धर्मवीर संभाजी महाराज

धर्मवीर संभाजी महाराज

अनुक्रमणिका

हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !


शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे !


छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ रामदासस्वामींनी पाठवलेले





हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !
लेखक : श्री. मिलिंद रमाकांत एकबोटे, कार्याध्यक्ष, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, महाराष्ट्र.

श्री. एकबोटेमहाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते, ही बाब श्री. वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या विद्वान इतिहास संशोधकांनी समाजासमोर मांडली आणि एका महान सत्याला उजाळा मिळाला. संभाजीराजांची खरी ओळख करून देणारा हा लेख त्यांच्या अलौकिक कृत्यांची माहिती देतो.

औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे




संभाजी महाराजसंभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.

संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती
संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.

हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !
शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुुद्धीकरणासाठी' आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्‍न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.

धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.

संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.

शेर शिवा का छावा था ।
देश धरम पर मिटनेवाला
शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी,
एक ही शंभू राजा था ।।

तेज:पुंज तेजस्वी आँखे,
निकल गयी पर झुका नही ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का,
दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।

दोनो पैर कटे शंभूके,
ध्येयमार्ग से हटा नही ।
हाथ कटे तो क्या हुआ,
सत्कर्म कभी भी छुटा नही ।।

जिव्हा काटी खून बहाया,
धरम का सौदा किया नही ।
शिवाजी का ही बेटा था वह,
गलत राह पर चला नही ।।

रामकृष्ण, शालिवाहन के,
पथसे विचलित हुआ नही ।।
गर्व से हिंदू कहने मे,
कभी किसी से डरा नही ।।

वर्ष तीन सौ बीत गये अब,
शंभू के बलिदान को ।
कौन जिता कौन हारा,
पूछ लो संसार को ।।

मातृभूमी के चरण कमल पर,
जीवन पुष्प चढाया था ।
है दूजा दुनिया में कोई,
जैसा शंभूराजा राजा था ।।

शंभूतीर्थ साकार व्हावे, ही श्रींची इच्छा !
श्रीक्षेत्र वढू, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे यांची समाधी आहे. या ठिकाणी राजांच्या जीवनचरित्राला शोभणारे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य आता वेगात सुरू आहे. भुईकोट किल्ल्याच्या स्वरूपातील या स्मारकामध्ये शंभूछत्रपतीच्या तेजस्वी जीवन चरित्रावरील शिल्पप्रदर्शनी, ऐतिहासिक वस्तूंचे व ग्रंथांचे संग्रहालय इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर या वीरभूमीवर मराठी युवकांसाठी लष्करी विद्येचे शिक्षण केंद्र (कमांडो ट्रेनिंग) सुरू करण्याचा धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचा संकल्प आहे.
हे सर्व काम केवळ लोकवर्गणीतून चालू असून साधू-संतांचे आशीर्वाद आणि इतिहासकारांचे मार्गदर्शन या कार्याला लाभले आहे. त्यामुळे हे कार्य पूर्णपणे यशस्वी होणारच याची खात्री आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगडानंतर श्रीक्षेत्र वढूचे महात्म्य मानले जाते. श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे. हा प्रेरणादायी इतिहास साकार होणार आहे `शंभूतीर्थ' या शंभूछत्रपतींच्या स्मारकाच्या रूपाने !

शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।
जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

संभाजीराजांचे प्रत्येक हिंदु बांधवावर उपकार आहेत.त्यांनीच संपूर्ण भारतवर्षातील हिंदु धर्माचे रक्षण आपल्या कारकीर्दीत तसेच आपल्या मृत्यूनंतरसुद्धा केले, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच श्री गगनगिरी महाराज म्हणतात, ``श्रीक्षेत्र वढू (संभाजीराजांचे समाधीस्थान) जगातील सर्व हिंदु धर्मियांची पुण्यभूमी आहे !'' आज रविवार, १८ मार्च रोजी पूजनीय आचार्य धर्मेंद्रजी आणि युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या उपस्थितीत साजर्‍या होणार्‍या संभाजीराजांच्या ३१८ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात प्रत्येक हिंदु धर्माभिमानी व्यक्‍तीने सहभागी होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ही नम्र विनंती ! - श्री. मिलिंद एकबोटे




शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे !


