धीयो यो न: प्रचोदयात !



         तिन्ही लोक दीप्तिमान करणाऱ्या सूर्यासारखी आमची बुद्धी तेजस्वी व्हावी ही आपली आद्य प्रार्थना आहे ! अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आशाच भारतीय संस्कृती आणि आध्यात्मामध्ये पदोपदी प्रतीत होते. ज्ञानाधिष्ठित समाज हे भारतीयांच्या सुप्त इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. परलोकाचे वेध लागलेल्या भारतीय समाजाला 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' हा विचार मान्य नसून आपल्या अधिभौतिक प्रगतीचे वेड लागले आहे. सम्रुद्र पार करून नवनवी यशोमंदिरे पार करणारे  भारतीय खऱ्या अर्थाने 'हे विश्वची माझे घर' हा वैश्विक विचार खरा करत आहेत. बुद्धिनिष्ठ,विवेकनिष्ठ,तर्कनिष्ठ,विज्ञाननिष्ठ असे शब्दप्रयोग हल्ली वारंवार वापरले जातात.  आपली बुद्धी मिळविलेल्या माहितीवर कौशल्याच्या बळावर प्रयोग करून नवनवीन अनुभव घेत असते.अनुभवाचे आंतरिकरण झाल्यावर आपल्याला अनुभूती मिळत असते.याच अनुभूतीतून आपल्या बुद्धीला ज्ञानाचे दर्शन घडते.ज्ञानाच्या शहाणपनातून प्रतिभेच्या साथीने बुद्धी नवनवीन शोध लावते.मौलिक विचाराच्या शिडीवर चढून बुद्धी प्रज्ञावान होते.ह्या प्रज्ञेचे विद्युल्लतेसारखे चपळ रूप म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा ! छत्रपती शिवाजी महाराज,गौतम बुद्ध,स्वामी विवेकानंद,महात्मा गांधी,विनोबा भावे,डॉ बाबासाहेब आंबेडकर,मायकेल अँजेलो,लिओ नार्डो दि विंची,आल्बर्ट आईन्स्टाईन,बर्ट्राट रसेल,स्टीफन हॉकिन्स अशा फार मोजक्या मानवांना ऋतंभरा प्रज्ञेचे दर्शन घडले असावे. 
            सामाजिक दडपणाचे भय,अपयशाचे भय,मृत्यूचे भय यांनी वेढलेली बुद्धी साखळीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे ठराविक क्षेत्रातच संचार करते.भौतिक सुखाच्या अतिरेकी मोहात अडकलेली बुद्धीही भ्रष्ट होते.भयमुक्त,मोहमुक्त बुद्धीलाच सृजनशीलतेचा पंख फुटतात हे लक्षात घ्यायला हवे. बुद्धिमत्ता हि बहुविध,बहुआयामी असते असे अनेक मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.आपल्याकडे भाषा,तत्वज्ञान,तर्कशास्त्र आणि गणित या विषयात नैपुण्य मिळविणाऱ्याना आपण बुद्धिमान मानतो. सचिन तेंडुलकर खेळामध्ये,मल्लिका साराभाई नृत्यामध्ये,एम.एफ.हुसेन चित्रकलेत,तरला दलाल पाककलेत बुद्धिमान आहेत. आपले शेतकरी आणि पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर हे अडाणी नसून त्यांच्या त्यांच्या व्यवसायात बुद्धिमान आहेत. शारीरिक क्षमतेतून दिसणारी बुद्धिमत्ता,संगीताचा गळा आणि कान असलेली बुद्धिमत्ता मानवी संबंध आरोग्यदायी ठेवण्याचे कसब हे सुद्धा बहुविध बुद्धिमत्तेचे वेगवेगळे आयाम आहेत. असे म्हणतात कि प्रत्येकजण कुठल्यातरी एका क्षेत्रात बुद्धिमान असतोच. कुठलाच विध्यार्थी 'ढ' आपला विध्यार्थी कुठल्या क्षेत्रात हुशार आहे हे शोधून काढू न शकणारे शिक्षक 'ढ' असतात.
         आपल्या अवतीभोवती अनेक यशस्वी बुद्धिमान लोक आहेत.त्यांना समाजाच्या मदतीशिवाय यश मिळालेले नाही असेच ते सांगतील. त्यामुळे या सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे. केवळ व्यवस्थेवर त्रयस्थ राहून टीका करणे व स्वतः कांहीच न करणे हे अशोभनीय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवनवीन विचार मांडत आहेत व आपल्याकडूनसुद्धा सूचना मागवत आहेत.'कालाय तस्मे नमः उक्तीप्रमाणे येणाऱ्या काळात कळत नकळत अनेक आमूलाग्र बदल होणार आहेत त्यासाठी आपण सज्ज नसू तर मागे राहू. त्यामुळे कायदा पाळा गतीचा या  संदेशासह विकासयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करून आपला निरोप घेतो..  
- - बाबुराव खेडेकर
सहसंयोजक- भाजपा पनवेल तालुका प्रज्ञा प्रकोष्ठ सेल 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income