योगशिक्षक अविनाश लोंढे यांचा योगप्रवास

"योग : दहा वर्षाचा प्रवास"  

     वर्ष २०१०.त्यावेळी मुंबईच्या बांद्रा येथे एका खाजगी कार्यालयामध्ये मी काम करत होतो .मला ऑफिस टू  ऑफिस कामानिमित्त  दादर ला जावे लागत असे. त्यावेळी चार-सहा महिन्यातुन केव्हातरी एकदा कंबरेत दुखू लागायचं. मग २००४ साली दहावीला असताना श्री मुळीक सरांनी आमचे  दररोज शाळेत योग वर्ग घेतले होते ते आठवलं. आणि दादर हे खेळांचे माहेरघर .म्हणून आमच्या दादर च्या ऑफिस मधल्या मित्राला विचारले. दादर मध्ये योग वर्ग कुठे चालतात..? तो म्हणाला..शिवाजी पार्कात.. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात.
           
माझी ड्युटी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत असे. त्या वेळी मी डिलाइल रोडला राहत असे. त्या दिवशी कामावरून घरी न जाता मी थेट वीर सावरकर स्मारकात चौकशीला गेलो. सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली. ते म्हणाले थोड्या वेळाने मॅडम येतीलच तुम्ही त्यांना भेटू शकता. मग बाहेरच गणपती मंदिर आहे. त्या कठड्यावर बसून राहिलो. पाचच्या सुमारास  मॅडम आल्या. त्या जवळच राहत होत्या.
त्यावेळी त्यांना वाटलं सुद्धा नसेल की  त्यांना  मी आयुष्यभर माझे गुरू मानणार आहे. त्यांनी सगळी माहिती सांगितली सकाळी ५ ते ६.३०, ६.४५ ते ८.१५ आणि संध्याकाळी ५ ते ६.३० असे तीन वर्ग आहेत. मी म्हटलं, सकाळी मला ऑफिस असते.मी संध्याकाळच्या वर्गाला येईन. तेव्हा पासून न चुकता योग वर्गाला जाऊ लागलो. जेमतेम १२-१३ साधक होते. त्यात सर्वात कमी वयाचा मीच. दुपारी कामावरून घरी न जाता मी थेट दादर ला जायचो. तिथल्या बाकड्यावर आराम करायचो. मग वर्गात जाऊन झाडलोट करून सतरंज्या अंथरुन ठेवायचो. मग बाकीचे साधक यायचे. माझ्या गुरू रंजना शेनॉय मॅडम पन्नास वर्षाच्या होत्या पण आसनं काय सुरेख करायच्या...! त्यांच्या मुळेच मला 'योग'ची गोडी लागली. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची मला वेळोवेळी मदत झाली. त्यांनीच मग मला मुंबई विद्यापीठाचा 'योग' चा कोर्स करायचा सल्ला दिला. वेळोवेळी त्या मला मार्गदर्शन करायच्या. त्यांची पुस्तके मला वाचायला द्यायच्या. एक दिवस मॅडम आल्याच नाहीत म्हणून मी वर्गाची सुरवात केली. मी वर्ग घेत असताना थोड्या वेळात त्या आल्या.तो पर्यंत माझं लक्ष ही नव्हतं. जेव्हा लक्ष गेलं त्यावेळी मी तिथून उठणार. इतक्यात त्यांनीच मला सांगितले आज तूच पूर्ण वर्ग घे. मी तुझे निरीक्षण करेन. कसाबसा वर्ग पूर्ण घेतला आणि आता त्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत होतो. त्या म्हणाल्या..'खूपच छान वर्ग घेतलास तू..!' हे ऐकुन फारच बरं वाटलं. नंतर  कधी मॅडम ना उशीर झाला तर मीच सुरवात करायचो. मी माझं भाग्य समजेन की कालांतराने तो वर्ग पूर्ण वेळ मलाच शिकवायला मिळाला. मी वेळोवेळी त्यांच्या कडून मार्गदर्शन घेत राहिलो. त्याच केंद्रात सकाळच्या वर्गात असणाऱ्या श्री बर्वे सरांना देखील मी माझे गुरू मानतो. त्यांनीही मला  वेळोवेळी बरेच मार्गदर्शन केले. त्यांनीच मला २०११ मध्ये हरिद्वार ला योग प्रशिक्षण ला पाठवले.त्या वेळी पैसे नव्हते म्हणून त्यांनीच माझे रेल्वे चे तिकीट काढले होते. नंतर मी त्यांचे पैसे परत दिले पण त्यांचे उपकार मी कधीच परत करू शकत नाही.मी माझे भाग्य समजेन की बाबा रामदेवजी यांनी आम्हाला प्रत्यक्ष १० दिवस स्वतः प्रशिक्षण दिले आहे.
