दै. विश्वरूप'चे चैतन्य !


माझ्या पत्रकारितेचे गुरु म्हणून मी ज्यांचा उल्लेख करत आहे ते  दै. विश्वरूप या रायगड जिल्ह्याच्या वृत्तपत्राचे संपादक श्री. सतीश धारप ! तुम्ही वेगवेगळ्या विचारसरणी असणारे,दिग्गज,ज्ञानी संपादक पाहिले असतील पण प्रतिथयश दैनिकाचा आंधळा संपादक बहुदा पाहिला नसेल ! डायबिटीजमुळे किडन्या आणि डोळे गमावलेले धारप साहेब आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस घेतात.कुटुंबप्रमुख म्हणून आजही या अवस्थेत ते कुणावर  विसंबून न राहता स्वतः पत्रकारितेच्या माध्यमातून पैसे मिळवतात आणि स्वतः आनंदात राहत इतरांनाही आनंद देतात. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांपासून तीर्थरूप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी परीवारापर्यंत त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांची सकाळ पहाटे ४ वाजता होते आणि बरोबर ६ वाजता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच प्रशासकीय सेवेतील महत्वाच्या व्यक्ती यांना 'नेते नमस्कार' म्हणून त्यांचा  फोन जातो. केवळ एकदाच एखादा फोन नंबर त्यांना सांगितला कि तो त्यांना पाठ झालाच म्हणून समजा मग तो नंबर त्यांना एक वर्षानंतर विचारा… 
       मी त्यांच्यासोबत रायगड,रत्नागिरी,मुंबई,ठाणे,पुणे आणि नागपूर इत्यादी जिल्ह्यात फिरलो; येथील बहुतेक रस्ते त्यांना इतके ज्ञात आहेत कि चालक एकवेळ रस्ता विसरेल आणि चुकेल पण यांचे सुक्ष्मावलोकन चुकणार नाही.आजारी,आंधळी व्यक्ती आजही घराबाहेर पडून  डोळस व्यक्तीना जमणार नाही तेथे जावून डोळस व्यक्तींना जमणार नाही अशी कामे केवळ पूर्वानुभव आणि अभ्यासाच्या जोरावर पूर्ण करते हे कलियुगातील आश्चर्यकारक उदाहरण म्हणून मी त्यांचा उल्लेख करेन. धृतराष्ट्र आंधळे असल्यामुळे सत्ताधीश झाले नाहीत पण सत्ता त्यांचीच होती तसेच कांहीसे  श्री. सतीश धारप यांच्याविषयी बोलता येईल. पण धारप साहेब नेहमीच पांडवांच्या बाजूने राहिले आहेत. सत्तेत राहून सकारात्मक बदल घडविणे हाच त्यांचा ध्यास! माणसाने लाचार न राहता स्वयंप्रकाशित राहावे हा आदर्श ते स्वतःच्या आचरणातून ते घालून देत आहेत. 'स्वयं ब्रम्हास्मि'चा खरा अर्थ त्यांना कळला असे मी म्हणेन! नेमका कर्मयोग,ज्ञानयोग आणि भक्तियोग कोणता याचा परिपाठ मी त्यांच्यासोबत अनुभवत आहे. ध्येयासक्ती कशी असावी याचे ये मूर्तिमंत उदाहरणच ! त्यांच्याशी बोलणे आणि त्यांचे बोलणे ऐकणे हे नेहमीच प्रेरणादायी असते याची कबुली त्यांना ओळखणारे नक्कीच देतील. भारतीय संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तर भारतमातेसाठी आपण काय करू शकतो हा त्यांचा ध्यास आज या अवस्थेतही आहे. ते जितके कठोर,निश्चयी,निर्भीड,स्पष्टवक्ते आहेत तितकेच ते कुटुंबवत्सल,प्रेमळ आणि विनोदी आहेत. 