शाहीर योगेशलेखक : शाहीर योगेश, अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर परिषद.
आज फाल्गुन वद्य अमावस्या. बरोबर ३१९ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना श्री क्षेत्र वढु बु.।। येथे औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे ठार केले. देव, देश आणि धर्मासाठी सर्वस्वाचे बलीदान करणार्‍या या युवा वीर, पराक्रमी, रणनीती कुशल, मुत्सद्दी, बेडरवृत्तीच्या लढाऊ राजाला ज्या पद्धतीने ठार मारले, त्यावरून औरंगजेब, मुघली साम्राज्य व त्याची संस्कृती किती हीन दर्जाची होती, हे स्पष्ट होते. तसे पाहिले असता संभाजीराजांना १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे पकडल्यानंतर ११ मार्च १६८९ पर्यंत जिवंत का ठेवले, याचे कारण लक्षात घेणे आवश्यक आहे. औरंगजेब हा अत्यंत हिंदुद्वेष्टा, आप्‍तमंडळींना मारून गादीवर बसलेला धर्मांध बादशहा होता. वर्ष प्रतिपदा हा हिंदूंचा नववर्षाचा पवित्र दिवस असल्याने हिंदूंना कायमची दहशत बसवण्याच्या इराद्याने त्याने पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येला संभाजीराजांना ठार करावे व त्यांचे मस्तक भाल्याच्या टोकावर अडकवून त्याची गुढी उभारून हिंदूंना अपमानीत करण्याच्या इराद्याने संभाजीराजांना मारले. शेकडो लढाया करून त्यांनी एकदाही पराजय म्हणून स्वीकारला नाही. इस्लामी-मोगल ताकदीला त्यांनी सतत ९ वर्षे रोखून धरले अशा या तेजस्वी, लढवैय्या संभाजीराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारा हा लेख !

मेव्हणे गणोजी शिर्के यांची फितुरी व मोगलांचा संभाजीराजांना वेढा !
आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याही शक्‍तीला नाही. आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला, याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी वर्तमानकाळही त्याला अपवाद नाही. शंभूराजांचे वेळीसुद्धा हेच झाले. येसुबाईचे थोरले बंधू म्हणजे शंंभूराजांचे मेव्हणे गणोेजी शिर्के हिंदवी स्वाराज्याशी बेईमान-फितूर झाले. संभाजीराजे कवी कलशाचे कलाने वागतात म्हणून कलशावर पन्हाळा भागात त्यावर हल्ला चढवला, ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळली, तेव्हा ते लगेच शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून येत असल्याचे कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वीच संभाजीराजांनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबल्लाळ चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली व त्याचा जबरदस्त पराभव केला. तिकडे झुल्पीकार खान रायगडावर चालून येत असल्याची खबर राजांना मिळाल्याने शंभूराजे सातारा-वाई-महाड मार्गे रायगडावर परतणार होते; पण मुकर्रबखान कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर मार्गाने चिपळूण-खेड मार्गे रायगडावर जाण्याचा बेत केला. शंभूराजे स्वत: संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात वार्‍यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वरला ४-५ दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूरवरून मुकर्रबखान निघून चालू येत असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर ९० मैलांचे आणि तेसुद्धा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेले अवघड वाटेचे ! त्यामुळे किमान ८-१० दिवसांच्या अंतराचे; परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानाला जवळच्या आड वाटेने केवळ ४-५ दिवसांतच संगमेश्वरला आणले. संभाजीचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांनी फितुरी केली होती व आपली जहागीरी प्राप्‍त करण्यासाठी त्याने हा उद्योग केला. त्यामुळे १ फेब्रुवारी १६८९ रोजी मुकर्रबखानने त्याच्या ३ हजार सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले.

संभाजीराजांचा वेढा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्‍न
संगमेश्वरला ज्या सरदेसाई यांच्या वाड्यात शंभूराजे मुक्कामाला होते, त्या वाड्याला खानाचा वेढा पडला, हे जेव्हा राज्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटले; कारण इतक्या कमी दिवसांत खान येणे शक्यच नाही, हे त्यांना माहीत होते; पण ही किमया केवळ फितुरीची होती, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले. शंभूराजांनी अगोदरच आपली फौज रायगडकडे रवाना केली होती व केवळ ४००-५०० सैन्यच हाताशी ठेवले होते. याच वेळी शंभूराजांकडे कृष्णाजी चिमूल व अर्जोजी यादव हे आपल्या तक्रारी घेऊन आले होते. आता खानाचा वेढा मोडून रायगडकडे प्रयाण करणे हा एकमेव पर्याय राजांपुढे शिल्लक होता; म्हणून राजांनी शत्रूवर तुटून पडा, असा आदेश आपल्या सैनिकांना दिला. या परिस्थितीतही न डगमगता शत्रूचा वेढा तोडून संभाजीराजे, संताजी घोरपडे व खंडोबल्लाळ रायगडच्या दिशेने वेगात निघाले. दुर्दैवाने मालोजी घोरपडे या धुमश्चक्रीत ठार झाले; पण संभाजीराजे व कवी कलश हे मात्र वेढ्यात अडकले. संभाजीराजांनी याही स्थितीत आपला घोडा वेढ्याच्या बाहेर काढला होता; पण मागे असणार्‍या कवी कलशाच्या उजव्या हाताला मुकर्रबखानाचा बाण लागून ते खाली पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी राजे पुन्हा मागे वळले आणि वेढ्यात सापडले.

