मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत स्नेहसंमेलन



प्रशासकीय अधिकाऱयांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार 
नवी मुंबई :-  मुंबई व पुणे महानगरातील मार्डी ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दिनांक १२ फेब्रुवारी२०१७) नेरुळ मधील सेंट झेविअर्स हायस्कुलमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आणि मुंबईचे शिधावाटप नियंत्रक अविनाश सुभेदार तसेच सिने अभिनेता जॉकी श्रॉप हे  या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक डॉ माधव पोळ,कर्नल सुभाष पोळ,रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पोपट मलिकनेर,पुणे जिल्हा कोषाधिकारी संजय राजमाणे,एमएमआरडीएचे भूमी व्यवस्थापक काका देशमुख,सिन्नरचे तहसीलदार राजेंद्र पोळ,सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ केशव काळे,सरपंच कौशल्याताई पोळ,छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकर देशमुख यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती लाभणार आहे. 
 
        सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील मार्डी हे  ६००० लोकवस्ती असलेले गाव आहे.गावाचे  एकूण ३४०१ हेक्टर एवढे भौगोलिक क्षेत्र असून पाऊस चांगला पडला तर २५०० हेक्टर एवढे क्षेत्र लागवडीखाली येते. दुष्काळी भाग म्हणून महाराष्टात या विभागाची गणना होत होती. गेली ५ वर्षे वर्षाचे बाराही पाण्याचे टँकर पुरवावे लागणारे हे गाव होते.गेली सलग पाच वर्षे टँकरने गावाला पाणीपुरवठा केला गेला. शासनाला येथे गेल्या ५ वर्षांत  पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी सव्वा कोटी रुपये खर्च टँकरच्या बिलापोटी आला आहे. त्याचबरोबर जुन २०१२ ते सप्टेंबर २०१३ या १५ महिन्यात  ४ कोटी ५२ लाख ३१ हजार ६६२ रुपये एतका खर्च जनावरांच्या  चारा छावणीसाठी शासनाला आला आहे. २०१५ पर्यंत मार्डी गावात एकूण ४ पाझर तलाव,५४ नाला बांध आणि २९ बंधारे एवढे काम शासनातर्फे पूर्ण झालेले आहे. तरीही पाऊस नसल्यामुळे मार्डी गावाला पाणीपुरवठा व जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाला खर्च करावा लागत होता. दर्जेदार उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी याचीही वानवा येथे होती त्यामुळे गाव ओस पडत चालले होते. 
       मुंबई, पुण्याकडे विस्थापित झालेल्या या गावातील सुशिक्षित तरुणांनी यावर विचारविनिमय करून हा दुष्काळ कायमचा संपविण्याचा विडा उचलला. यातूनच मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना डॉ. माधवराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रतिष्ठानने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने व स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा या पाणलोट विकास कार्यक्रमाची मोहीम हाती घेतली.त्यामुळे येथील पारंपरिक शेतकऱ्याला जलयुक्त शिवार पाहायला मिळाले व या गावाची पाण्याची मागणीही कमी झाली. त्यासाठी येथे एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद असे चर काढण्यात आले. मार्च २०१६ ते जुलै २०१६ या काळात मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत  एकूण १७६ किलोमीटर लांबीचे डीप सीसीटीचे काम झाले आहे.त्यामुळे २०० मिलीमीटर पाणी अडवण्याची क्षमता येथे निर्माण झाली आहे. या कामाची पाहणी शास्त्रोक्त पद्धतीने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सोलापूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे निवृत्त भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. नारायण पेटकर यांनी केली. सदर काम शास्त्रोक्त पद्धतीने उत्तमरीत्या झालेले असून त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली आहे  असे  प्रमाणपत्र संशोधनाअंती डॉ पेटकर यांनी प्रतिष्ठानला दिले आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांनी दुबार शेती पिकवली आहे.खरीप हंगामात १५०० हेक्टर जमीन लागवडीखाली आली व रब्बी हंगामात ९०० हेक्टर जमीन लागवडीखाली आली. आताही पाणी उपलब्ध असून उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवावे लागणार नाही.जुनपासून गावामध्ये टँकर मागविलेला नाही.नागरिकांचा पाण्यासाठी वणवण करण्याचे श्रम आणि वेळ दोन्हींची बचत झाली आहे. शासनाचा यावर्षीचाही  जनावरांचा चारा आणि पाणी पुरवठ्यावरील खर्च वाचला आहे. असे असले तरी ५०० मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या या भागात अजून  ३०० मिलीमीटर पाणी साठवणक्षमता वाढवने गरजेचे आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. अर्थात अद्याप  ६० टक्के काम बाकी आहे .मार्डी ग्रामपंचायत व सर्व शाळेतील विद्यार्थी यांनी एक हजारांपेक्षा जास्त वृक्षारोपण केले आहे व २ क्विंटल झाडांच्या बिया डीप सीसीटी व इतर डोंगराळ भागात टाकलेल्या आहेत. मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानने पावसाचे सर्व पाणी अडवण्यासाठी कंबर कसली आहे. म्हणूनच प्रतिष्ठानने यावर्षी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.ज्या अनुषंगाने सर्व जलसंधारणाच्या योजना राबविण्यावर तसेच पाणी बचत आणि वृक्षारोपण यासाठी नागरिकांचे प्रबोधन यावर भर देण्यात येणार आहे.यासाठी पुढील काळात गावामध्ये चराईबंदी व कुऱ्हाडबंदी हा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. गावामध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यासाठीही प्रतिष्ठान प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे मार्डीसह आसपासच्या २० गावांची उच्च शिक्षणाची सोय होणार आहे. या सर्व  विकासकामांसाठी जनसहभाग महत्वाचा असणार आहे. त्यासाठीच  मार्डी ग्रामविकास  प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दिनांक १२ फेब्रुवारी२०१७) नेरुळ मधील सेंट झेविअर्स हायस्कुलमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सम्मेलनआयोजित केले आहे. या  स्नेहसंमेलनाला जास्तीत जास्त  ग्रामस्थांनी यावे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयातील वकील व प्रतिष्ठानचे सदस्य पांडुरंग पोळ यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी ९८६९४२३०९१ आणि ९६१९३६७१०१ या क्रमांकावर संपर्क करावा असेही त्यांनी सांगितले आहे. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income