विकासयात्रेवर सैराट पनवेल !

बदलते पनवेल बहरते पनवेल

            
           मुंबईवरील वाढता नागरी ताण कमी करण्यासाठी नवीमुंबईची  निर्मिती राज्यशासनाने केली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील  पनवेल  तालुक्यातील बराचसा भाग शामिल असल्याने नागरीकरणाचे लोन पनवेलमध्ये झपाट्याने पसरले. राज्यातील पहिली नगरपालिका असलेल्या पनवेल नगरपालिकेला नागरी जीवन कांही नवीन नसले तरी कोकणातील शहरांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या पायुभूत सेवासुविधांच्या समस्या या शहराला भेडसावत होत्या. पनवेल म्हटले कि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मागोमाग लोकनेत्ते रामशेठ ठाकूर यांचे नाव घेतले जाते. स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक वर्षे ठाकूर कुटुंबियांच्याकडे विश्वासाने पनवेलची सत्ता दिली आहे. मा. खा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या बहुआयामी  लोकसेवेचा वसा समर्थपणे पेलणारे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे त्यांचे सुपुत्र आ. प्रशांत ठाकूर. त्यांच्याच दूरदृष्टीतून १ ऑक्टोबर २०१६ पासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली  आहे.महापालिकेला आधी विरोध करणारे अचानक  समर्थन करू लागले. दुसरीकडे महानगरपालिका आ. प्रशांत ठाकूर यांनी स्वतः च्या राजकीय फायदयासाठी केली असल्याची वावडी उठवून ग्रामपंचायतींचा पालिकाविरोधी ठराव सुद्धा विरोधकांनी बनवून घेतले. मात्र  स्मार्ट शहरांच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या भाजप सरकारने महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखविला. नयना प्राधिकरण,सिडकोचा विरोध आणि स्थानिक ग्रामपंचायतींचा विरोध यामुळे सरकारला हा निर्णय घ्यायला  वेळ लागत होता  मात्र न्यायालयाच्या मध्यस्तीने हा तिढा सुटला. 
           महानगरपालिकेमुळे   आपल्या शहराला  भारतीय प्रशासकीय सेवेतील  अधिकारी मिळेल व त्यांच्या कार्यकक्षेत गतिमानतेने विकासाचे स्वप्न पूर्ण करता येईल हि आ. प्रशांत ठाकूर यांची भूमिका आज सत्यात उतरताना दिसते आहे.आयुक्तांनी महानगरपालिका ताब्यात घेतली तेंव्हा ठाकूर गटाचेच प्राबल्य नगरपालिकेत होते. एकदिवस पनवेलची महानगरपालिका होईल या धारणेनेच वाढत्या पनवेलसाठी पाणी कुठून आणायचे,रस्ते कसे असावेत,विरंगुळा केंद्र,हॉस्पिटल,क्रीडा संकुल,समाज मंदिरे,मध्यवर्ती बसस्थानक,मार्केट्स,जलकुंभ,सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प,घनकचरा व्यवस्थापन,बाजारपेठ,न्यायालय  यांचे नियोजन जमेल त्या परीने करीत या  शहराला आकार देण्याचा प्रयत्न तत्कालीन लोकप्रतिनिधी करीत होते. मात्र  आवास योजनेसाठी असेल किंवा अन्य सुविधांसाठी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करूनही जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रकल्प अपुरे राहिले होते. जिल्हाधिकारी यांच्याकडेही अनेक फाईल्स प्रलंबित होत्या. तसेच वाढत्या नागरीवस्तीच्या घरांसाठी मुंबईकरानी पनवेलकडे मोर्चा वळविला असताना नयनामुळे बराचश्या भागातील बांधकामांवर मर्यादा आल्या. शहराला कोणत्या मार्गाने घेऊन गेल्यास मागे वळून पाहावे लागणार नाही हे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आ. प्रशांत ठाकूर यांनी हेरून ग्रामीण भागाला शहरी भागातील सेवा सुविधा देणे व शहरी भागाला अधिक चांगल्या सेवा सुविधा देणे हे धोरण ठेवून त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून आपली महापालिका संदर्भातील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. नागरिकांनीही त्यांच्या या मागणीला उचलून धरले आणि समर्थन दिले . भाजप कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिकेसाठी सह्यांचे निवेदन तयार करून सरकारला सादर केले. 
