सह्याद्री प्रतिष्ठान आता शिवसह्याद्री प्रतिष्ठान म्हणून कार्यरत
आनंद कांबळे यांची कल्याण जिल्हाध्क्षपदी नियुक्ती
कल्याण :- (बाबुराव खेडेकर)
गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण परिसरातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध क्षेत्रात समाजसेवेचे कार्य करून ठसा उमटवलेले सह्याद्री प्रतिष्ठान आता शिव सह्याद्री प्रतिष्ठान नावाने नोंदणीकृत झाले असून नव्या जोमाने कामाला लागले आहे. सतीश पेडणेकर हे या नवनोंदणीकृत धर्मा दय संस्थेचे अध्यक्ष असून यापुढील वाटचालीकरिता ध्येयधोरणांबाबतची माहिती रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी चिंचपाडा येथील संस्थेच्या बैठकीत देण्यात आली आहे.
डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर सांगली सातारा या भागातील लाखो नागरिक राहतात. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून या नागरिकांची ओळख आहे. 'लाथ मारेन तिथे पाणी काढेल' या म्हणीप्रमाणे मेहनतीने आपण राहतो त्या परिसरात स्थानिकांचा विश्वास जिंकत प्रगती करण्याचे ध्येय उराशी बाळगून विविध क्षेत्रात अग्रेसर राहणारा हा समाज आहे. त्यामुळेच अनेक संघटना छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून कार्यरत आहेत. यातीलच एक नावाजलेले नाव म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान. कोल्हापूर मधील पूर परिस्थिती वेळी मदत कार्य करण्यासाठी धावून गेलेली तसेच कल्याण परिसरात शिक्षण, आरोग्य, क्रीडा, युवक कल्याण, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात संस्थेने कार्य केले आहे. संस्थेचे शिलेदार सतिष पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची अधिकृत नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे नुकतीच केली असून शिवसह्याद्री प्रतिष्ठान असे अधिकृत नाव संस्थेला मिळाले आहे. संस्थेमध्ये अर्थतज्ञ आणि कायदेतज्ञ यांचाही समावेश असल्याने नोंदणीचे सर्व सोपस्कार पार पडले आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असे ठरविण्यात आले आहे.
रविवारी चिंचपाडा गावातील साई छाया अपार्टमेंट येथे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सभासद नोंदणी, वार्षिक वर्गणी, आगामी काळातील कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शिवाजी यादव यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच आनंद कांबळे यांना कल्याण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. रमेश पाटील यांना कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर बैठकीस संस्थेचे मार्गदर्शक उद्योजक भागोजी पाटील, समाजसेवक महेश भोसले, संतोष खामकर, सतबा दाभोळे, सुनील बोरणाक, शरद बिरंबळे, मोहन फराकटे, उत्तम गावडे, संदीप पाटिल यांच्यासह हितचिंतक उपस्थित होते.
Comments
Post a Comment