कल्याण लोकसभेचा राजकीय, सामाजिक प्रवास
*वास्तव* :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या कल्याण लोकसभा क्षेत्रात झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर सारख्या महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. स्मार्ट शहराचं समस्यांचे शहर अशी ओळख निर्माण झालेली आहे. डोंबिवली आणि अंबरनाथ या दोन्ही एमआयडीसी नागरी वस्तीत निर्माण झाल्या का ? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारती, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यांनी नागरिकांची पाठ सोडलेली नाही. अनधिकृत बांधकामे हे कल्याण डोंबिवली महापालिकेसमोरील सर्वात मोठे संकट आहे. कल्याण मध्ये मेट्रो येऊ घातली असली तरी कल्याण आरटीओ मीटरवर रिक्षा चालवायला असमर्थ ठरत आहे असेच म्हणावे लागेल. अमृत योजनेकडे येथील नागरिक डोळे लावून बसले असून पाणी टंचाई हाही येथील कळीचा मुद्दा आहे. वाढीव घरपट्टी हा प्रत्येक महानगरपालिकेत सध्या वादाचा विषय बनत चालला आहे तो इथेही आहे. दिव...