     पनवेलला आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यामुळे लाभलेली शौर्याची परंपरा आहे.  मुंबई गोवा महामार्ग केवळ येथून जात नसून येथील वीरपुत्र हिरवे गुरुजी यांनी  गोवा मुक्ती संग्रामात हौताम्य पत्करले आहे. रायगड जिल्ह्यातीचा चेहरा मोहरा बदलून टाकू पाहणारे अत्याधुनिक जागतिक कीर्तीचे शहर बनू पाहणारे पनवेल बदलत आणि बहरत असताना स्थानिक भूमिपुत्र यांना त्याचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी धडपडणारे आ. प्रशांत ठाकूर यांच्यासारखे लोकप्रतिनिधी फारच कमी आहेत.  विस्थापित  पनवेलकर आणि त्यांचे नातेवाईक पनवेलच्या वाढत्या अनधिकृत घरांमुळे आणि अतिक्रमणामुळे शहर बकाल झाले अशी ओरड करीत होते. आता ते अभिमानाने सांगू शकतील असे पनवेल शहर आकारास येत आहे. पनवेलकरांनीही आजवर अनुभवले नसेल असे चित्र सध्या पनवेलमध्ये सर्वत्र दिसत आहे. प्रशस्त मोकळे रस्ते,पार्किंगसाठी मोकळी होत चाललेली जागा,स्वच्छता,प्रशासकीय कामांचा धडाका,बेकायदेशीर कामांवर सुरु असलेल्या कारवाई,दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे रस्ते,कायदा व सुव्यवस्था यांचे चोख नियोजन अशा अनेक गोष्टी पनवेलमध्ये घडत आहेत. फायदेशीर गुंतवणुकीसाठी,उत्तम रोजगारासाठी,चांगल्या राहणीमानासाठी,दर्जेदार शिक्षणासाठी पनवेलहे उत्कृष्ट ठिकाण आहे अशी परिस्थिती  दिसत आहे. येत्या काळात पनवेल हे सर्वोत्कृष्ट शहर बनणार असून पनवेलचा पॅटर्न इतर ठिकाणी शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोमार्फत राबविले जातील यात शंका नाही. सिडकोचे  मुख्य कार्यालय पनवेल नजीक असल्याने सिडको प्रशासनाने येथील स्थानिकांकडून खूप  गोष्टी शिकलेल्या आहेत ज्या सिडको जेथे जेथे जाईल त्या ठिकाणी त्यांना उपयोगी पडतील.सिडकोला प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५००० घरांचे लक्ष दिले असून परवडणारी घरे बांधण्याचेही शिल्पकार होण्याची नामी संधी सिडको प्रशासनासमोर आहे. तळोजा फेज विकसित करताना व सिडकोकडे असलेले भूखंड विकसित करताना सिडको प्रशासन त्यांच्याकडे असलेल्य्या कमी वेळेत त्यांच्याकडील कुशल मनुष्यबळामार्फत कसे काम करते यावर सिडको वसाहतीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
          पनवेल आता विकासयात्रेवर सैराट  झाले आहे.कळत नकळत अनेक बदल येथे नित्यनेमाने सुरु आहेत.. मुंबईची गतिमानता पनवेलकरांच्या जीवनात येत आहे. स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासन जोमाने काम करीत आहे. थोड्याच दिवसात या कामाला लोकप्रतिनिधींची साथ मिळणार  आहे. सिडकोला एमआरटीपी कायद्यांर्तंगत मिळालेल्या अनिर्बंध अधिकारासारखी परिस्थिती पनवेलमध्ये शक्य नसल्याने स्वराज्य आणि सुराज्य याचा सुरेख संगम पनवेलला साकारत आहे. या विकासयात्रेचे पाईक होण्याची संधी महाराष्ट्राच्याच न्हवे तर देशाच्या नागरिकांना आहे. 
       ----- बाबुराव खेडेकर

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income