पनवेलमधील शासकीय वसाहती रामभरोसे
सा.बां. विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !
पनवेल :- { बाबुराव खेडेकर }
शहरातील जुना ठाणा नाका रोडवरील शासकीय वसाहतीच्या इमारती धोकादायक स्थितीत असून दररोज घरांमध्ये स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहेत. येथे स्ट्रीटलाईटची व्यवस्था नाहीच जिन्यावर सुद्धा विजेची व्यवस्था नाही. परिसरातील अस्वच्छता वाढलेले गवत त्यातून डुकरांचा खुलेआम वावर; त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्लू सारख्या आजाराची भीती,धोकादायक इमारती आणि पाण्याच्या टाक्या,संरक्षण भिंतीचा थांगपत्ता नाही,ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही ,पाणी व्यवस्थापनातही गोंधळ या नरकयातना रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रोज भोगत आहेत. कळंबोलीतील सेक्टर ४ ई येथील शासकीय वसाहतीची अवस्थाही अशीच असल्याने पनवेलमधील शासकीय वसाहती रामभरोसे असून येथील रहिवाश्यांची अवस्था ”तोंड दाबून बुक्यांचा मार ” अशीच होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
पनवेल येथील जुना ठाणा रोडवर असलेल्या शासकीय वसाहतीमधील नागरिक रामभरोसे अशाच परिस्थितीत राहत आहेत. गेली ५ वर्षे या इमारतींच्या डागडुजीबाबत रहिवाशी पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा करीत आहेत. मात्र निगरगठ्ठ झालेल्या प्रशासनावर काहीही परिणाम झालेला नाही उलट राहायचे तर रहा नाहीतर सोडून जा असे उद्दामपणे बोलणारे प्रतिनिधी नागरिकांच्या जखमेवर मीट चोळत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधीनाही आपले कर्मचारी कुठल्या अवस्थेत राहतात याचे सोयरसुतक नाही. शासकीय अधिकारी असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेविरोधात येथील रहिवाशी ब्र काढीत नसले तरी महिलांनी आता सय्यम सोडत माध्यमांकडे न्याय मागितला आहे. इथे जर दुर्घटना झाली तर कोण जबाबदार ? असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत. येथील इमारतींना गेली पाच वर्षे रंग काढलेला नाही.पाण्याची टाकी कधी कोसळेल सांगता येत नाही. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे इतरत्र गाड्या पार्किंग करण्यात येतात. इमारतींच्या भिंतींना तडे गेलेलं आहेत.दररोज स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
या परिसरामध्ये धूर फवारणी होत नाही. ड्रेनेजचे पाणी पंपहाऊसमध्ये जाण्याची भीती कायम आहे. डुकरे,साप,भटकी कुत्री यांचा मोकळा वावर यापरिसरात आहे.संरक्षक भिंत नसल्यामुळे शेजारील नित्यानंद नगर मधील सांडपाणी या परिसरात घुसले आहे. या वसाहतीला महापालिकेने पाण्याच्या ७ लाईन दिलेल्या आहेत. त्यामुळे दिवसाआड दिवसातून एकवेळ अर्धा तास येथे पाणी येते.नळजोडण्या वाढवून घेण्याचीही नागरिकांची मागणी प्रलंबित आहे.येथील पाण्याच्या टाक्या साफ होत नाहीत त्यामुळेही नागरिक त्रस्त आहेत.पाणी सोडणारे कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार काम करत असल्याचाही नागरिकांचा आक्षेप आहे. येथे राहणारे बरेच शासकीय कर्मचारी या दुरवस्थेला कंटाळून आपल्या नातेवाईकांना येथे राहायला देऊन अन्यत्र राहायला गेले आहेत.कांही निवृत्त कर्मचारीसुद्धा येथे सा. बां. विभागाशी अर्थपूर्ण सहकार्य केल्यामुळे राहत आहेत असेही बोलले जात आहे.
”शासनाचे काम आणि सहा महिने थांब” असाच हा सर्व प्रकार समोर येत आहे.आपल्या परिवारासह नव्या शहरात राहणारे शासकीय कर्मचारी यांना होणारा त्रास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याना दिसू नये यासारखे दुर्दैव नसावे अशीच भावना पनवेलमधील नागरिक यानिमित्ताने व्यक्त करीत आहेत.
Comments
Post a Comment