कविवर्य सुनिल शिवाजी खवरे यांचे कोरोना लॉकडावुन दरम्यानचे प्रवासवर्णन !
कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूंमुळे संपूर्ण जग हतबल झालं होतं आणि लॉकडाऊन मुळे माझ्यासारखे कित्येक जण नोकरी निमित्त बाहेर गावी अडकले होते.
पोटा पाण्याच्या प्रश्नांची उकल होत न्हवती. आता होते न्हवते पैसे सुद्धा संपत आले होते. आणि अजून लॉकडाऊन किती दिवस आणि किती महिने वाढवला जाईल याची कल्पना न्हवती. म्हणून मी व माझ्या बायकोने गावी जाण्याचा निर्णय घेतला.गावी जाण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरला मेडिकल टेस्ट करुन घेतल्या पण गावी जायचं कसं हा मोठा प्रश्न होता. कारण लॉकडाऊन मुळे राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या बंद होत्या शिवाय प्रायव्हेट गाड्यांना सुध्दा बंदी होती आणि बाईक वर फक्त एकाच व्यक्तीला वाहतुकीस मुभा होती. अशा परिस्थितीत गावी जायचं कसं हा यक्षप्रश्न आमच्यासमोर उभा राहिला होता.
ठीक ठिकाणी पोलिसांनी चेक पोस्ट बनवले होते व कांही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.
बायको व दोन मुलांनसहित आता गावी कसं जाता येईल या विवंचनेत मी होतो.पण शेवटी थांबण्याचा संयम संपला आणि जे होईल ते होईल म्हणून रविवारी पहाटे चार वाजता उठून सर्व आवरा आवर केली आणि सव्वा पाच वाजता बाईक स्टार्ट केली आणि जयसिंगपूरातून गावी जाण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला.
अजून अंधाराचे गडद काळोखे रंग विरले न्हवते संपूर्ण रस्ता अंधारात हरवला होता आणि मनात विचारांचे काहूर माजले होते.
कुठेतरी पोलिसांनी अडवले तर...?
पुन्हा मागे पाठवतील का...?
किंवा CPR मध्ये दाखल करून क्वारंटाईन केले तर....?
किंवा
बाईक जप्त करून दंडात्मक कारवाई केली तर...?
अशा कैक प्रश्नांचे विचारचक्र डोक्यात फिरत होते.
आणि मी बाईक अधिक वेगाने पळवत होतो.
हातकणंगले आले आणि रस्त्यात पोलिसांनी बॅरिकेट लावलेले दिसले डोळे क्षणभर आपोआप मिटले आणि जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला पोलिस दिसले आणि पुन्हा मनात विचारांची वावटळ उठली.
पण मीच जरा धाडसाने बाईक न थांबवता सावकाश पुढे जात राहिलो आणि काय सुदैव आम्हाला पोलिसांनी अडवले नाही.
मी सुटकेचा निःश्वास टाकला आणि पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. पुढे शिरोळी नाका आला आता मात्र मी हबकलो कारण इथे खूप कडक बंदोबस्त असेल ही मला खात्री होती. पण माझी खात्री फोल ठरली आणि मी तिथून सुद्धा सुखरूप सुटलो आता कोल्हापूर आणि कागल इथेच जरा भीती होती म्हणून मी अंदाज घेत बाईक चालवत होतो. कोल्हापूर सुद्धा मागे गेले आणि थोड्या आशेचे किरण मला क्षितिजावर दिसू लागले. आता उजाडत होतं.मॉर्निंग वॉकला किंवा जॉगिंगला बाहेर पडलेल्या माणसांचे जथ्थेच्या जथ्थे रस्त्यावर दिसत होते.
कागल आले आणि मी निढोरी मार्गे गाडी वळवली .मनात असलेली धाकधूक आता थंडावली होती आणि गार वाऱ्याच्या स्पर्शाने एक वेगळीच धुंदी मनात संचारली होती.
वाघजाई घाटातून प्रवास करताना निसर्गाची विविध रूपं डोळ्यात साठवत होतो आणि बायको मुलांनाही निसर्गाच्या शाळेतील मुळाक्षरं शिकवत होतो.
आता कापशी ओलांडून आम्हीपुढे आलो होतो त्यामुळे उरली सुरली भीतीची पाखरं आकाशात उडून गेली.
साडेआठ वाजता मी देसकतीतल्या वडाजवळ पोहोचलो.तेंव्हा मला रामुमामा आणि गुंडूआबा नळा जोडताना दिसले त्या दोघांनी आस्थेने चौकशी केली आणि मला गावी आल्याचं समाधान लाभलं. मी मग भैरुगोंडाच्या खडकाला आलो इथं माझ्या मामेभावांनी म्हणजे बाजीराव व ज्ञानदेव या दोघांनी टुमदार व देखणी अशी खोप बांधली आहे अर्थात ती त्यांच्या दुधाळ जनावरांसाठी बांधली आहे पण तूर्तास या खोपीत आम्ही इथून पुढचे चौदा दिवस होम क्वारंटाईन म्हणून राहणार होतो. खोपीत आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या तेंव्हा लहानगा पृथ्वीराज झोपला होता व स्वराज इथला निसर्ग पाहण्यात गढून गेला होता.
नंतर आम्ही पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घेतली आणि परत आलो तेंव्हा इथं आमच्या गावचे सरपंच श्री बाळासो जाधव व माजी सरपंच श्री प्रताप मेंगाणे तसेच एकनाथ जकीनकर व दत्ता डावरे ही मान्यवर मंडळी मला होम क्वारंटाईनचे नोटीस द्यायला व तशी रीतसर नोंद करून घ्यायला आले होते. आमच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून व कांही महत्त्वाच्या सूचना सांगून ही मंडळी गावी परतली.
