मुख्यमंत्री मासिकाचे कार्यकारी संपादक या नात्याने मी मे महिन्याच्या अंकासाठी लिहिलेले विचार…



'अवघाची संसार सुखाचा करीन ' या प्रतिज्ञेने हि लेखणी हाती धरली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शास्त्रीय ज्ञानाची सोप्या भाषेत रुपांतरे करून पाठविण्याचा; भारतीय इतिहासातील थोरांची रसरशीत चरित्रे आणि जगातील इतिहासाचे थोडक्यात सार लिहून पाठवायचे आहे. संघटनेची सूत्रे,शिक्षणाचे महत्व आणि विशाल भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचा मानस आहे. हा अंक ज्याचे हाती पडेल ते प्रयत्नशील पुरुषार्थासाठी उठून मृतप्राय पडलेल्या समाजास संजीवनी देतील व समाज खडबडून उठेल असे चैतन्य प्रसार करण्याचे ध्येय ठेवून भूतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची उत्कटता प्रसवायची आहे. जन्मभूमीचे सुपुत्र दारू पिऊन बरबाद होत असताना,सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला असताना,सुशिक्षित तरुण शहराकडे विस्थापित होत असताना,महागाईने जनता त्रस्त झाली असता,परिवहन आणि आरोग्य व्यवस्था निपचित पडली असताना कोणा सॠदय व्यक्तीस सुखाची लालसा,विलासांची आसक्ती आणि भोगाची रुची सुचेल? ज्या राष्ट्रात योग्य स्वाभिमान नाही,स्वधर्म,स्वभाष आणि स्व:इतिहास याबद्धल भक्ती व पुज्यभाव दिसत नाही ते राष्ट्र स्वातंत्र सुखाच्या स्वर्गीय फळांचा आस्वाद कसे घेणार? अनंत दक्षता हीच स्वातंत्र्याची किम्मत असते. म्हणूनच विचार,आचार व उच्चार या तिन्ही गोष्टीत ज्यांची देशभक्ती उत्कटते अश्या देशभक्तांच्या आम्ही शोधात आहोत. कर्तव्याच्या परिपुर्णतेत खरे सुख असते अशी भारतीय संस्कृतीची  शिकवण आहे.  मानवाचा विचार हि चिरकाल राहणारी गोष्ट आहे.त्यामुळे समाजशक्तीला  प्रेरणा देण्यासाठी समाजाच्या चेतनाशक्तीला आवाहन करणारी चिरस्थायी व्यवस्था निर्माण करायला हवी.म्हणूनच जनसंपर्क,प्रबोधन आणि संघटन या त्रिसूत्रीवर काम करावे लागेल. हा देशोद्धाराचा विचार संघर्षमय असला तरी रचनात्मक कामाने आणि योग्य उपाययोजनांच्या प्रभावी अम्मलबजावनीने साधता येवू शकतो अशी आमची स्वच्छ  धारणा आहे. आजही 70 टक्के समाज खेड्यात राहतो आहे. मात्र विकास शहरातून गावांकडे असा होत असताना गावातील सुशिक्षित बेरोजगाराला काम नसल्याने त्याचे विस्थापन शहरात होत आहे. सर्व योजना दलित आणि मागासवर्गीयांना असल्याने केवळ कागदी घोडे नाचवून गाव विकासाची भ्रामक दृश्ये दाखवण्यात येतात. एखाद्या नेत्याच्या मागे लाचार होवून फिरणारी माणसे हे हाताला काम आणि उद्योगाला प्रोत्साहन नसल्याचे उदाहरण आहे. अधिकारी जातील तिथे कुनाशिही वैर न घेण्याच्या भूमिकेत असतात त्यामुळे अनधिकृत कामांना सर्वत्र उत येत आहे.सर्वच क्षेत्रात परिवर्तन करण्याची गरज आहे. सरकारने पुढाकार घेवून खास करून ग्रामीण भागात नमुनेदार प्रकल्प राबवून दाखवले पाहिजेत शिवाय ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीवर भर देत तेथील शैक्षणिक आणि आरोग्य विषयक बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री मासिक ग्रामसेवा आणि ग्रामविकासाचे व्यासपीठ निर्माण करून समाजाला चालना देण्याचे काम करत आहे. संघटन आणि लोकसहभाग याद्वारे सामाजिक आत्मनिर्भयता हे लक्ष प्रत्येक युवकाचे असले पाहिजे. आमच्या या प्रयत्नांनी समाजातील दुर्लक्षित घटकांचा जीवन-संघर्ष सुलभ होईल.सहानुभूतीचे झरे या पत्राचे पोषण करतील. शेकडो विध्यार्थी या पत्राचा आपलेपणाने प्रसार करतील. हे पत्र कोणाचे मिंधे किंवा बंदे नसून भारतीय संविधान हेच प्रमाण आहे. लोकशाहीचा निर्मळ आत्मा जनतेस दाखवून त्याचे उपासक व्हा असे हे पत्र आग्रहाने व प्रेमाने सर्वांना सांगेल ! "मुख्यमंत्री" हे या पत्राचे नाव कांहीना आवडणार नाही,कोणाला यात वेडेपणा वाटेल तर कोणाला अहंकार दिसेल मात्र दिवंगत कवी रवींद्रनाथ म्हणतात 
  ''तुझी हाक ऐकुन कोणी येवो वा न येवो, तू एकटा जा; 
तुझ्या हातातील दिवा टीकेच्या वाऱ्याने विझेल,
श्रद्धेने पुन्हा पेटवून एकटा जा. 
   हेच रवींद्रनाथांचे शब्द ध्यानात धरून हे पत्र आम्ही सुरु केले आहे. या पत्राद्वारे आपल्या गावांचा सर्वांगीण विकास करू इच्छिणाऱ्यांचे संघटन आणि सामर्थ्य वाढावे; वाढण्यात मदत होवो; एवढीच इच्छा आहे !   

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income