रायगड भाजपचे आचार्यकुल !
चैतन्याचे कर्मनिष्ठ साधक
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी संपूर्ण सृष्टी ही चैतन्याची आनंदमय अभिव्यक्ती आहे हे आपल्या चिद्विलासवाद मध्ये मांडले. विश्वात्मक देवाच्या भक्तीतून मुक्तीचा मार्ग दाखवताना त्यांनी नामामृताचे सुगम साधन सांगताना त्यांच्या हरिपाठात ''सर्वांघटीं राम देहांदेही एक, सूर्यप्रकाशच सहत्ररश्मी'' हे स्पष्ट केले. देव रोकडा सज्जनीं म्हणणाऱ्या या संतांच्या महाराष्ट्र भूमीत मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानणारी जीवनचरित्रे पाहायला मिळतात त्यातीलच एक म्हणजे आमचे सदगुरू रायगड जिल्ह्यातील सतीशजी धारप हे होय. श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वेदमहर्षी नारायण धारप यांनी त्यांची जागा बल्लाळेश्वराच्या भक्तनिवासाला दान देऊन दातृत्वाचे आणि समाजसेवेचा आदर्श धारप कुटुंबियांना घालून दिला. याच वाटेवर हे धारप कुटुंबीय अव्याहत चालत आहेत.
रायगड जिल्ह्यातील राजकारण आणी पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे प्रामुख्याने छंद म्हणुन व्यापून टाकलेल्या धारप साहेबांनी त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी ठेकेदारी व्यवसाय मोठ्या नेटाने करतात.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे:
उदास विचारे वेच करी:
ही संत शिकवण आचरणात आणत ते सढळ हस्ते यथाशक्ती अनेकांना मदत करत असतात. रायगड जिल्ह्यातील तरुणांनी मुंबईत जाऊन कुठेतरी राहून नोकरी करण्यापेक्षा जिल्ह्यात पडेल ते काम करावे त्यासाठी जिल्ह्यातील कंपन्यांनी भूमिपुत्रांनाच प्राधान्याने घ्यावे हा त्यांचा आग्रह; तसेच व्यवसायात त्यांनी पुढे यावे म्हणून आर्थिक मदत देणारा पहिला हात त्यांचाच असतो. अलिबाग भाजप तालुकाध्यक्ष म्हणुन त्यांच्यावर 1990 साली जबाबदारी देण्यात आली. अलिबाग मध्ये भाजप अस्तित्वासाठी झगडत होता तो हा काळ. मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी केलेला रास्ता रोको हे भाजपचे येथील पहिले जाहीर आंदोलन पण त्या आंदोलनाची दखल प्रसार माध्यमांनी तत्कालीन शेकापच्या प्रभावामुळे घेतली नाही त्यामुळे मीडियाच्या सातबारावर आपले सुद्धा कुठेतरी नाव हवे अशी पक्की खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. यातूनच अगोदर कुलाबा दर्पण आणि नंतर विश्र्वरूप ही दैनिक वृत्तपत्रे त्यांनी यशस्वीरित्या चालविली. त्यांची पत्रकारिता जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अविस्मरणीय अशीच राहिली.
धारप साहेबाना जे ओळखतात त्यांना त्यांच्या शारीरिक व्याधी बद्दल माहिती आहे. त्याबाबत जाहीर वाच्यता न करता केवळ एवढेच सांगता येईल की ज्या स्थितीत लोक गतप्राण होऊन परावलंबी होतात त्या स्थितीत धारप साहेब अनेकांचे केवळ प्रेरणास्रोत न राहता आश्रयदाते सुद्धा होतात हे अनाकलनीय आहे याची प्रचिती कोकणातील अनेक लोकांना आहे. याचे गमक काय शोधण्याचा प्रयत्न केला असता एक गोष्ट समोर येते ती म्हणजे त्यांची गणेश भक्ती आणि त्यामार्गावर त्यांच्याकडून होणारी सदगुरूसेवा. अनुभवसिद्धता यायला सुद्धा योग यायला लागतो. जीवनाच्या नाजुक प्रसंगी धीर देणारा त्यांच्या सदगुरू यांच्याशी संपर्क झाला असता त्यांना उपदेश मिळाला की," श्रद्धेचे आंधळेपण आल्याशिवाय दिव्यदृष्टी प्राप्त होत नाही!" हा उपदेशच त्यांना उभारी देऊन गेला. ईश्वरप्रती समर्पित भावनेची श्रद्धा असली की तो सर्वकाही देतो याची प्रचिती त्यांना आली.
