चिखलोली स्थानकाचे भुसंपादन अंतिम टप्प्यात
- Get link
- X
- Other Apps
भुसंपादनानंतर अडीच वर्षात स्थानक पूर्ण करणार
· कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबईः अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या चिखलोली स्थानकाच्या भूसंपादनाच्या कामाला गती आली असून भुसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर डॉ. शिंदे यांनी ही माहिती दिली. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अडीच वर्षात स्थानक पुर्णत्वास जाणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून रखडलेल्या चिखलोली स्थानकाच्या उभारणीत गेल्या तीन वर्षांपासून वेग आला असतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार या स्थानकाच्या उभारणीसाठी आग्रही आहेत. नुकतीच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेत चिखलोली स्थानकाच्या कामाचा आढावा घेतला. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान चिखलोली स्थानकाची उभारणी केली जाते आहे. 2019 -2020 या वर्षात या कामाला सुरूवात झाली आहे. एखूण 15 कोटी 96 लाख रूपयांचा प्राथमिक खर्च यासाठी येणार आहे. कल्याण ते बदलापूर या स्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांच्या सोबतच हे काम केले जाते आहे. यासाठी 10 हेक्टर जागेची गरज असून त्यातील 3.3 हेक्टर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अर्धा हेक्टर जागा शासकीय आणि 4.5 हेक्टर जागा ही खासगी मालकीची आहे. या जागेच्या भुसंपादनाचे काम सध्या उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाकडून केले जाते आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. रेल्वे व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार भुसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दोन ते अडीच वर्षात या स्थानकाच्या उभारणीचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. खा. डॉ. शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानकाच्या उभारणीसाठी आग्रही आहेत. या स्थानकाचा प्रस्ताव अडगळीत पडला होता. तो खा. शिंदे यांनी पुनरूज्जीवीत करत मार्गी लावला. या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकाच्या दरम्यान एक नवे स्थानक प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. तसेच या दोन स्थानकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरी लोकवस्ती उभी राहिली आहे. त्यांना अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात प्रवासासाठी धाव घ्यावी लागते. हा प्रवाशांचा त्रास या चिखलोली स्थानाकामुळे कमी होणार आहे.
Comments
Post a Comment