स्वकियांच्या बेईमानीमुळे राजांचा घात !
या वेळी अनेक सैनिक ठार झाल्यामुळे त्यांचे घोडे इतस्तत: उधळत होते सर्वत्र धुरळा उडाला होता. कोणालाच स्पष्ट दिसत नव्हते. त्याचा फायदा घेऊन शंभूराजे पुन्हा सरदेसाइंर्च्या वाड्यात शिरले. त्यांचा घोडा मात्र तिथेच होता. धुरळा खाली बसल्यावर गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांचा घोडा ओळखला; कारण राजांच्या घोड्याच्या पायात सोन्याचा तोडा असायचा व हे शिर्क्यांना माहीत होते; म्हणून त्यांनी खानाच्या सेनेला संभाजींचा शोध जवळपासच घ्यावा, अशी सूचना केली. अखेर मुकर्रबखानच्या मुलाने म्हणजे इरवलासखानाने शंभूराजांना पकडले. फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला. जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धा स्वकियांच्या बेईमानीमुळे मोगलांच्या जाळयात अडकला.

संभाजीराजांच्या अटकेने मोगल सेनेत आनंद
शंभूराजे पकडले गेल्याची खबर मुकर्रबखानाने अकलूज येथे तळ ठोकून बसलेल्या औरंगजेबाला तत्काल पाठवली व विलंब न लावता शंभूराजे व कवी कलश यांना उंटावर बांधून मुकर्रबखान बहादूरगडाकडे निघाला. संभाजीला पकडले यावर औरंगजेबाचा विश्‍वासच बसत नव्हता; परंतु ही खबर जेव्हा मोगली सेनेत पसरली, तेव्हा सेना आनंदाने बेहोश होऊन नाचू लागली; कारण या सर्वांनीच शभूराजांच्या हातून मार खाल्ला होता. औरंगजेबाने आपला तळ अकलूजहून बहादूरगडाकडे हलवला.

राजांना पहाण्यासाठी मुगलसेना आतूर
संगमेश्वर ते बहादूरगड हे अंतर जवळपास २५० मैलांचे; परंतु मुकर्रबखानाने मराठ्यांच्या भीतीने ते केवळ १३ दिवसांत पार केले व १५ फेब्रुवारी १६८९ रोजी शभूराजे व कवी कलश यांना घेऊन तो बहादूरगडावर दाखल झाला. पकडलेला संभाजीराजा दिसतो कसा, हे पाहण्यासाठी मोगल सेना आतूर झाली होती. औरंगजेबाची छावणी म्हणजे बाजार बुणग्यांचे विशाल नगरच होते. छावणीचा घेर ३० मैलांचा, त्यांत ६० हजार घोडे, एकलक्ष पायदळ, ५० हजार उंट, ३ हजार हत्ती, २५० बाजारपेठा, जनावरे मिळून ७ लाख अवाढव्य सेना होती व संभाजीराजांकडे मात्र केवळ ६० हजार राष्ट्रनिष्ठ मराठे आणि तरीही वयाच्या २४ व्या वर्षापासून ३२ व्या वर्षापर्यंत शंभूराजांनी मोगली पाशवी शक्‍तीशी झंुज दिली आणि एकदाही पराभूत न झालेला हा योद्धा होता, हे विसरता कामा नये.

