लेखक विकास चव्हाण लिखित आत्मनिर्भर



गेली चार दिवस झाले सोशल मीडियावर आत्मनिर्भर या शब्दांवर विविध गोष्टी वाचायला येत आहेत. हा काही नवीन शब्द नाही. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला किंवा स्वावलंबी व्हा यातलाच हा एक प्रकार. वास्तविक भारतीय व्यक्तीच्या सरासरी 75 वर्षाच्या जीवनात कमीत कमी 15 वेळा सरकार बदल होतो. त्यामुळे सरकार साठी नाही तर स्वतः साठी आत्मनिर्भर व्हावं हे योग्य राहील. 

मध्यंतरी एक टीव्हीवर पाहिलेली बातमी होती. ती म्हणजे एका मंदिराच्या आसपास राहत असलेली माकडे उपाशी राहत होती. त्यांना खूप दिवस खायला काही न मिळाल्याने हाल होत होते. कुणीतरी एका व्यक्तीने सगळी केळी विकत घेऊन त्या माकडांना खायला घातली. अशी प्राण्यांची स्थिती खूप ठिकाणी होत असणार. तसाच काहीसा प्रकार म्हणजे आम्ही गोव्याला जाताना आंबोली घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला माकडे बसून असायची. कार दिसली की जवळ यायची. कुणीतरी केळी द्यायचे. पण  बिस्कीट देण्यारे जास्त. काहींना खरोखर देऊ वाटत होतं म्हणून. काही लोकांना बिस्कीट देताना फोटो काढून घ्यायचा असतो म्हणून. हाच प्रकार सगळीकडे होत असतो. प्राण्यांना पण सवय लागते. बिस्कीट, कुरकुरे हा त्यांचा आहार नसूनही ते फुकट विनाकष्ट मिळते म्हणून घाटात, मंदिरात येऊन बसतात. आणि स्वतःची जंगलात फिरून अन्न गोळा करायची सवय घालवतात आणि पुढच्या पिढीला पण नकळत हीच सवय लावतात. 

याविषयी एक घडलेली घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे. एक सर्कस होती. त्यात काही पाळलेले जंगली प्राणी. सिंह सुद्धा त्यात होते. काही वर्षांनी सर्कशीच्या मालकाला खर्च परवडत नसेल किंवा सरकारने प्राण्यांना सर्कशीत बंदी घातल्याने मालकाने सगळ्या प्राण्यांना जंगलात परत सोडायचा निर्णय घेतला. सिंहाना सुद्धा जंगलात सोडण्यात आले. 

काही महिन्यांनी सोडलेले कसे जगत आहेत हे बघायला जेव्हा सर्कशीचा मालक जंगलात गेला तेव्हा जे पाहिलं किंवा कळलं ते खूप धक्कादायक आणि कल्पनेच्या पलीकडील होते. जंगलातल्या जंगली कुत्र्यांनी सिंहाची शिकार केली होती. कारण सिंह रोज आयते जेवण मिळत असल्याने शिकार करायचे विसरून गेले होते आणि कुत्र्यांना रोजच्या खाण्यासाठी शिकार करण्याशिवाय पर्याय नव्हता. सिंह आत्मनिर्भर नव्हते आणि जंगली कुत्रे आत्मनिर्भर होते. वर माकडांची पण हीच गत आहे. आत्मनिर्भर नसेल तर जंगलाचा राजा पण स्वतःची ओळख हरवून बसतो हेच खरे.

सध्याच्या आत्मनिर्भर शब्दाचा अर्थ व्यापक असेल. देश स्वावलंबी व्हावा. बाहेरच्या देशावर अवलंबून नसावे. भारतीय वस्तू वापरून आयात कमी व्हावी आणि इथला पैसा इथं राहावा वगैरे. पण हाच विचार छोट्या वैयक्तिक पातळीवर केला तर एक गोष्ट समजेल ती म्हणजे स्वतः स्वावलंबी व्हावे आणि इतरांना आपल्यावर अवलंबून न ठेवता त्यांनाही स्वावलंबी करावे. यामध्ये घरातील लहान मुलांना स्वतःचे कपडे बदलणे, आंघोळ करणे, कपड्यांच्या घड्या करून कपाट लावणे, घर झाडून घेणे, स्वतःचे ताट वाटी धुणे यापासून घरातल्या पुरुष व्यक्तीने काहीतरी जेवण बनवायला शिकणे या सगळ्याचा समावेश करायला हवा. कशीही वेळ आली तर आपण जिथे असू तिथून निभावून नेऊ यासाठी हा विश्वास, स्वावलंबीपणा हवाच. याशिवाय तीन चार महिन्याचे घरखर्चाचे पैसे नेहमी साठवून ठेवावेत हाही एक धडा. अजूनही घरातले वयस्कर लोक वर्षभराचे धान्य एकदम साठवून ठेवतात ते यासाठीच असावे. नाहीतर आत्मसन्मान कमी होत जातो. तो संपला तर जगण्याची उर्मी राहणार कशी? 

आत्मनिर्भर होणं हा समृद्ध करणारा प्रवास आहे, अनुभव आहे. यात स्वतःला ओळखणे, आत्मसन्मान जपून स्वतःची ओळख वाढवणं आहे. मग आत्मनिर्भर होणं ही अनुभूती आहे. ज्यात आनंद आणि आत्मविश्वास आहे.

भारतातल्या स्त्रियांना बाहेर जाण्यासाठी , बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी स्वतःच्या, मुलांवर अवलंबून रहावे लागते हे एक प्राथमिक उदाहरण. जेव्हा तीच स्त्री गाडी शिकून स्वतः बँकेत जाऊन स्लिप भरून पैशाचा व्यवहार करेल तो दिवस तिच्यासाठी आत्मनिर्भरतेचा नवीन शोध असेल. अगदी ऑनलाईन शॉपिंग किंवा स्वतःचा रिचार्ज स्वतः करेल तोही नवीन अनुभव असेल.  त्याचा आनंद त्याच स्त्रीला माहीत. आपणही ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्या शिकून आत्मनिर्भर व्हावं आणि आत्मविश्वास वाढवावा हेही योग्य राहील. अगदी पोहायला शिकणं, किंवा प्रत्येक स्त्रीने दुचाकी, चारचाकी शिकणे हे सुद्धा आणि एक उदाहरण. नवीन ज्ञान, कौशल्य घेतल्यानेच हे शक्य आहे. प्रत्येक जण आपापल्या गरजेप्रमाणे यात वाढ करू शकतो. 

इतिहास घडतो, बदलतो हे खरं आहे. पण आपण इतिहासातून काय शिकणार हे बघायला हवं. अशी वेळ परत येऊ नये म्हणुन काही करता आले तर किंवा वेळ आली तर आपण सहज सामोरे जायला तयार असेल तर आत्मनिर्भर झालो असे समजू. 

आत्मनिर्भर हा शब्द व्यापक आहे. प्रत्येकाने आपापल्या विवेकाने अर्थ शोधावा. मला हा अर्थ सापडला. धन्यवाद 

-- विकास चव्हाण
कोल्हापूर
9422748271

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income