*चला तर...मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवूया... अवयवदान करूया!*



    भारतीय संस्कृतीत "दान" या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यापैकी रक्तदान, नेत्रदान याविषयी समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी "अवयवदान" हा सुध्दा राष्ट्रीय उपक्रम देशात राबविण्यात येतो. आजपावेतो वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रात भरपूर संशोधन करून नवनवीन शोध लावले आहेत आणि अजूनही काही शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत.
      सन १९५४ साली पहिल्यांदा "अवयवदान" करण्यात आले. त्यावेळी रोनाल्ड ली हेरिकने किडनी दान करून स्वतःच्या भावाला नवजीवन दिले. त्याचवेळी डॉ.जोसेफ मरे यांनीही पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण केले. या मानवतावादी कार्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना 1990 साली शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
   दरवर्षी दि.१३ ऑगस्ट रोजी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, लोकांमधील भिती दूर होण्यासाठी "जागतिक अवयवदान दिवस" जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. तसेच हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचविले जावू शकतात. 
निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे अनेक लोक आपले प्राण गमावतात. अवयवानामुळे आपण त्यांचे प्राण वाचवू शकतो. व्यक्ती वयाच्या १८ वर्षांपासून ते ६४ वर्षापर्यंत अवयवदान करता येवू शकते. 
     पृथ्वीवर कोणतीही गोष्ट /वस्तू वाया जात नाही. एखाद्या रुग्णाबाबत एखाद्या अवयवावरील औषधोपचार संपल्यावर डॉक्टरांचा शेवटचा  सल्ला असतो तो म्हणजे "ऑर्गन ट्रान्सप्लांट " म्हणजेच अवयव प्रत्यारोपण. एखाद्याच्या शरीराचा निकामी झालेला अवयव उदा. किडनी, यकृत, डोळे, ह्रदय,
त्वचा इ.शस्रक्रियेव्दारे प्रत्यारोपण करून त्याजागी दान केलेला संबंधित अवयवाचे वैद्यकीय सल्ल्यानुसार मानवी शरीरात प्रत्यारोपण केले जाते. मानवाचे प्राण वाचविण्यासाठी मानवी अवयवदान अत्यंत महत्त्वाचे ठरते.
   अशा प्रकारे गरजू व्यक्तीची निकामी अवयवाची गरज पूर्ण होण्यासाठी जनजागृती करून जीवनदान दिले जाते. समाजात अवयवदानाविषयी मार्गदर्शन तसेच जनजागृती होणे आवश्यक आहे. आपल्या घरातील व्यक्तीला अपघात, शस्त्रक्रिया इ.वेळेस जेव्हा तातडीची गरज पडते तेव्हा खऱ्या अर्थाने याची जाणीव होते. प्रत्येकाला आपल्या रुग्णाचा जीव वाचवायचा असतो. यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. पण नाईलाज असतो ? कारण पैसा, औषध, इ. बाबी आपण धावपळ करून उपलब्ध करु शकतो. पण एखादा दुसऱ्या मनुष्याचा अवयव आणणे तसेच घरातील आपल्याच नातेवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रवृत्त करणे, हे मात्र कठीण काम आहे. कारण पैसा, औषध अशा गोष्टीसाठी मदत कुणीही करेल, पण अवयवाची मदत कुणीही करु शकणार नाही. याला कारण देखील तसेच आहे, समाजात याविषयी जनजागृती होणे, याविषयीचे गैरसमज दूर होणे, अत्यावश्यक आहे, ही काळाची गरज आहे. यासाठी शासन/स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून मानवाच्या अवययदानाचे महत्त्व, याविषयीचे मार्गदर्शन ,फायदे, कार्यपद्धती आदि विषयांबाबत समुपदेशन व जनजागृती होणे आवश्यक आहे.
*अवयवदानाचे महत्त्व:-*
      शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्य  नष्ट होणे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील हलाखीची होऊन जाते. शरीरातील एखादा अवयव निरुपयोगी होण्यामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फसे अशा अनेक भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. वेगवेगळ्या आजारांमुळे आपल्या देशात दरवर्षी साधारणतः अनेक लोक बळी पडतात. यातील अनेकांचा मृत्यू हा शरीरातील एखादा महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे होतो. मात्र अवयदानामुळे अनेकांचा जीव वाचविला जाऊ शकतो.