....आणि धर्मवीराचे डोळे फोडले !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना घेऊन मुकर्रबखान छावणीजवळ आला, तेव्हा औरंगजेबाने सरदारखानाला त्याचे स्वागतास पाठवले. शंंभूराजांना `तख्ते कलाह' घालून उंटावरून त्यांची धिंड काढण्यात आली होती. ढोल ताशे वाजवत ही धिंड सुरू होती. संभाजी महाराजांना खरोखरच पकडले आहे, हे पाहून बादशहाला अत्यानंद झाला. अल्लाचे आभार मानण्यासाठी बादशहा तख्तावरून खाली आला व गुढगे टेकून रूकता म्हणू लागला. कवी कलश बाजूलाच उभा होता. हे दृष्य पाहून कवी मनाच्या कलशाने एक काव्य म्हटले, ``हे राजन, तुम सांच्यो, खुब लढे तुम जंग, तुव तप तेज निहारके तखत त्यज्यो औरंग'' या अपमानीत काव्यामुळे औरंगजेबाने कवी कलशाची जिभ छाटण्याची आज्ञा दिली. त्यानंतर सायंकाळी बादशहाच्या आज्ञेने रुहूल्लाखान शंभूराजांना भेटला आणि तुमचे दागदागिने, खजिने, शस्त्रास्त्रे कुठे आहेत, आमच्या मोगल सेनेतील कोण कोण तुला सामील झाले आहेत, त्यांची नावे सांग आणि तू जर आमच इस्लाम धर्म स्वीकारलास, तर तुला माफ करू व दक्षिणचे राज्य बहाल करू', असे विणवू लागला. अर्थातच शंभूराजांनी हे सर्व प्रस्ताव ठोकरून लावले. यामुळे औरंगजेब संतप्‍त झाला व त्याने शंभूराजांचे दोन्ही डोळे फोडून टाकण्याची आज्ञा दिली. तापलेल्या दोन तप्‍त लोखंडी सळया शंभूराजांच्या डोळयांत खुपसण्यात आल्या, रक्‍ताच्या चिरकांड्या उडाल्या, डोळयांची दोन्ही बुबळे बाहेर पडली व राजांना आंधळे केले. तरीही हा शिवरायांचा छावा कोणत्याही अमिषाला बळी पडला नाही आणि तेव्हापासून राजांनी अन्नपाणी वर्ज्य केले.

वढू येथे संभाजीराजांचा अखेर
औरंगजेबाने नंतर आपली छावणी तुळापूर येथे हालवली. ११ मार्च १६८९ हा वधाचा दिवस नक्की ठरवला. हा दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या, सकाळी १० च्या सुमारास संभाजीराजांना वढू कोरेगांव येथील बाजारात आणले. प्रथम कवी कलशाची मान उडवली आणि नंतर संभाजीराजांचे मस्तक धडावेगळे करून शरिराचे तुकडे तुकडे केले. हिंदवी स्वराज्य विस्तारून संपूर्ण हिंदुस्थान भगव्या ध्वजाखाली आणू पहाणार्‍या संभाजीराजांचा फितुरीने अखेर शेवट झाला.

परकियांकडून राजांबद्दल विकृत लिखाण
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अस्सल पुराव्याअभावी परकियांनी बरेच विकृत लिखाण केले. संभाजीराजांच्या वधानंतर झुल्फीकारखानाने रायगडचा पाडाव केला व तेथील सर्व दप्‍तरखाना व कागदपत्रे जाळून टाकली त्यामुळे सर्व पुरावेच नष्ट झाले. विकृत व चुकीच्या लिखाणामुळे समाजात शंभूराजांबद्दल बरेज गैरसमज निर्माण झाले. आज ही चुकीच्या इतिहासामुळे आपण अजूनही एकात्म होऊ शकलो नाही; परंतु औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने संभाजीराजांबद्दल केलेले वर्णन जेव्हा उजेडात आले त्यानंतर मात्र आमचे डोळे उघडले. खाफीखानाने संभाजीराजांचे वर्णन `सत्तेची नशा चढलेला राजा' असे केले; पण ग्रँड डफ याने या वाक्याचा `ध' चा `मा' केला व `दारूची नशा चढलेला राजा' असे केल्याने `संभाजी म्हणजे रंगेल' राजा असा चुकीचा इतिहास आम्हाला शिकावा लागला. हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा राजमाता सुमित्रा राजे भोसले, श्री. बाबासाहेब पुरंदरे, श्री. शिवाजीराव सावंत, श्री शिवाजीराव भोसले, श्री. विजयराव देशमुख, श्री. प्रतापराव गोडसे, श्री. सुरेश नाशिक्कर, मी स्वत: कार्याध्यक्ष म्हणून आम्ही `संभाजी महाराज ३०० वा बलीदानदिन' नावाची समिती स्थापन केली व राज्यभर प्रवास करून संभाजीराजांचे अस्सल चरित्र समाजासमोर मांडले व आता संभाजीराजांबद्दलचे गैरसमज दूर होऊन त्यांना समाजात योग्य ते स्थान मिळाले. याबद्दल धन्यता वाटते. मी त्या वेळी सादर केलेल्या या दोन ओळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र सांगणार्‍याच आहेत.


देश धरमपर मिटनेवाला, शेर शिवाका छावा था ।
महापराक्रमी, परमप्रतापी, एकही शंभू राजा था ।।

हिंदूंनो, धर्मवीर संभाजीराजांच्या बलीदानाची आग तुमच्या हृदयात सतत धगधगत ठेवा !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income