                 माझा कोर्स संपत आला होता. परीक्षा जवळ आल्यामुळे मी दादर च्या वर्गाकडे जाणे दुर्लक्षित केले. मॅडम ही काही कारणास्तव यायच्या बंद झाल्या. म्हणून मग संध्याकाळचा वर्ग बंद करण्यात आला. नंतर मी जिथं राहायचो तिथं सुरेश लिंगणुरे नावाचा मित्र एका कंपनीत योग शिक्षक म्हणून कामाला होता. त्याने मला त्यांच्या कंपनीत कोर्स करण्यास सांगितले. जून २०१२ ते ऑगस्ट २०१२ या कालावधीत मी कोर्स पूर्ण केला. मागच्या दोन वर्षाचा अनुभव.अधिक विद्यापीठाचा आणि इथला कोर्स त्यामुळे सप्टेंबर २०१२ पासून 'शिव हॉलिस्टिक योगा' या कंपनीत योग शिक्षक म्हणून रुजु झालो..इथले प्रमुख श्री शिव कुमार मिश्रा यांनी देखील मला बरेच प्रशिक्षण दिले. वेगवेगळ्या क्लब मध्ये ५-६ ग्रुप क्लास घायचो मी. त्यातलाच एक वर्ग सलग तीन वर्ष  कैवल्यधाम, मुंबई येथे घेतला. शिव हॉलिस्टिक ह्या कंपनीत पद्मा नावाची मुलगी होती तिने इथला जॉब सोडून सोमैय्या कॉलेज(विद्याविहार) मध्ये  बी ए योग शास्त्रला प्रवेश घेतला होता. मलाही विनंती केली होती. तू पण बी ए ला प्रवेश घे.... मी त्यावेळी विचार केला.कुठे तीन वर्ष खर्च करायची म्हणून मी प्रवेश नाही घेतला. शिव हॉलिस्टिक मध्ये माझे जे सिनियर टीचर होते त्यामध्ये अमोल सर,विघ्नेश सर, बाली सर,सुषमा मॅडम यांनी देखील मला प्रशिक्षण दिले होते. पद्माशी मध्ये मध्ये फोन वरून संभाषण व्हायचं. २०१६ ला तिने मला परत सांगितले तू पोस्ट ग्रॅज्युएशनला तरी प्रवेश घेच. मी तुला वेळोवेळी मदत करेन. त्यावेळी ती MA योग शास्त्राला होती. ह्यावेळी मात्र मी सोमैय्या कॉलेज मध्ये PG ला प्रवेश घेतला.तिथे योग मध्ये पारंगत शिक्षक वर्ग. डॉ.आगाशे सर,डॉ. गणेश राव सर,श्री साबीर सर, श्री संदीप सर, डॉ.कला मॅडम यांच्या मुळे मला योग चा अर्थ कळला. PG झाल्यानंतर मी ही MA योग शास्त्राला प्रवेश घेतला.ह्याच सोमैय्या कॉलेज मध्ये मी माझा पहिला योग परफॉर्मन्स टीम सोबत दिला आहे.
         MA करत असताना एक PG ची मैत्रीण सुचिता सोरटे हिने निसर्ग उपचाराच्या कोर्स बद्दल माहिती सांगितली. तो तीन वर्षांचा कोर्स परेल येथे चालायचा. त्यालाही प्रवेश घेतला.तिथे निस्वार्थ सेवा देणारे डॉ. दिलीप सर आणि डॉ. निर्मला मॅडम  हे शिक्षक भेटले. जॉब, MA, आणि निसर्ग उपचार हे हातात हात घालून चालत होते. त्याच बरोबर अँक्युप्रेशर चा पण अनुभव होता.२०१२ ते २०१८ अशी सहा वर्षे शिव हॉलिस्टिक मध्ये काम केल्यानंतर असं वाटलं स्वतःच काही तरी चालू करू. म्हणून जॉब सोडून दिला. काही दिवस वन टू वन घरी जाऊन योग वर्ग घेतल्यानंतर २४ जानेवारी २०१९ ला स्वतःच्या हेल्थ ब्रँड ची स्थापना केली. शकुंतला आरोग्यम असे नामकरण केले. आईचा स्मृतीदिन आणि तिच्याच नावानं सुरू केलेला हा ब्रँड.