या प्रवासात त्यांना समर्थ साथ लाभतेय ती त्यांच्या धर्मपत्नी सौ. रोहिणी धारप आणि सुविद्य चिरंजीव अथर्व धारप यांची. माऊलींच्या भावार्थदीपिकेचा हिंदी अनुवाद तसेच संत कबीरांच्या दोह्यांचे संस्कृत अनुवाद करणाऱ्या श्रीमती सुनंदा देवस्थळी यांच्या कुलीन घराण्यातील असलेल्या रोहिणीताई यांचा स्वभाव रोखठोक असला तरी त्या कमालीच्या प्रेमळसुद्धा आहेत. धार्मिक कार्यात कर्मठता, उत्कृष्टेचा ध्यास, तंतोतंत नियोजन, व्यवहारवाद हा ब्राम्हण समाजाचा स्थायीभावच. मुळात त्या कऱ्हाडी ब्राम्हण असल्याने रुचकर भोजन या विषयात त्यांचा हात कोणी धरत नाही. त्यांचं पूर्वी पुण्यात असलेलं चटक मटक आणि आता नवी मुंबई वाशी मधील हॉटेल अच्छे दीन यात हे दिसून येते. धारप परिवार चालवत असलेल्या विश्र्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुद्धा रोहिणीताई धारप याच आहेत. दोन्ही उभयतांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांची आयुष्ये प्रतिष्ठान प्रकाशमान करत आहे.
रसिक धारप साहेब.
साहेबांचा पिंड कलाकारचा. त्यांनी इयत्ता पाहिलीत असताना सांधीपाणी ऋषीची भूमिका केली होती. दहावीत असताना नटसम्राट केले. ठेकेदार झाल्यावर आईशप्पथ नावाचा चित्रपट केला होता. धारप साहेब यांना भेटायला आलेले लोक त्यांना या अवस्थेतही आनंदित पाहून अचंबित होतात. आत्मसाक्षात्कारामुळे दुःखात सुद्धा सुखी राहणे यालाच तर ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात
हरिजप करणे,
तुटेल धरणे प्रपंचांचे.
रायगडाचे आचार्यकुल
रायगड जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष बसणार असून धारप साहेबांचे एक स्वप्न पूर्णत्वास येत आहे. रायगड जिल्ह्यातील काँग्रेस आणि शेकापची पीछेहाट आणि भाजपची घोडदौड यामध्ये चाणक्याची भूमिका धारप साहेबांचीच आहे हे सर्वजण मान्य करतात. त्यांच्या धारपनीतीचे चाहते सर्व पक्षात असून त्याना रायगडचे आचार्यकुल म्हटले तर वावगे ठरणार नाही.
धारप साहेब म्हणजे पाककलेचे बल्लवच !
धारप साहेबांचे पुण्यात चटक मटक नावाचे हॉटेल होते. साहेब मुंबईला शिफ्ट होताना ते बंद पडले. कालांतराणे नवी मुंबईतील वाशी येथे हॉटेल अच्छे दिन नावाने उभयंतांनी महाराष्ट्रीयन व्यंजणांचे हॉटेल सुरु केले आहे. तेथे त्यांच्या हाताखाली अनेक कुक घडत गेले. अनेक मंत्र्यांच्या घरी असणारे कुक एकतर त्यांनी पाठवलेले असायचे किंवा त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असायचे. अलिबाग येथील त्यांच्या घरी जी उत्तम भोजणाची मेजवानी अनेक लोकप्रतिनिधी यांच्या मनात घर करून आहे ती धारप साहेबांच्या पाक कलेचाच एक परिपाक म्हणायचा.
त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर प्रत्येकाच्या शरीरात ईश्वर आहे आपण जेवतो म्हणजे त्यालाच ते देत असतो. आपली परिस्थिती बेताची असेल तर कमी द्यावे पण उत्तमच द्यावे. कारण आपला आहार उत्तम असेल तर आपले विचार पण उत्तम होत जातात. अशा माणसाच्या मनातील हा भाव ओळखून देव सुद्धा काही कमी पडू देत नाही. माणसाने प्रत्येक गोष्ट घसघशित आणि रसरशीत करावी.
अहर्निशम सेवामहे
धारप साहेबांनी त्यांच्या विश्वरूप प्रतिष्ठान मार्फत कोलाड नाक्यावर एक डायलिसीस सेंटर सुरु केले. तेथे मुंबई मधील उत्तम वैद्यकीय दर्जाची सेवा मिळेल याची काळजी घेतली. केवळ 1000 रुपयात ना नफा ना तोटा तत्वावर येथे डायलिसीस केले जाते. काही वर्षांनी त्यांनी स्वतःच्या नावावर अलिबाग येथेही एक डायलिसीस सेंटर सुरु करून ते कमळ नागरी सहकारी पत संस्थेला चालवायला दिले. येथेही हजार रुपयात सेवा दिली जाते. धारप साहेब भेटेल त्याला संधी असेल तेथे आरोग्य विम्याचे महत्व समजावून सांगतात. ते सर्वाना सांगतात ईश्वराचे आराधन तेंव्हाच होते जेंव्हा तुमची पकृती उत्तम असतें . शक्ती असेल तर उत्साह असतो. म्हणूनच गुरुमाऊली सांगतात लहान वयापासुन आराधन करा.
रायगड मधील एका मोठ्या नेत्याने मला एकदा विचारले धारप साहेबाना तू एका शब्दात वर्णन करायचे झाले तर काय सांगशील ? तेंव्हाही मी असमर्थ ठरलो होतो आणि आजही एका शब्दात किंवा एका वाक्यात काही जीवन चरित्रे वर्णन करता येत नाहीत हेच खरे..! एकंदरीत धारप साहेब
-- बाबुराव खेडेकर (स्वीय सहाय्यक आणि मुक्त पत्रकार )
Comments
Post a Comment