पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करा : आ. प्रशांत ठाकूर

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा - भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 

पनवेल(प्रतिनिधी) राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट'  कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. 
          महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजी वरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल , डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे . मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले आहे. केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २१ रोजी पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल डीझेल वरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र महाराष्ट्र सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही. पेट्रोल, डिझेल जीएसटी च्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income