      'मराठा तितुका मेळवावा 
       महाराष्ट्रधर्म वाढवावा ' हे समर्थवचन श्री. सतीश धारप यांच्या नसानसात भिनले असून समर्थांनी सांगितलेला राष्ट्रवाद आणि व्यवहारवाद हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्वतः ते मी सुद्धा मराठा असल्याचे गर्भित अर्थाने सांगतात, मला विचाराल मी म्हणेन ते तिखट ब्राम्हण आहेत (त्यांनाही हे मान्य होईल)मिसळपाव,ठेचा,कोथंबीरवडी हे त्यांचे आवडीचे पदार्थ आहेत. शिरा,पोहे,खिचडी,पियुष,लस्सी,ज्यूस ई.  कुठे चांगले मिळते याची नवनवीन ठिकाणे त्यांनी अनेकांना प्रत्यक्ष तेथे न्हेवून दाखविली आहेत. एकंदरीत 'ब्राम्हण भोजनंम प्रियम' आणि 'विद्वान सर्वत्र पूज्यते' ची अनुभूती मी घेत आहे. त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध पाहिले कि नेमके अजातशत्रू म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगतो. अलिबागचे रविकिरण हॉटेल आणि रायगड जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहे हि त्यांच्या घराबाहेरील थांबण्याची ठिकाणे आहेत. येथून ते अनेक नवे विषय जन्माला घालतात ज्यांचा पुढे इतिहास बनतो. चाणक्य नीतीचे अनुकरण करता करता त्यांचीही धारपनीती तयार झाली असून रायगड जिल्ह्यात धारपनीतीचे अनेक भक्त आहेत.रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य या संकल्पनेत रममाण होवून ते सुवर्णस्वप्न साकार करण्यासाठी  धारप साहेब धडपडत आहेत. 
           शारीरिक अपंगत्व येण्याआधी 'मोरया' स्थापत्य या  त्यांच्या कंपनीची ख्याती शासकीय ठेकेदार म्हणून सुपरिचित होती. अष्टविनायकांपैकी एक असलेले पाली हे त्यांचे मुळगाव. त्यांची वडिलोपार्जित जमीन बल्लाळेश्वराच्या भक्तनिवासासाठी दान करून ते पुण्याला विस्थापित झाले. पुण्यात स्वतःचे घर,अलिबागला विश्वरुपचे स्वतःचे ऑफिस असून ते स्वतः खारघरला भाड्याच्या घरात राहतात. विश्वरूपचा  कर्मचारीवृंद १५ असून हितचिंतकांची संख्या खूप मोठी आहे. मी अनुभवलेले धारप साहेब हे पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेल्या  अस्सल पुणेरी व्यक्तिमत्वाशी साधम्या साधणारे आहे. विषय कुठलाही असो त्या विषयात आपले सबमिशन ते नेहमीच देतात. अर्थात त्यांना राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,ऐतिहासिक,ओद्योगिक,वैद्यकीय याही पलीकडे जावून सहकार,कृषी,हॉटेल व्यवस्थापन आणि टुरीझम वगैरे सर्वच विषयात भरपूर माहिती असल्यामुळे ते कुठल्याही चर्चेत 'माझा यावर आक्षेप आहे' असे म्हणत आपला विचार उपस्थितांच्या गळी उतरवतात ! शुद्ध मराठी बोलीभाषेचा अस्सल पुणेरी स्वाभिमान त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येतो. मराठीच्या विकासाबाबत ते आग्रही आहेत. 