   *नातेवाईकांची संमती आवश्यक:-*
     देशात दररोज अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होत असतो. एखाद्याचा अपघात झाल्यानंतर संबंधितास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कधीकधी त्या रुग्णास "ब्रेनडेड" घोषित केले जाते. अशा वेळेस डॉक्टर तसेच तज्ञांकडून त्या रुग्णाच्या घरातील व्यक्तीला, नातेवाईकांना समजावून, आपल्यामुळे दुसऱ्याला जीवनदान मिळण्यासाठी अवयवदानाबाबत समुपदेशन केल्यास आवश्यक अवयवदान करता येऊ शकते. ज्यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते . अशा वेळी त्यांच्या स्वैच्छिक अवयवदानाने इतर लोकांना जीवनदान मिळू शकते. शासन तसेच शासनमान्यता विभागामार्फत काढलेल्या अवयवांचे ६ ते ७२ तासात पुन:र्रोपण करण्यात येते.
एक अवयवदाता कमीत कमी आठ लोकांचे जीव वाचवू शकतो. जिवंत असताना यकृत,मूत्रपिंड, फुफ्फुस,स्वादुपिंड, ह्रदय,त्वचा आणि आतडे इ.अवयवांचे दान करता येते.
     जे शरीर आपण आपल्या मरणानंतर नष्टच होणार आहे, मग अवयवदानाने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळत असेल तर आपण स्वतःहून अवयवदानाची समाजात जनजागृती करण्यात गैर काय? ही जनजागृती सामान्य जनतेपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत "अवयवदान" हे  दानदेखील माणुसकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे, हे समाजाला आपण पटवून दिले पाहिजे. प्रत्येक मानवाने सामाजिक बांधिलकी म्हणून  अवयवदानासाठी पुढे येऊन आपल्या जवळच्या शासनमान्यताप्राप्त अवयवदान केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे. मरणोत्तर निरोगी नेत्र, यकृत,किडनी, शरीराचे विभिन्न भाग इ.स्वयंस्फूर्तीने दान करु शकता.अवयवदान हे आजच्या युगात गरजू रुग्णांसाठी नक्कीच आशेचा किरण ठरणार आहे, यासाठी शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. आपल्या शरीरातील अवयव वेळप्रसंगी गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकेल...... ! 
      अवयवदानाचा उपदेश करणे, अवयवदान संमतीपत्र भरून देणे सोपे आहे. परंतु जेव्हा अवयवदान करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा मात्र अवयवदानाविषयी केलेला निश्चय गळून पडतो ...ज्या कुटुंबातील व्यक्ती "ब्रेन डेड" असते किंवा ती व्यक्ती मरण पावते तेव्हा साहजिकच सर्व कुटुंबिय दुःखात बुडालेले असतात,अशा दु:खद प्रसंगी त्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे, हे अत्यंत अवघड काम डॉक्टर आणि समुपदेशक यांना करावे लागते.
        समुपदेशन करणारे जे सेवाभावी कार्यकर्ते असतात  त्यांना शासनातर्फे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अवयवदान संमतीपत्र भरणारे अवयवदान करतीलच, याची खात्री नसते. वचनपत्र भरून देणे,ही अवयवदानातील पहिली पायरी आहे. ज्यामुळे अवयवदानाचा सकारात्मक विचार त्या व्यक्तीच्या मनात येतो. कमीत कमी पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर प्रशिक्षित समुपदेशक तयार झाले तर अवयवदान प्रक्रिया सोपी होण्यास खूप मदत होईल.
      अवयवदान या विषयावर जनजागृती होण्यासाठी अनेक मान्यवर मनापासून प्रयत्नशील आहेत. याविषयी आणखी सविस्तर माहितीसाठी आपण त्यांच्याशीही (श्री.माधव अटकोरे, नांदेड- 80875 65172, श्री. कुमार कदम- 9869612526) संपर्क करू शकता.
      चला तर मग माणुसकीप्रति आपले कर्तव्य निभाविण्यासाठी आपणही "अवयवदान संमतीपत्र" भरून या चळवळीत सक्रिय सहभागी होवूया... मृत्यूनंतरही  अवयवदानातून माणुसकी जिवंत ठेवूया...!
     
*लेखक-*
हेमकांत सोनार,
अलिबाग-रायगड.
9511882578

*संपादन-*
मनोज शिवाजी सानप 
जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
9503546004

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income