म्हणे, स्वतःची संपत्ती विकून ठेवीदारांचे पैसे देणार.... ! मग स्वतःचे घर सोयऱ्याना विकून त्याच घरात भाड्याने का राहता ?

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका दैनिक रामप्रहरने सुरु केली आहे. सदर वृत्तमालिकेत सविस्तरपणे पुराव्यानिशी या घोटाळ्याची पोलखोल केली आहे. 
कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देताना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांसारख्या सार्वजनिक संस्था विकण्याचा हवाला देणारे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते विवेक पाटील या सार्वजनिक संस्था स्वत:ची जहागिर समजून कोणत्या अधिकारात, असा प्रश्न ठेवीदार व खातेदारांना पडला आहे, तसेच विवेक पाटील यांनी स्वत:चे घर विकून पुन्हा त्याच घरात मुलाच्या नावाने भाडेकरू म्हणून राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील उरलासुरलेला विश्वासही आता संपुष्टात आल्याची चर्चा ठेवीदार, खातेदारांसह रायगडवासीयांमध्ये आहे.
कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते विवेक पाटील यांनी दैनिक पुढारीमध्ये शनिवार, दि. 8 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात स्वतःची मालमत्ता विकून ठेवीदारांचे 512 कोटी रुपये देण्याचे शहाजोगपणाने सांगितले आहे.
प्रत्यक्षात विवेक पाटील यांच्या मालमत्ता ठेवीदारांच्या पैशातूनच बनलेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या ठेवींच्या पैशातून घेतलेली मालमत्ता विवेक पाटील कशी विकणार? हा खरा प्रश्न आहे.
विवेक पाटील यांच्या मालमत्ता ठेवीदारांच्या पैशातूनच बनलेल्या आहेत आणि हे सहकार खात्याच्या लेखा परीक्षण अहवालाने उघड केले आहे. कर्नाळा बँकेच्या एकूण 633 कोटी रुपये कर्जापैकी 512 कोटी 55 लाख रुपयांची कर्जे बोगस असल्याचे सहकार खात्याचा अहवाल सांगतो. याचा अर्थ ही सगळी कर्जे प्रत्यक्ष कर्जदारांनी न घेता विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांमध्ये वापरल्याचे हा अहवाल स्पष्टपणे सांगतो. म्हणजेच विवेक पाटलांनी गरजूंना कर्ज न देता स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणे उभी करून ती बनावटी कागदपत्रांच्या आधारे स्वतःच हडप केली आहेत. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रातील नियमांची पायमल्ली करून विवेक पाटील यांनी जर आपल्या मालमत्ता उभ्या केल्या आहेत, तर त्या मालमत्ता विकण्याचा आव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे स्वतःची व्यक्तिगत मालमता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा धिंडोरा विवेक पाटील यांनी पिटला असला, तरी त्या मालमता बोगस कर्जाच्या प्रकरणातून लाटून तयार झाल्या आहेत, हे मात्र आता जगजाहीर झाले आहे.
जप्ती येऊ नये म्हणून स्वत:चेच घर विकून 
पुन्हा त्याच घरात विवेक पाटील भाडेकरू

सहकार खाते व पोलीस प्रशासनाने तातडीने कर्नाळा बँकेच्या सर्व संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात; अन्यथा विवेक पाटील यांनी स्वतःच्या मालकीचा ’आस्वाद’ हा बांगला स्वतःचे सोयरे (रामचंद्र जयराम घरत उर्फ चंदरशेठ) यांच्या नावावर केला, तशाचप्रमाणे अन्य प्रॉपर्टीची विल्हेवाट ते लावणार नाही याची कोणतीही शाश्वती आता उरलेली नाही. विशेष म्हणजे चंदरशेठ यांना स्वत:चा बंगला विकल्यानंतर त्याच बंगल्यात विवेक पाटील हे आपल्या मुलाच्या नावाने भाडेकरू म्हणून राहात आहेत. त्यामुळे विवेक पाटलांनी नाकाने कांदे न सोलता स्वतःच्या या 63 बोगस कर्ज प्रकरणातून लाटलेला पैसा कुठे दडवला याची माहिती सर्वसाधारण ठेवीदारांना आणि जनेतला द्यावी, अशी मागणीवजा चर्चा पनवेलमध्ये आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income