आणि या भैरुगोंडाच्या खडकाला आम्ही इथं चौदा दिवस राहायला आलोय याची जाणीव झाली.
अंगणात थोडा झाडू मारला थोडा वेळ निवांत बसलो आहे खोपीच्या समोरच्या बाजूला नदीकाठावरील झाडीत करंजीच्या वृक्षावर मला धनेश (indian hornbil) हा पक्षी दिसला.मी पटकन दुर्बिणआणली आणि त्याला निरखू लागलो इतक्यात तो उडून गेला. मी थोडा हताश झालो .पण मला खात्री होती की तो मला चौदा दिवसात परत एकदा तरी दिसणार होता.
घरातून पाठवलेले जेवण जेवलो. थोडावेळ शितल व मुलांनी विश्रांती घेतली .मी बसून कंटाळलो होतो. दिवसभर बऱ्याच मित्रांचे कॉल आले कांहीना मी केले. एकंदरीत खूप बरे वाटले.
आईने पाठवलेल्या व पप्पांनी घरातून आणलेल्या कांही जीवनावश्यक वस्तूंच्या सामानांची व्यवस्थित मांडणी करून घेतली.आता सूर्य माथ्यावर आला होता त्यामुळे उकाडा जाणवत होता. पहिल्यांदाच माझ्याकडे वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध न्हवती म्हणून मी आता निसर्ग वाचन करणार होतो. दिवस हळूहळू कलू लागला तसं आभाळात मळभ दाटून आले. बघता बघता काळ्याकुट्ट ढगांची आभाळात गर्दी जमू लागली.
तसं या खोपीचं काम अजून थोडं बाकी असल्याने पाऊस आला तर कदाचित आत पाणी येण्याची शक्यता होती.
वरून थोडा भाग उघडा होता ,आजूबाजूला पक्क्या भिंती नसल्यामुळे वळवाच्या पावसाचे पाणी आत येऊ शकले असते. म्हणून थोडी भीती वाटत होती.
शितलला चूल पेटवून दिली आणि चहा करायला सांगितले. स्वराज आणि पृथ्वीराज मातीत खेळत होते. इतक्यात ढगांचा गडगडाट सुरु झाला. आणि पोरं घाबरून गेली.
चहा वगैरे गडबडीत घेतला तोवर विजांचा आकाशात कडकडाट सुरु झाला.
विजांचं हे तांडव नृत्य पाहून माझाही जीव क्षणभर घाबरून गेला .मायलेकरं घाबरून एकमेकांना घट्ट बिलगली होती.
आणि विजांच्य कडकडाटाने आभाळाचीच जणू दातखीळ बसली होती. विजांचं कडाडनं इतक्या जवळून आणि इतकं भयावह रूप मी कधीच पाहिलं न्हवतं. बराच वेळ विजा चमकत होत्या, कडकडत होत्या. थोड्या वेळानं आभाळाचं बरसणं सुरु झालं आणि खोपीत पाणी गळू लागलं.
तेंव्हा आगीतून फुफाट्यात आल्यासारखं वाटू लागलं.
बाहेर पेटवलेली चूल विझली होती.मी खोपीतच आता तीन दगडांची चूल केली आणि मग शितल स्वयंपाक करण्यात गढून गेली.व मी मुलांना खेळवण्यात दंग झालो.
आमच्याकडे चार्जिंगचा दिवा होता तो आता विझत आला होता. नऊ वाजता बाजीराव व माझा मावसभाऊ संतोष दादा आमच्यासाठी बॅटरी घेऊन आले.
सव्वा नऊला आम्ही जेवलो .थोडावेळ मी व शितल बोलत बसलो तेंव्हा मुलांच्या डोळ्यात झोप पिंगा घालू लागली होती. नंतर ती गाढ झोपून गेली.
नंतर शितल सुद्धा झोपी गेली.
पण मला मात्र झोप येत न्हवती.
रात्र सरत न्हवती
वेळ जात न्हवता
मग बॅगेतून वही काढलीआणि कोऱ्या कागदावर पेनाचं कुरकुरनं चालू ठेवलं.
जेंव्हा थांबलो तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते....!
" डोळा न येई झोप
साक्षीस स्तब्ध खोप..!"
- सुनिल शिवाजी खवरे
9820992502
Nice sunil
ReplyDeleteसुनीलजी आपल्या कविता खूप मार्मिक असतात तसेच हे लिखाणही मार्मिक आहे ! आपल्या जिवाची घालमेल.. कुटुंबासोबत गाव गाठण्याचा आपला निर्धार... अखेर गावाबाहेर राजीखुशीने कोरोंटाइन होण्यामागील आपले धाडस यासर्व बाबी प्रेरणादायी आहेत. कायद्याच्या राज्यात आपण सुज्ञ नागरिक म्हणून आपले कर्तव्य चोख पार पाडले. इतरांना हा आपला प्रवास खुपकाही शिकवून जातो.
ReplyDeleteधन्यवाद खेडेकर साहेब
Deleteआपली ही प्रतिक्रिया दीर्घकाळ मनाच्या कप्प्यात दरवळत राहील....!
खूपच छान प्रवास वर्णन केलेस सुनिल.
ReplyDeleteधन्यवाद सर....!
Deleteमनःपूर्वक आभार....!