पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा
वाफाळत्या चहाला ग्लॅमर
पनवेल {बाबुराव खेडेकर}
वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणारे शौकीन सर्वत्र आढळतात. मात्र पनवेलमध्ये चहाच्या विविध प्रकारांना बॉलिवूडचे ग्लॅमर लाभले आहे. त्यामुळे चहाचा प्रत्येक चस्का घेताना चहाशौकिनांचा आनंद द्विगुणित होतो.त्यातूनच माधुरी आणि हेमा या चहाची लोकप्रियता पनवेल परिसरात वाढली आहे.
पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके रस्त्यावर असलेल्या गणपती टी हाऊस मध्ये गेल्यावर एक माधुरी,बे माधुरी असे शब्द कानावर पडतात. तर पनवेल उपहार गृहामध्ये एक हेमा दोन हेमा असे ऐकावयास मिळते. जुन्या जाणत्या ग्राहकांच्या हे शब्द अंगवळणी पडले आहेत. परंतु नव्या ग्राहकाला माधुरी हेमा हे काय प्रकार आहेत याची उत्सुकता वाढते. त्यामुळे नवा ग्राहकही या चहाच्या प्रकाराचा आस्वाद घेण्यासाठी सरसावतो.
गणपती टी हाऊस माधुरी चहासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी रजवाडी,टमटम,बादशाही हे चहाचे प्रकारही मिळतात. परंतु धकधक गर्ल माधुरीच्या नावाने असलेल्या चहाला ग्राहकांची सर्वाधिक मागणी असल्याचे येथील चहाचा कारागीर नंदू याचे म्हणणे आहे. नेहमीचा ग्राहक लांबून दिसताच नंदू माधुरी चहाच्या तयारीला लागतो. या चहाचे माधुरी हे नामकरण कसे झाले याबाबत विचारणा केली असता मालकाने सांगितले कि, ज्यावेळी माधुरी दीक्षित लोकप्रियतेच्या शिखरावर होती त्यावेळी कांही ग्राहकांच्या मुखातून चहा पिताना धकधक व्हावी असा आस्वाद असलेला चहा हवा असा विचार करून माधुरी चहाचे नामकरण झाले.
याच पद्धतीने पनवेल च्याच टपालनाका नजीक महात्मा गांधी रस्त्यावर असलेल्या पनवेल उपहार गृहात हेमा या नावाने मसालेदार चहा मिळतो. दिवसभर हेमा चहाचे ग्राहक येथे वाफाळलेल्या मसालेदार चहाचा चस्का घेत असतात. हेमा हे चहाचे नाव फार पूर्वीपासून आहे. आणि ग्राहकांच्या तोंडी हे नाव रूढ झाल्याचे समजते.
धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे फॅन खूप आहेत.तसेच पनवेलमध्ये मिळणाऱ्या या दोन अभिनेत्रींच्या नावाच्या चहा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. हा चहा कसा बनवतात हे सांगणे येथील व्यवस्थापनाने टाळले मात्र चहाचा आस्वाद नक्कीच घ्यावा असा हा येथील वाफाळता चहा आहे. आता कुठे पावसाला सुरवात होत आहे. कोसळणाऱ्या पाऊसधारांमध्ये पनवेलमध्ये असाल तर हेमा किंवा माधुरी चहाचा आस्वाद नक्कीच घ्या !
RamPrahar @ 24 jun 2017
Comments
Post a Comment