पनवेल भाजपच्या नाविन्यपूर्ण रणनीतीचा आदर्श निर्माण करणारी व्युहरचना करताना सतीश धारप यांनी कांही विचार मांडले, भारतीय परंपरेचे जुणे राजकीय विचार आणि त्यांचे स्वानुभव सोपे करून सांगितले त्याचा परिणाम म्हणून प्रथम खारघर आणि मग पनवेल असा धारपनीतीचा प्रसार झाला तेच  त्यांचे विचारपुष्प …. 

निश्चय,मेहनत,जिद्ध हिच यशाची गुरुकिल्ली आहे. 
राजकारण हे युद्ध असून ते जिंकण्यासाठी आराखडा हवाच !
श्रमाला समाजमान्यता भेटल्याशिवाय पैसे मिळत नाहीत!
नेत्याची मर्जी सांभाळताना मिळणाऱ्या मोबदल्याला वेगळे रूप देणारी व्यवस्था असायला हवी कारण केवळ पगारी कार्यकर्ते नकोत तर स्वयंप्रकाशित स्वयंसेवक हवे आहेत. 
सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची आपण सत्तेत आहोत हे दाखविण्याची इर्षा आपापल्या स्तरावर चालते. 
आंदोलन करताना नव्या चेहऱ्यांना संधी द्या, त्याच त्याच तथाकथित पुढार्यांना किंवा मलिन प्रतिमा झालेल्या पदाधिकार्यांना घेवून आंदोलन करणे म्हणजे आंदोलनाचा सत्यानाश करणे !
राजकारणात यशस्वी होण्यासाठी मिडीयाच्या सातबाऱ्यावर आपले नाव असायला हवे !
वारंवार संधी शोधून प्रतिमा संवर्धन करणे हे राजकीय व्यक्तीसाठी महत्वाचे काम आहे. 
पदाच्या मोहात न राहता रस्त्यावर उतरून काम करण्याची हिम्मत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हवी !
सत्ता, संपत्ती आणि स्त्री याचना करून मिळवता येत नसून त्या खेचून आणाव्या लागतात. 
कुठल्याही गोष्टीचे संघटन स्वार्थी असते, त्यावर आपली पकड हवी असल्यास त्या संघटनासोबत आपण चालायला हवे. 
वैश्विक अद्वैताचे भान ठेवून जातीपाती न मानता कोणतीही प्रादेशिकता न मानता सर्वांशी संवाद प्रस्तापित करत राहा. कारण समाज चांगुलपणावर चालतो. 
राजकीय कार्यकर्त्यांने जाहीररित्या विरोधकांचे दोष बोलणे हे गरजेचे असते. 
आपले युनिट छोटे असते तेंव्हा सर्वांना एकत्र घेवून आपण मोठे व्हायचे असते. 
एखाद्या सामाजिक प्रश्नाबाबत प्रशासनाला निवेदन देण्याची घाई न करता प्रथम लोकांमध्ये जागृतीसाठी सह्यांची मोहीम,पोस्टरबाजी,अभिप्राय मिळविणे असे करावे. 
ज्याला नेता व्हायचे असेल त्याने जोपर्यंत आपल्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करता येत नाही तोपर्यंत लोकांनी केलेल्या टीकाटिप्पणीला पचवायला हवे.
कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांच्या आशा पल्लवित राहण्यासाठी नेत्याने सतत कांहीतरी नवीन उपक्रम करत राहिले पाहिजे.  
नेत्याने जिथे राजकारण करायचे तिथल्या लोकांसोबत मद्यपान करू नये. 
नेत्याने आपल्या पत्नीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण घरची लक्ष्मी खुश तर आपण जग जिंकायला मोकळे!
सर्व विचारप्रवाहांचे स्वागत करून आपण त्यात सहभागी होवून दिशादर्शक बनावे!
नाही नाही म्हटले तरी समाज हा व्यक्तीपुजकच असतो मात्र पक्ष आणि राष्ट्र यांना महत्व देणारे कार्यकर्तेच खरे कार्यकर्ते !

बाबुराव खेडेकर (एम.ए.- मराठी)
उपसंपादक- दै. विश्वरूप,पनवेल 
कार्यकारी संपादक- मासिक मुख्यमंत्री (गाव विकासाचे व्यासपीठ)
सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,रत्नागिरी; 
पुरस्कृत- माजी विध्यार्थी संघटना,कोल्हापूर- अध्यक्ष
संपर्क-9702442024

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income