ति'च्या हाती विळी
पनवेल :- { बाबुराव खेडेकर }
लोणच्याचे आंबे फोडणे हे पुरुषांचे काम पनवेलमध्ये महिला करत आहेत. या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या हाती कुटुंब उद्धारासाठी विळी आली असून वयाची साठी ओलांडत असेलल्या या स्त्रिया समस्त स्त्री वर्गासाठी प्रेरणादायी काम करीत आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी स्त्रियांनी मोडून काढली आहे. अगदी रिक्षा टॅक्सी चालविण्यापासून सैनिकी विमान चालविण्यापर्यंत स्त्रियांची मजल पोहोचलेली आहे. स्त्रिया कधीच ''चूल आणि मुल'' या संकल्पनेतून बाहेर पडून कुटुंबासाठी आर्थिक भांडवल उभे करीत आहे. याचेच कांही नमुने पनवेलमध्ये पाहायला मिळतात. पनवेल रोज बाजार आणि महानगरपालिकेच्या भाजी मार्केटमध्ये तीन वृद्ध स्त्रिया पूर्वापारपणे लोणच्याचे आंबे फोडून देताना दिसतात.
सुमन नारायण कोळी (वय ६०) राहणार आकुर्ली या वयाच्या १२ वर्षांपासून त्यांच्या आई सोबत बाजारात आंबे विकायला यायच्या. तेंव्हापासून त्यांनी आंबे फोडून विकण्याच्या कामाला सुरवात केलेली असून विळी त्यांच्या हातात आजही आहे. दुसऱ्या आकुर्लीच्या द्रौपदी काकडे (वय- ५५) या अपंग असून गेली ३० वर्षे त्या हे काम करीत आहेत. त्यांचे अपंग पती १४ वर्षांपूर्वी वारले आहेत. या दोघी महिला बालाजी मंदिराशेजारील महानगरपालिकेच्या बाजारात असतात. रोजबाजारामध्ये सर्वात ज्येष्ठ अशा नांदगावच्या ६२ वर्षीय द्रौपदाबाई पाटील ह्या सुद्धा भाजी फळे विक्री सोबत आंबे फोडून देण्याचेही काम करतात.
तयार लोणच्यांच्या आजच्या बाजारपेठेत मराठी माणसांना मात्र स्वतः तयार केलेले लोणचेच हवे असते. त्यामुळे लोणच्यांच्या आंब्यांना मोठी मागणी आहे. हे आंबे ग्राहकांना फोडून हवे असतात. कारण आकाराने मोठे आणि आतून जाड कवच असल्यामुळे सध्या घरगुती साधनांनी हा फोडणे कठीण. हा आंबा फोडण्यासाठी थोडी अंगमेहनत घ्यावी लागते. जास्त मोठ्या घरात पूर्वी आंबे फोडण्यासाठी एखादा पुरुष गडी बोलाविला जायचा. आतासुद्धा मुंबई ठाण्याच्या बाजारात हे काम पुरुषांचेच असते. पनवेलमध्ये मात्र आकुर्लीच्या दोन आणि नांदगाव च्या एका महिलेने हे शिवधनुष्य लीलया पेललेले आहे. त्यांच्या जगण्याचाच हा भाग बनलेला असल्यामुळे त्यांना याबाबत विशेष कांही वाटत नाही.
RanPrahar @ 25 jun 2017
RanPrahar @ 25 jun 2017
Comments
Post a Comment