झुलपेवाडी आणि साने गुरुजी वाचनालय



ज्ञान,मनोरंजन आणि विकास हि आवश्यक त्रिसूत्री अजेंड्यावर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील, आजरा तालुक्यातील झुलपेवाडी या गावच्या साने गुरुजी वाचनालयाची रौप्य महोत्सवी वाटचाल सुरु आहे.आज या गावाची ओळख सांगताना  दिल्ली वारी करून आलेले येथील भजनी मंडळ व तरुण भारत लेझीम पथक यांची जागा समर्थपणे साने गुरुजी वाचनालयाने घेतली आहे असेच म्हणावे लागेल. भुदरगड या घाट प्रांताला व कोकणाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक पायवाटेवरील हे गाव. येथील चिकोत्रा  नदीमध्ये पांडवांचे पाय लागून डोह तयार झाल्याच्या कथा आम्हाला लहानपणी सांगितल्या जायच्या. आज येथे चिकोत्रा मध्यम प्रकल्प हे धरण व धरणावरील गणेश मंदिर आणि वीजप्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गावच्या वरच्या बाजूस बेगवडे गावामध्ये पांडवांनीच एका रात्रीत बांधलेले देऊळ पाहायला मिळेल. पानझडी वृक्षामुळे आजरा तालुका असला तरी भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्याशीच जवळीक साधणारे हे गाव आहे. पूर्वी चंदगड हा विधानसभा मतदार संघ होता आज त्याचा संबंध कागल मतदार संघाशी जोडला गेला आहे. पारंपारिक शेतीची जागा आता बागायती शेतीने घेतली असून ऊस,भात,गहू,भुईमुग,ज्वारी ई. पिके प्रामुख्याने येथे घेतली जातात.पूर्वी चिमणे आणि झुलपेवाडी एकत्र गावे होती नव्वदीच्या दशकातच विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे शिवधनुष्य गावातील शिक्षकांनी (गावात १० शिक्षक आहेत)व जाणकार नेत्यांनी लीलया पेलले त्यामुळे हे गाव शासनाच्या यादीमध्ये आदर्श ग्राम म्हणून समोर आले. येथील गावांचे ग्रामदैवत भावेश्वरी असून येथील यात्रा म्हणजे अविस्मरणीय अशीच असते. हरीनाम सप्ताहाची परंपरा असणारे गाव म्हणूनही झुलपेवाडीची ओळख आहे.ग्रंथालयाच्या वर्धापनदिवशी दरवर्षी ग्रंथदिंडी सुद्धा काढली जाते. शैक्षणिक,क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात साने गुरुजी वाचनालय हि बिगरराजकीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था मोलाचे  काम करत आहे.  १९९१ पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून एक गाव एक गणपती या संकल्पनेसाठी वाचनालयाने घेतलेला पुढाकार मी अनुभवला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन,प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक महोत्सव याबाबत वाचनालय आजरा तालुक्यात प्रसिद्ध आहे. झांज पथक,लेझीम पथक, सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा विभाग, भव्य व्यासपीठ हे सर्व वाचनालयाने गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीत बनविले आहे. संस्थेचे अध्यक्ष तानाजी पावले (पावले गुरुजी)यांनी वेळप्रसंगी घरातील दागिने गहाण ठेवून संस्थेच्या कामासाठी निधी उपलब्ध केला असल्याचे गावकरी सांगताना आढळतील. संस्थेचे कार्यकारी मंडळ गावच्या विकासासाठी निरपेक्ष भावनेने काम करत राहिले म्हणूनच  आजरा तालुक्यात "ब" वर्ग मिळवणारे हे दुसरे वाचनालय ठरले आहे. उत्तूर पंचायत समिती हा कोल्हापूर जिल्ह्याच्या नियोजनात दुर्लक्षित राहिलेला भाग मात्र लोकसहभागातून लोकांची समस्या सोडवता येवू शकते शिवाय इच्छा असेल तर सरकारी मदत मिळत नसतानाही एखादी संस्था काय काय करू शकते याचा परिपाठ या संस्थेने घालून दिला आहे. आदर्श ग्रंथपाल पुरस्कार,आदर्श वाचक पुरस्कार, आदर्श नागरिक पुरस्कार, हे नित्यनियमाने दरवर्षी शालेय विध्यार्थ्यांचे गुणगौरव करताना संस्थेमार्फत दिले जातात. त्याचबरोबर गरीब गरजू विध्यार्थ्याला दत्तक घेवून त्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचे कामही संस्था करत आहे. अनेक संस्था, मुंबई मित्र मंडळे आणि परोपकारी नागरिकांच्या देणगीमधून संस्थेचे सामाजिक कार्य चालू आहे. शासनाच्या सर्वच योजना अत्यल्प निधी देत असल्यामुळे संस्था चालविणे हा प्रयोग भल्याभल्यांना घाम आणणारा असतो पण कर्म हेच ईश्वर मानणारे लोग माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहिले तरच उद्याच्या पिढीसाठी अच्छे  दिन येतील असे संस्थेचे अध्यक्ष सांगतात. यावर्षी आजरा तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून पावले गुरुजींची बिनविरोध निवड झाली आहे. साने गुरुजींचे समाजसेवेचे कार्य खऱ्या अर्थाने हि संस्था पार पाडत आहे याची प्रचीती संस्थेला भेट दिल्यांनतर जाणवते. विकासयात्रा शहराकडून गावांकडे येत असते त्यामुळे गावातील बरेच तरुण शहरांकडे विस्थापित होत असून गावच्या विकासासाठी हातभार लावण्याची इच्छा बाळगतात !
-- बाबुराव खेडेकर, डीलाईल रोड, मुंबई
सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,रत्नागिरी; 
पुरस्कृत- माजी विध्यार्थी संघटना,कोल्हापूर- अध्यक्ष
संस्थापक/संपादक-प्रजासत्ताक 
संपर्क-9702442024


Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income