मराठीची अर्थव्यवस्था मजबूत करूयात !


 

मराठी भाषेचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध काय? खरंतर जीवनातील अनेक गोष्टींचा आणि अर्थकारणाचा, अर्थव्यवस्थेचा थेट संबंध आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी मागणी आणि पुरवठा या विषयावर महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी असे म्हटले की, पुरवठा आणि मागणीमुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते.

बाजारपेठेत एखाद्या वस्तूला, सेवेला मागणी मिळण्याआधी ती बाजारपेठेत उपलब्ध देखील असायला हवी. किंवा मागणी आल्यावर त्वरित उपलब्ध व्हायला हवी. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याचा थेट संबंध असून ह्यावरच सर्व अर्थचक्र अवलंबून आहे.

मराठीभाषेला अभिजात दर्जा मिळाला, ह्या मुळे भाषेच्या संवर्धनाकरिता काही कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल. येणाऱ्या 10 मार्चला महाराष्ट्राच्या बजेट मध्ये मराठी विभागाकरिता घसघशीत निधीची घोषणा देखील होईल. पण ह्याच बरोबरच माय मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून आपली देखील जवाबदारी असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा.

आपल्या मराठीला चिरंतन ठेवायचं असेल तर तिची मागणी व पुरवठा हा कायम अखंडितच हवा. मराठी भाषेची मागणी आणि पुरवठा असल्यास त्यातून अनेक नव्या संधी, रोजगार स्वयंरोजगार निर्मिती होऊ शकेल. मराठी भोवती एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकेल. अर्थात मराठी भोवतालची अर्थव्यवस्था अस्तित्वात आहेच, आपल्याला ती जपायची आहे, वाढवायची आहे.
आपण काय काय करु शकतो ?

कोणत्याही मोठ्या बदलाची सुरवात छोट्या पावलांनी होते, हे आपण जाणतोच. म्हणून आपण सगळ्यांनी अगदी छोट्या गोष्टी अंगिकारल्या तर त्यामुळे मोठे बदल घडविणे, आपली भाषा अधिक सशक्त व मजबूत करणे सहज शक्य होईल. खालील पैकी कोणतेही उपक्रम स्वीकारा, ज्या मुळे मराठीची अर्थव्यवस्था मजबूत होईल.

1. मराठी शिक्षण : प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून घेणे. शक्य नसल्यास किमान प्राथमिक भाषा, द्वितीय भाषा म्हणून मराठी भाषा निवडणे. ह्यामुळे मराठी भाषेचे शिक्षक, मराठी विषयाचे लेखक, प्रकाशक वितरक, मराठीच्या शिकवण्या ह्यांना रोजगार संधी मिळेल.

 

2. मराठी नाटक/सिनेमा : तुम्ही हिंदी इंग्रजी सिनेमे बघत असालच. त्याच सोबत 1-2 महिन्यातून किमान एक सिनेमा किंवा नाटक बघा. सिनेमा आणि नाटकांमध्ये बदल घडविण्याची खूप मोठी ताकद आहे. मराठी लेखक, दिग्दर्शक, संगीत, गायक अश्या अनेक कलाकरांना संधी, रोजगार मिळू शकतो. मराठी सिनेसृष्टीने आजवर अनेक लेखक, दिग्दर्शक, नट बॉलिवूड, टॉलिवूड ला देखील दिले आहेत. अश्या नव्या संधी देखील कलाकारांना मिळू शकतील.

 

3. मराठी बातम्या : आजुबाजुच्या घडामोडि जाणून घेण्याकरिता घरी किमान एक मराठी वर्तमानपत्र व मराठी वृत्तवाहिनीचा वापर नक्की करा. माध्यम क्षेत्र देखील अनेक रोजगार, व्यवसाय संधी निर्माण करते.

 

4. मराठी उपहारगृह : दादर, गिरगाव, ठाणे, पुणे येथे फारच थोडी परंतु उत्तम व्यवसाय करणारी मराठी माणसांचे, महाराष्ट्रीयन पदार्थांचे उपहारगृह छान काम करत आहेत. अश्या उपहारगृहामुळे अनेक महाराष्ट्रीयन पदार्थ सातासमुद्रापार जात आहेत. आपली खाद्य संस्कृती जपण्या करीता त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने खवय्या म्हणून अश्या उपहारगृहात आपल्या अमराठी मित्रांसह नक्की जावे.

 

5. मराठी पुस्तके : मराठी साहित्य अफाट आहे, प्रचंड शक्तिशाली आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीने आपले साहित्य, संस्कृती जागतिक दर्जावर नेली. हा वारसा पुढे चालविण्यासाठी आपल्या मित्र मैत्रिणीच्या वाढदिवसाला मराठी पुस्तक भेट म्हणून देऊ शकतो, दर महिन्याला किमान 2-3 पुस्तके विकत घेऊन वाचायला विसरू नका.

 

6. मराठी कॉल सेंटर : तुम्हाला कॉल सेंटर वरून रोजच कॉल्स येत असतील तसेच तुम्ही देखील तुमच्या कामानिमित्य बँका, विमान प्रवास कंपन्या, क्रेडिट कार्ड्स इत्यादी कंपन्यांशी बोलताना आवर्जून मराठी भाषेचा विकल्प निवडा, मराठीतच बोला क्यामुळे मराठी युवकांना कॉल सेंटर मध्ये रोजगार मिळू शकेल.

 

ह्याच बरोबर ATM चा वापर करताना, कोणतेही मोबाईल ऍप्लिकेशन्स वापरताना मराठी भाषा निवडा, मराठी दिनदर्शिका, दुकानावरील मराठी पाट्यांचा आग्रह धरा. मराठी व्यावसायिकांना, नोकरदारांना पाहिलं प्राधान्य द्या. मराठीचा अधिकाधिक वापर करून रोजगार, स्वयंरोजगार निर्मितीस चालना देऊयात.

                                          प्रसाद कुलकर्णी, ठाणे

                                          संपर्क क्र.9867365247

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income