 ज्या मध्ये योग, निसर्ग उपचार, अँक्युप्रेशर आणि मसाज द्वारे रूग्णांना उपचार देणे. समाजसेवेचा भाग म्हणून  "जय भगवान" ह्या संस्थेत आठवड्यातून दोन दिवस दोन-दोन तास अँक्युप्रेशरची सेवा मोफत देतो. इतक्या वर्षाच्या साधनेमुळे मी काय मिळवले असेल तर....पूर्वी मी कधी कधी शीघ्रकोपी होत असे. एखाद्याला त्वरित प्रतिउत्तर करत असे. पण आता नाही. विषयाचे पुर्ण आकलन करून मी आता शांत पद्धतीने उत्तर देतो. योग मुळे माझी आर्थिक सुबत्ता झालीच. त्याच बरोबर भावनिक, शारीरिक, सामाजिक आणि वैचारिक बाबतीत खूपच बदल झाला. योग, निसर्ग उपचार, मसाज, अँक्युप्रेशर मुळे एखाद्या व्यक्तीच्या वेदना कमी होत असतील. आणि त्याचे शुभ आशीर्वाद मला मिळत असतील तर यापेक्षा मोठं बक्षीस ते काय असू शकते?
                गुरुजनांच्या आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने ह्या योग प्रवासाला आज(ऑगस्ट २०१०- ऑगस्ट २०२०) दहा वर्ष पूर्ण होत आहेत. शेकडो लोकांमध्ये योग आणि निसर्ग उपचाराचा प्रसार करण्यात मला यश आले.त्यात ९ वर्षाच्या बालका पासून ते ९४ वर्षाच्या आजीबाईचा समावेश आहे. तीन-चार  सिलिब्रेटींना योग शिकविण्याचे भाग्य लाभले. एका मेडिकल कॉलेज च्या सर्व डॉक्टर स्टाफ ला शिकविण्याचे भाग्य लाभले. सहा-सात परदेशी लोकांना शिकविण्याचे भाग्य लाभले. हे सर्व शक्य झालं ते योग सारख्या अथांग सागरात थोडंस ज्ञान संपादित केल्यामुळे. पुन्हा एकदा परमेश्वराचे, गुरूजणांचे,आई वडिलांचे, सहकाऱ्यांचे,रुग्णांचे,साधकांचे आभार. हा प्रवास असाच सुरु राहो हीच इच्छा...।  ।।हरी ओम🙏🙏।।

  - -अविनाश लोंढे
  शकुंतला आरोग्यम
मुंबई

Comments

  1. अविनाशजी आपल्या या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. संघर्षातुन आपण योगशिक्षण घेत स्वतःचा हेल्थ ब्रॅंड तयार केलात हे खरच प्रेरणादायी आहे. कोल्हापूरच्या क्रिडा संस्कृतीत आपण योगाची भर घातली याचाही सार्थ अभिमान आहे. नॅचरोपॅथीचा नवा मार्ग आपण निवडला आणि यशस्वी झालात व होत आहात त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. धन्यवाद बाबुरावजी

    ReplyDelete
  3. Amazing journey.
    Keep it up.
    You are a superb teacher,
    And an amazing Human being.
    God bless you Avinash Sir

    ReplyDelete
  4. खुपच छान काम करतोस. ..असच करत रहा ..भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉

    ReplyDelete
  5. संघर्ष, परिश्रम, जिद्द, चिकाटी या मराठी कोल्हापूरी माणसाची खासियत . अविनाश आपणही याच गुणांच्या जोरावर यशाच्या पायरी आणि नवी शिखरे पादाक्रंात करीत आहात. आपणास खुप खुप शुभेच्छा।

    ReplyDelete
  6. संघर्ष, परिश्रम, जिद्द, चिकाटी या मराठी कोल्हापूरी माणसाची खासियत . अविनाश आपणही याच गुणांच्या जोरावर यशाच्या पायरी आणि नवी शिखरे पादाक्रंात करीत आहात. आपणास खुप खुप शुभेच्छा।

    ReplyDelete
  7. Awesome. keep it up.तुझ्या पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा.

    ReplyDelete
  8. खूपच छान लेख लिहिला आहेस‌ अविनाश....तुझ्या MA in Yog in Somaiya college याची दोन‌ वर्षे या प्रवासात‌ मी ही होते याचा आनंद आहे.
    हा प्रवास उत्तरोत्तर उत्तुंग होत जावो ही सदिच्छा, आणि तू या योगमार्गावर खूप यशस्वी व्हावंसं यासाठीAll the best.

    ReplyDelete
  9. Hardwork is most important key to success....so keep it up Bro✌️

    ReplyDelete
  10. खूप छान अवि�� स्पर्धामक मुंबईत स्वतःची ओळख तयार करण्यासाठी मुळातच जिद्द असावी लागते। काम, योग्, मित्रपरिवार ह्याची सुरेख जमवाजमव तू केलीस आणि सर्वच ठिकाणी तू यशस्वी आहेस���� हे ही कौतुकास्पद। तुझ्या पुढील प्रगती साठी मनापासून शुभेच्छा।����

    ReplyDelete
  11. Khup Sundar pragaticha pravas ahe Avinash....Best of luck for future....keep it up....

    ReplyDelete
  12. Sanjivani GhodekarAugust 4, 2020 at 3:32 AM

    I feel proud of you, go ahead, best of luck for your future

    ReplyDelete
  13. अविनाश खुपच छान मेहनत घेतोस उत्तरोत्तर खुप प्रगती करशील व यशस्वी होशील ही सदिच्छा ,

    ReplyDelete
  14. Great hard workship and dedication to the work

    ReplyDelete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income