पनवेल तक्का दर्ग्यावरील अलौकिक वृक्ष

 गोरख चिंच/वावबाब वृक्ष पनवेलमध्ये... 


           एका कुटुंबाला पोटात सामावून घेईल एवढे मोठे नैसर्गिकरित्या  पोकळ असलेले झाड पनवेल मधील तक्का दर्ग्यावर आहे. देवाचे झाड अशी श्रद्धा ठेवणारे लोक येथे असून अनेक साधू संत आणि फकीर या झाडामध्ये ध्यान करण्यासाठी येत असतात. हा  दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी लोकांची मात्र फार ये जा नसल्यामुळे महापालिकेला या वृक्षाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देता येवू शकतो. 
           आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी नीट  पाहिल्यावर अनेक ऐतिहासिक गोष्टी आढळतात. पनवेल मधील वृक्षप्रेमींना एका दुर्मिळ झाडाचे दर्शन कुठल्याही अडथळ्याविना विनामूल्य पाहण्यास उपलब्ध आहे. तलावांचे शहर,भाताचे कोठार अशी इतिहासातील पनवेलची ओळख आता सिमेंटचे जंगल अशी होत आहे. मात्र शहरातील तक्का परिसरातील दर्ग्यामध्ये काटेसवर जातीचा ४५ वर्षाचा  वृक्ष आहे. त्याच्या वैशिष्टयानुसार या वृक्षाची वाढ होताना खोडामध्ये पोकळी निर्माण होत गेली. या झाडाच्या नैसर्गिक गुहेबाबत येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. येथील फकीर मुजावर जावेद इब्राहिम यांनी सांगितले कि हा देवाचाच वृक्ष आहे अशी आमची धारणा असून याला आम्ही बुद्धिमान म्हणतो. या वृक्षाला आम्ही श्रद्धेने सुशोभीकरण केले आहे. अनेक साधू संत फकीर येथे येऊन ध्यान साधना करीत असतात. 
          हा वृक्ष नेमका कोणता याबाबत माहिती घेतली असता; हा वृक्ष गोरख चिंच असून असे वृक्ष आफ्रिकेमध्ये आढळतात. वावबाब तसेच सर्पदंडी असेही या वृक्षाला संबोधतात. भारतात प्रवासी पक्षांच्या मार्फत याच्या बिया रुजल्या गेल्यामुळे कुठेकुठे हे दुर्मिळ वृक्ष पाहायला मिळतात असे बोलले जाते. मुंबईमधील  कालिना येथील मुंबई विद्यापीठामध्ये हा वृक्ष आहे त्यानंतर पनवेलमध्ये आहे. महाराष्ट्रा ठराविक ठिकाणीच हे वृक्ष आढळतात. पुणे विद्यापीठाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार असलेले विद्यापीठासमोरील गोरख चिंचेचा वृक्ष २०१७ मध्ये उन्मळून पडला. पस्तीस फुट घेर असणारे अवाढव्य खोड असणारे  आणि  किमान दीडशे वर्षे वयाचे ते झाड होते. पक्षांच्या वसाहतींसोबतच अनेक औषधी गुणांसाठी योग्य असे हे गोरख चिंच वृक्ष फारच दुर्मिळ आहेत.अरबी भाषेत या वृक्षाला बु हीबाब म्हणतात ज्याचा अर्थ आहे खूप बियांचे झाड. बु - हिबाबाचाच  अपभ्रंश होऊन बाओबाब असे नाव त्याला पडले आहे. आफ्रिकेच्या आर्थिक प्रगतीत या वृक्षाचाही सहभाग असून आफ्रिकेने या वृक्षाला 'जागतिक झाड'' तसेच संरक्षित वृक्ष'' म्हणून घोषित केले आहे. या वृक्षाबाबत अशी दंतकथा आहे कि जेव्हा इतर वृक्षाला लागणारे पाणी सूर्यप्रकाश एकट्यानेच हे वृक्ष घेत होते तेंव्हा देवाने त्या झाडाला उपटून उलटे ठेवले. या वृक्षाने जेंव्हा देवाकडे प्रार्थना केली तेंव्हा सहा महिने झाडाला पाने राहतील असे देवाने सांगितले. हि दंतकथा असली तरी या वृक्षाला केवळ सहा महिनेच पाने असतात.  या झाडाचे लाकूड जळावू नसले तरी कागद,कपडे,रस्सी,मच्छीमारीचे जाळे बनविण्यासाठी याचा उपयोग होतो. या झाडाच्या फुलांपासून औषधे,तेल,साबण बनविले जातात.पानांची भाजीसुद्धा बनविली जाते कारण या झाडाच्या पानांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त आहे.या झाडाचे उलटे दिसणे हेच त्याचे खरे वैशिष्ट्य आहे. मात्र  तक्का दर्ग्यावरील या झाडाच्या खोडाला मोठे बांधकाम केल्यामुळे त्याच्या मूळ रूपाबाबत भेटणाऱ्याना उत्सुकता लागून राहते. तक्का दर्ग्यातील गोरख चिंच वृक्ष खूपच मोठा असल्यामुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.शेजारीच गाढी नदी असल्यामुळे याठिकाणी पर्यटनस्थळाचा विकास होऊ शकतो. हा वृक्ष अनेक पर्यावरणाच्या अभ्यासूकांसाठी पर्वणीच ठरणारा आहे. 
बाबुराव खेडेकर
सहसंयोजक- पनवेल प्रज्ञा प्रकोष्ठ 
सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,रत्नागिरी; 
पुरस्कृत- माजी विध्यार्थी संघटना,कोल्हापूर- अध्यक्ष
संस्थापक/संपादक-प्रजासत्ताक 
संपर्क-9702442024

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income