचे काम करीत आहेत. पनवेल महानगरपालिकेकडे प्रभागनिहाय क्रीडांगणे विकसित करण्याची नागरिकांची मागणी आहे. शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेलच्या सांस्कृतिक चळवळीत भर घालत आहे. पनवेलची खाद्य संस्कृती समुद्ध आणि खास अशी आहे. येथील आगरी कोळी समाजाचे मांसाहारी खाद्य जितके सुप्रसिद्ध आहे तितकेच शाकाहारींनाही उत्तम खाद्य येथे उपलब्ध असते. पनवेलची जुनी हॉटेल्स पहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि या हॉटेल्सला राहण्याची सुद्धा सोय आहे. केवळ रेस्टोरंट हि संस्कृती आता पनवेलमध्ये रुजत आहे. विमानतळामुळे रिअल इस्टेट,लॉजिस्टिक आणि हॉटेल व्यवसायाला येथे मोठी  उभारी  मिळेल यात शंका नाही. 
             या बदलत्या बहरत्या पनवेलसमोर आव्हाने मात्र खूप आहेत. नव्या महानगरपालिकेसमोर दोन मार्ग आहेत. पहिला उत्तम नियोजनाने नागरीकरण करणे आणि दुसरा म्हणजे गलथानपणे मुंब्रा,कौसा,दिवा अशी शहरे तयार करणे. पनवेलची सध्याची परिस्थिती दिव्यासारखी भीषण नसली तरी महापालिकेने किंवा नयना प्राधिकरणानेनवे बांधकाम परवाने देताना सांडपाणी कचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन,पाण्याची गरज आणि उपलब्धता,वृक्षारोपण,सौरऊर्जेचा वापर अशी बंधने घालून त्याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अतिक्रमणे रोखणे हे काम महानगरपालिकेला प्राधान्याने करणे गरजचे आहे. पनवेल परिसरात सध्या ५० हजार घरांची निर्मिती होणे हि महाराष्ट्राची गरज गरज आहे. नवे शहर निर्मितीला पनवेलसारखे दुसरे ठिकाण नाही. सध्या सिडकोचे मुख्य कार्यालय नवीमुंबईत आहे आणि सिडकोकडे यापरिसरातील कोणताही प्रकल्प नियोजनासाठी शिल्लक राहताना दिसत नाही. त्यामुळे शहरांच्या निर्माणासाठी सिडकोपेक्षा दुसरा पर्याय असूच शकत नाही. नवी मुंबई क्षेत्रात वसाहती निर्माण करताना ज्या चुका सिडकोने केल्या त्या सुधारून नवे शहर उभे करून दाखविण्याची संधी सिडकोला येथे आहे. 
       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत देशात सामान्य नागरिकांचा विचार हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे साधारण २०००० मासिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार केला तर कांही ठोबळ अंदाज समोर येतो तो असा कि, आज जर सीबीएससी बोर्डच्या शाळेमध्ये या कुटुंबातील मूल शिकणार असेल तर त्याला मासिक ८००० खर्च आहे; त्यानंतर घराचे भाडे किंवा हप्ता आणि मग त्या कुटुंबाचे पालनपोषण या बाबी येतात. अशावेळी कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे,परवडणारी घरे निर्माण करणे,शिक्षणाचा स्तर एक करून परवडणारे शिक्षण निर्माण करणे,आरोग्यसुविधा परवडणारी तयार करणे याबाबींकडे शासन लक्ष देत आहे. सर्वाना विमा संरक्षण आणि पेंशन हादेखील विचार सरकार करीत आहे. कॅशलेस सोसायटी आणि ऑनलाईन सेवासुविधा यामुळे पारदर्शक गतिमान विकासाचे मॉडेल उभे राहत आहे. यासर्वांचा अभाव ग्रामीण भागात असतो म्हणूनच जास्तीत जास्त स्थलांतर ग्रामीण भागातून शहरात होत आहे. तुलनेने कमी श्रमात रोजगार आणि सेवासुविधा शहरात मिळतात.  असे असले तरी माणूस निसर्गापासून जितका लांब पळणार तितका निसर्ग त्याचा घात करणार; हि बाब आता शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे जास्तीतजास्त इकोफ्रेंडली राहण्याचा कल शहरी नागरिकांचा दिसतोय. 
          पनवेल महानगरपालिका स्थापन झाली ती मुळात सिडकोच्या भोंगळ कारभाराविरोधात. म्हणजे सिडकोने  येथे  वाढवलेल्या  नागरीकरणाला सेवासुविधा निर्माण करताना अकार्यक्षमता दाखविली म्हणून लोकनियुक्त सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थेची मागणी नागरिकांना करावी लागली आहे. सुविधा निर्माणाचा केंद्रबिंदू मानव संसाधन आहे हेच सिडको विसरली होती. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या वसाहतींमधील कचरा उचलण्याची वेळ येते तेंव्हा सिडकोला लेबर पेमेंट इंडेक्स हा बी भार वाटतो. सात लाख लोकांना एकही बहुभाषिक ग्रंथालय सिडको उभारू शकले नाही. त्याचप्रमाणे मध्यवर्ती बसस्थानक,रुग्णालय,सांस्कृतिक भवन अशा एन ना अनेक मागण्या प्रलंबित राहिल्या. आता महानगरपालिकेकडून परवडणारी घरे,परिवहन सुविधा,परवडणारे शिक्षण,परवडणारी आरोग्यसेवा अशा प्रमुख आणि मापक अपेक्षा आहेत. पुढील ५० वर्षाचे सर्व घटकांना विचारत घेऊन समग्र नियोजन करणारी सल्लागार समिती असणे गरजचे आहे. ज्यामध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वजण सहभागी व्हायला हवेत. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income